कथा – रमेश तांबे
त्यावेळी भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारची दडपशाही सुरू होती. छोट्याशा संशयावरूनसुद्धा कोणालाही तुरुंगात टाकत होते. लोकांना मोर्चे काढायला, सभा घ्यायला, तिरंगा फडकवायला पूर्ण बंदी होती. वंदे मातरम्, भारतमाता की जय या नुसत्या घोषणा ऐकून इंग्रज अधिकारांचे पित्त खवळायचे. मग धरपकड, काठ्यांनी झोडपून काढणे असा जुलूम चालायचा. अशा दडपशाहीच्या वातावरणात लोक जीव मुठीत धरून राहत होते.
पुणे जिल्ह्यातल्या हिवरे गावातील शाळा अशाच दडपशाहीच्या वातावरणात भरत होती. मुले येत होती, शिकत होती. भगतसिंगाचा स्मृतिदिन जवळ येत होता. या दिवशी आपल्या शाळेच्या आवारात तिरंगा झेंडा फडकवायचा असं शुभम आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं. शाळा सुटल्यावर शाळेसमोरच्या झाडाखाली शुभम आणि त्याचे सात-आठ मित्र जमा झाले. घरी जाताना कुलकर्णी सरांनी मुलांना “येथे का थांबलात?” असे विचारलेदेखील होते. पण शुभमने वेळ मारून नेली. सगळ्यांनी अर्धा तास खलबते केली. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत होता. पहाटे बरोबर ४ वाजता झेंडावंदनासाठी शाळेत यायचे ठरले. शुभमने प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आणि मुले घरी निघाली.
घरी जाताना मुलांची मने देशप्रेमाने भारून गेली होती. शुभमने देशभक्तीच्या, अनेक क्रांतिवीरांच्या गोष्टी सांगून त्यांना भारावून टाकले होते, तर काहींच्या मनात मात्र उद्या आपण पकडले गेलो तर? पोलिसांनी घरच्या लोकांना त्रास दिला तर काय करायचं? म्हणून चलबिचल सुरू होती. दुसऱ्या दिवशी शुभम पहाटे ३ वाजता उठला. पुस्तकाच्या पेटीत तळाला ठेवलेला तिरंगा ध्वज त्याने हळूच बाहेर काढला. तो झटकून त्याची बारीक घडी करून त्याने खिशात ठेवला. रात्रीच तयार ठेवलेले दोरीचे बंडल हातात घेतले आणि हळूच अंदाज घेत घराच्या बाहेर पडला. बाहेर अंधार होता. गस्ती घालणाऱ्या पोलिसांचे “सावधान सावधान” असे हाकारे ऐकू येत होते. शुभमच्या घरापासून शाळा दहा मिनिटांवर होती. एवढ्या प्रवासात पोलिसांपासून त्याला दूर राहायचे होते. शाळेच्या वाटेवरच किशोरचं घर होतं. तो घराबाहेरच शुभमची वाट पाहत आडोशाला उभा होता. त्याच्या हातात फुलांची एक पिशवी होती. दोघेही झपझप शाळेजवळ पोहोचले. तेव्हा निखिल हातात रांगोळीची पुडी घेऊन सर्वांची वाट पाहत आधीच उभा होता.
शुभम म्हणाला, “चला थांबायला वेळ नाही.” मग तिघेही कुंपणावर चढून शाळेच्या आवारात शिरले. मैदानाच्या एका कोपऱ्यात एकच दिवा लुकलुकत होता. त्यामुळे मैदानात जास्त प्रकाश नव्हता. त्याच अंधाराचा फायदा घेत शुभम आणि त्याच्या मित्रांना आजची कामगिरी फत्ते करायची होती. शुभमने खिशातून तिरंगा बाहेर काढला. मैदानाच्या मधोमध ध्वजावंदनाचा खांब होता. खांबावर चढून दोरी लावण्याचे अवघड काम शुभमने झटपट पूर्ण केले. निखिलने ध्वज व्यवस्थित दोरीला बांधला. किशोरने ध्वज स्तंभाभोवती रांगोळी काढली. त्या भोवती फुलांचा सडा टाकला. सारी तयारी झाली. तितक्यात त्यांचे अजून तीन-चार मित्र त्यांना येऊन मिळाले. मग शुभमच्या हस्ते दोरी ओढून झेंडा फडकवला. सगळ्यांनी आपल्या प्रिय तिरंग्याला कडकडीत सलाम ठोकला.
मग सगळ्यांनी भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. तेवढ्यात “कोण आहे रे तिथे?” असा जबरी आवाज आला. मुले कुंपण चढून बाहेर पडेपर्यंत दहा पोलीस त्यांच्या समोर उभे ठाकले. त्यापैकी ऑफिसर पुढे आला आणि म्हणाला, “काय रे पोरांनो, काय चाललंय इथे. तुम्हाला माहीत नाही का, तिरंगा झेंडा फडकवायला, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा द्यायला बंदी आहे म्हणून?” तेवढ्यात शुभम पुढे आला आणि म्हणाला, “आज भगतसिंगांचा स्मृती दिवस आहे आणि म्हणून आम्ही तिरंग्याला वंदन करायला आलो आहोत. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून सरदार भगतसिंग फासावर गेले याची प्रत्येक भारतीयाने आठवण ठेवली पाहिजे.” मुलांचे धाडस बघून त्या अधिकाऱ्याचा चेहरा फुलला. तो अधिकारी म्हणाला, “आम्ही जरी भारतीय असलो तरी आम्ही पडलो सरकारी नोकर. आम्हाला असे नाही करता येत. पण तुम्ही तिरंगा फडकवलात हे खूपच छान झाले. शाब्बास पठ्ठ्यांनो शाब्बास! आता तुम्ही निघा लवकर, मी बघतो काय करायचं ते!” दुसऱ्या दिवशी शाळेच्या आवारात कुणीतरी तिरंगा फडकवला अशी बोंब झाली. तो फडकणारा तिरंगा बघण्यासाठी शाळेजवळ एकच गर्दी झाली. अन् त्या गर्दीत शुभम आणि त्याची मित्रमंडळीदेखील सामील झाली!