प्रासंगिक – उर्मिला राजोपाध्ये
हळूहळू वर्षसमाप्तीच्या दिशेने निघालेले वर्ष माघामध्ये आणखीनच आल्हाददायक असते. सक्रांतीच्या उत्साही वातावरणापाठोपाठ एकमेकांना तीळगूळ दिल्यानंतर आता साजरी होणारी रथसप्तमी सूर्याच्या बदलत्या प्रवासदिशेने येणारी समृद्धी दर्शवते, तर दुसरीकडे या महिन्यातील श्रीगणेश जयंतीचा भाविकांमध्ये आगळा उत्साह पाहायला मिळतो. थंडीने काढता पाय घेण्याचा हा काळ आगामी बदलाचे संकेत देऊन जातो.
माघ महिना हे एक अद्भुत आध्यात्मिक पर्व असते. हा महिना भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा महिना केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. कदाचित त्यामुळेच या महिन्याला तपश्चर्येचा महिना असे संबोधले जात असावे. कारण या संपूर्ण महिनाभराच्या काळात भक्तगण तप, जप आणि ध्यानधारणेत रमतात. माघ महिन्याचे आगमन सण-उत्सवांनी गजबजलेले असते, तसेच या काळात निसर्गही प्रसन्न असतो. त्यामुळेच एकीकडे आध्यात्मिक आनंद मिळतो, तर दुसरीकडे प्रसन्न निसर्गात रममाण होत दैनंदिन जीवनात आनंदाचे क्षण शोधण्याची पर्वणीही साधता येते. या दोन्ही अर्थांनी या महिन्याचे महत्त्व अधोरेखित होते.
माघ महिन्याच्या अाध्यात्मिक महत्त्वाबद्दल बोलायचे तर या काळात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्याची परंपरा आहे. या काळात त्रिवेणी संगमात स्नान केल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सोपा होतो असे मानले जाते. ‘माघस्नाने महापुण्यम’ असा उल्लेख शास्त्रांमध्येही आहे. माघ महिन्याच्या पवित्रतेमुळेच कुंभमेळ्याचे आयोजनही याच काळात केले जाते. आताही आपण या मंगलपर्वाचा आनंद घेत आहोत. यंदा पवित्र संगमावर लाखोंच्या संख्येने भक्तगण तसेच ऋषीमुनी आणि साधू-संतांचा मेळा रंगला असून त्यांच्या पूजापाठांनी आणि शाही स्नान आणि कर्मकांडांनी वातावरणावर आगळीच जादू केली आहे. प्रचंड मोठ्या संख्येने एकत्र येणारा हा हिंदू समुदाय देशासाठीच नव्हे तर जगासाठीही आश्चर्याचा भाग असून तो बघण्यासाठी जागतिक पातळीवर धनाढ्य, ज्येष्ठ उद्योजक इथे येत आहेत. या सगळ्यांचा आध्यात्मिक रंग देशामध्ये जाणवत असून नाशिकच्या पवित्र प्रवाहामध्येही मंगलस्नानाचे मुहूर्त साधण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.
माघ महिन्यात अनेक सण साजरे होतात. त्यामध्ये आपल्याला हिंदू संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. यातील एक म्हणजे माघ पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या पूर्ण तेजाचे दर्शन होते. यानिमित्ताने धार्मिक विधी, जप-तप, दानधर्म आणि सत्यनारायण पूजेचा प्रघात आहे. वसंत पंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व राखून आहे. हा सरस्वती पूजनाचा दिवस. आजही या दिवशी ज्ञान आणि कलात्मकतेचे पूजन केले जाते. देशभर या दिवसाचे साजरीकरण बघायला मिळते. माघी गणेश जयंती हा दिवस गणेशभक्तांसाठी आस्था आणि श्रद्धेचा विषय असतो. गणपती बाप्पाच्या जन्माचा हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे श्रीपंचमी हा सण विशेषतः कृषी क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करताना दिसतात. त्यामुळेच शेतकरी वर्गात या दिवसाच्या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळतो.
माघ महिन्यातील निसर्गाची झलक आगळी आणि अत्यंत आल्हाददायक असते. हा महिना हिवाळ्याचा शेवटचा टप्पा असल्यामुळे हवामान अत्यंत सुखद असते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची ऊब आणि रात्रीचा गारवा एक आगळा-वेगळा अनुभव देत असतो. झाडाझुडपांवर आलेले नव्या पालवीचे रंग वसंत ऋतूचे स्वागत करण्यास सज्ज होत असतात. वृक्षांवरचा मोहोर वातावरणात नवीन सुगंध पसरवत असतो. त्याकडे झेपावणारा पक्षीगण आपल्या लीलांनी मोहित करत असतो. शेताशिवारांमध्ये नवचैतन्याची पेरणी होत असते. हुरडा, कोवळा लुसलुशीत हरबरा दुपारच्या खाण्याची लज्जत वाढवत असतो.
