हलकं फुलकं – राजश्री वटे
तिची गोष्ट…
‘दिवस तुझे हे फुलायचे…
अन् झोपाळ्या वाचून झुलायचे’…
रेडिओवरील हे गीत तिच्या कानावर पडले…
जरा दुपारची आडवी पडली होती ती! भूतकाळातल्या आठवणी किती मागे पडत जातात नाही… ती विचारात पडली…
तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांमुळे प्रेमातच पडला तो तिच्या!
मागेच पडला तिच्या लग्न कर म्हणून… तिलाही मग होकार देणं भाग पडलं… तसा तिलाही तो पसंत पडलाच होता!
सुखी संसाराची स्वप्ने पडू लागली तिला! वडीलधाऱ्यांनी जुन्या प्रथा पाडल्या आहेत, त्याप्रमाणे डोक्यावर अक्षता पडल्या… लग्न थाटात पार पडले… थोरा-मोठ्यांच्या दोघे पाया पडले. संसार सुरू झाला. त्याच्याकडून फर्माईश यायची आवडीच्या पदार्थांची, पडत्या फळाची आज्ञा मानून हौसेन पार पाडायची, पण कामाचा फार भार पडायचा तिच्यावर लहानवयात… कधी कधी मीठच जास्त पडायचं जेवणात, अशावेळी तोंडातून शब्द बाहेर पडत नसे तिच्या संकोचाने… पण भूक इतकी लागलेली असायची की भुकेने पोटात आग पडायची… दोन घास पोटात पडले की बरं वाटायचं… त्याचा महिन्याचा पगार तिच्या हाती पडू लागला, जबाबदारी येऊन पडली
हळूहळू अंगवळणी पडलं सगळं… चुकलंच कधी तर पडतं घेणं ही जमायला लागलं तिला!
पहिली दिवाळी आली…
मधला भांग पाडून, केसांचा सैलसर अंबाडा पाडला, चप्पल पायात सरकवून घराबाहेर
पडली खरेदीला!!
बाजारात लोकं तुटून पडली होती, गर्दीत तिच्या पायावर पाय पडला कोणाचा तरी… आई गं… किंचाळीच बाहेर पडली, तोंडातून तिच्या! लागलं का…
फार… कोणीतरी मध्ये पडलं गरज नसताना…
तेवढ्यात पुस्तकाचे दुकान नजरेस पडलं, तिला वाचनाची फार आवड, एखादे पुस्तक आवडलं की प्रेमातच पडायची पुस्तकाच्या… पुस्तक घेतलं, थोडी खरेदी करून, जास्त काही घेण्याच्या भानगडीत न पडता घरी परतली. तेवढ्यात शेजारणीच्या तोंडावर तोंड पडलंच, गळ्यात पडायची भारी खोड तिला!!
खरेदीच्या लेबलवर नजर पडलीच तिची… कितीला पडलं हे… विचारलंच तिनं… असे प्रश्न नेहमीच पडतात शेजारणीला… सांगितलं नाही तर तोंड पाडून बसते! हिच्या डोक्यात प्रकाश पडला… खरं सांगूच नये… दृष्ट लागते…
नसत्या भानगडीत पडूच नये!! पण खोटं सांगितलं अन् खरं कळलं तर…तोंडघशी पडायचं उगाच!
महागात पडले जरा पण येताना पेरू घेतले ते पिशवीतच पडले होते… कापून चार भाग पाडले… नको म्हणत होती तरी शेजारणीला दोन फोडी खाणं भाग पाडले, तिच्या आनंदात भर पडली.
किती जुन्या आठवणी… ती भूतकाळातून बाहेर पडली…
घरभर पडलेला पसारा आवरला… आता वर्तमानातल्या नवीन पिढीच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत…
विचार करून डोक्याचा भुगा पडतो…
पडते जरा अंमळ!!