कथा – रमेश तांबे
सचिन नावाचा एक मुलगा होता. त्याला गोष्टींची पुस्तकं वाचण्याचे खूप वेड होते. त्याच्या दप्तरात नेहमीच गोष्टींची पुस्तके असायची. मधल्या सुट्टीत जेव्हा मुलं खेळायची, कोणी गप्पा मारायची तेव्हा सचिन पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असायचा. कधीकधी तर वर्ग सुरू असतानादेखील तो वाचन करायचा. वर्गातली मुलं त्याला “स्कॉलर स्कॉलर” म्हणून चिडवायची. पण सचिन साऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुस्तकं वाचायचा. त्याची ही पुस्तकं वाचण्याची सवय शाळेतल्या सर्व शिक्षकांनादेखील माहीत होती.
पण पुढे एक वेगळाच किस्सा घडला. सचिनच्या शाळेत एक नवे शिक्षक रुजू झाले. ते सचिनच्या वर्गाला भूगोल शिकवायला येऊ लागले. दोन-चार दिवसांतच त्या नव्या सरांच्या लक्षात आलं की, सचिनचं शिकवताना लक्ष नसतं. तो खाली मान घालून काही वाचत असतो. पण त्या शिक्षकांना त्याची ही कृती आवडली नाही. शिकवताना सचिन वर्गात लक्ष देत नाही याचा त्यांना खूप राग येऊ लागला. एक-दोन वेळा त्यांनी सचिनला खडू फेकून मारला, ओरडलेदेखील, पण सचिनच्या पुस्तक वाचण्यात खंड पडला नाही.
शेवटी त्या सरांच्या संयमाचा एक दिवस कडेलोटच झाला. ते हातात पट्टी घेऊन तिरमिरीतच सचिनजवळ आले. त्याच्या हातातले गोष्टीचे पुस्तक हिसकावून घेत त्यांनी सटासट पट्ट्या मारायला सुरुवात केली. हातापायावर, पाठीवर पट्टीचा मार बसत होता. पण सचिनच्या तोंडातून हूं नाही की चूं नाही. सारी मुलं अवाक् होऊन सरांचा रूद्र अवतार बघत होती. एवढे मारूनही त्यांचा राग शांत झाला नाही. ते तडक मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये गेले. सचिनबद्दल तावातावाने सांगू लागले. तक्रार करू लागले. “मी गेले अनेक दिवस बघतोय त्याचं अजिबात वर्गात लक्ष नसतं. त्याच्या आई-वडिलांना शाळेत बोलवून घ्या.”
मुख्याध्यापकांनी त्या नव्या सरांचे सारे काही शांतपणे ऐकून घेतले. त्यांना शांत केले. खुर्चीत बसवले आणि पाणी प्यायला दिले. सरांचा राग शांत झाल्यावर मुख्याध्यापक म्हणाले, “सर आपण या शाळेत नवीन आहात म्हणून तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सचिन या शाळेतला एक हुशार विद्यार्थी आहे. त्याचं पुस्तक वाचनाचं वेड सगळ्यांनाच माहीत आहे. भले तो वर्गात लक्ष देत नसेल पण त्याचा अभ्यास मात्र तो पूर्ण करतो. गेले चार वर्षे तोच शाळेतून पहिला येतो. शिवाय त्याची स्वतःची दोन गोष्टींची पुस्तकेदेखील आपल्या शाळेनेच प्रसिद्ध केली आहेत सर! तो मुलगा आपल्या शाळेचा अभिमान आहे. तुम्ही म्हणालात त्याच्या आई-वडिलांना बोलावून आणा. तर सर ऐका, त्याला आई-वडील नाहीत. तो आपले शिक्षण मामाच्या घरी राहून पूर्ण करतो आहे.”
मुख्याध्यापकांचे बोलणे ऐकून सरांचा चेहरा पश्चातापाने भरून गेला. आपण कोणतीही चौकशी न करता त्या मुलाला मारझोड केली. त्यांचे डोळे पाण्याने भरून गेले. मुख्याध्यापकांच्या टेबलवर सचिनने लिहिलेले पुस्तक पडले होते. त्या पुस्तकाचे नाव होते “मलाही पुढे जायचं आहे.” सर तिथे बसल्या बसल्या पुस्तक वाचू लागले. आता सरांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस पुस्तकांच्या पानावर टपटप पडू लागला…!