एकंदरच निसर्गप्रेमींसाठी हा महिना कोणत्याही पर्वणीपेक्षा कमी नसतो.
असा हा माघ महिना अाध्यात्मातील संदेश देऊन जातो. तो आपल्याला तप, संयम, शिस्त आणि अाध्यात्मिकतेचे महत्त्व शिकवतो. हा महिना ध्यानधारणेसाठी उत्तम मानला जातो. शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी या महिन्याचे वेळापत्रक आखण्याची प्रथा आहे.
माघ महिना पवित्र हो, सृष्टीचा सुंदर साज,
निसर्गही हसतो, होतो नवजीवनाचा आगाज
गंगेच्या तीरावर भक्तांची होते गर्दी,
सात्त्विकतेने भरलेला, प्रत्येक दिवस आनंदी
तप-जपाचे पर्व, संतांची वाणी घेऊन येते,
मनाला शांतता देणारे, माघ हृदयाला भेटे…
या ओळी या महिन्याचे महत्त्व पटवून देण्यास पुरेशा आहेत.
निसर्ग, संस्कृती, परंपरा आणि अाध्यात्माचा सुंदर मिलाफ असणारा हा काळ प्रत्येकाने आनंदाने व्यतित करायला हवा. या महिन्यात विविध क्षेत्रांमधून भारतीय जीवनशैलीची संपन्नता प्रकर्षाने दिसून येत असल्यामुळे त्याची माहिती घ्यायला हवी. ती संग्रहित करायला हवी. कदाचित यातूनच आपल्याला जगण्यातील नवनवीन पैलूंची ओळख होऊ शकते. त्यामुळेच केवळ साधू-संतच नव्हे तर, सामान्यजनदेखील या मासामध्ये माघस्नानाचा संकल्प पाळतात. पवित्र नद्यांमध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करण्याची प्रथा आपापल्या ठिकाणच्या प्रवाहांमध्ये स्नान करत यथाशक्ती, यथाबुद्धी पाळली जाते. अगदी घरातही गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी यांसारख्या पवित्र नद्यांचे नाव घेत स्नान केल्याने विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. यामुळे पापांचे शमन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो हा विचार त्यांना थंडीच्या कडाक्यातही थंड पाण्याने स्नानादी विधी करण्यास उत्तेजित करतो. शक्य असेल तेव्हा माघ महिन्यात त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी धाव घेणाऱ्या भाविकांची गर्दीही आस्थेच्या प्रतीकांचे दर्शन घडवून देते.
या महिन्यात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान, तूप, तांदूळ तसेच गव्हाचे दान या काळात फार महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच माघ मेळा किंवा माघी मेला या उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जातो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे हा पूर्ण काळ व्रत, उपवास आणि साधनेला समर्पित असणारा आहे. त्यामुळेच माघ एकादशी, सप्तमी व्रत, माघ अमावस्या आणि पौर्णिमा व्रत या दिवशी उपवास आणि साधनेचे विशेष महत्त्व दिसून येते. यावेळी केलेली साधना, जप आणि ध्यान मनाच्या शांतीसाठी लाभदायक ठरते. विशेषतः एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा आणि जप-तप केल्याने त्याचा आशीर्वाद लाभतो, असे मानले जाते. हे सगळे सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत, तर सामाजिक एकतेचा संदेश देतात. ते शिक्षण, ज्ञान आणि संगीताचे महत्त्व अधोरेखित करतातच, खेरीज देशातील पवित्र नद्यांचे महत्त्व आणि जलसंपत्तीचे संरक्षण याबद्दलही जनजागृती करतात. त्यामुळेच महाभारत, पुराणे आणि वेदांमध्येही माघ महिना विशेष महत्त्वाचा मानला गेला आहे.
गीतेतही माघ महिन्यातील योग-साधनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. यातून मिळणारे अध्यात्म, साधना आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची शिकवण आयुष्यभर पुरणारी आणि जगण्याला आकार देणारी आहे. यावेळी केलेले प्रत्येक शुभकृत्य भविष्यासाठी लाभदायक ठरते ही भावनाच कार्यप्रवण करणारी ठरू शकते. ‘तपस्यायां रतम् माघे, जीवने शुभं फलं’ अर्थात, माघ महिन्यात केलेल्या तपस्येमुळे जीवनात शुभ फलाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. त्यामुळेच जीवनातील विविध पैलूंची उंची गाठण्याचा काळ असणाऱ्या माघ महिन्याचे महत्त्व जाणायला हवे. साधनेत रमणे, दानधर्म करणे, सण-उत्सव साजरे करणे आणि निसर्गाचा आनंद घेणे ही या महिन्याची वैशिष्ट्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवायला हवी. चला तर मग, आपणही या महिन्याचे महत्त्व समजून घेत जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून अाध्यात्मिक उन्नती साधू या.