तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २०२५ हे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ९४ वर्षे असे दीर्घायुष्य लाभलेले तर्कतीर्थ जोशी म्हणजे एक आनंदयात्री होते. लक्ष्मण बाळाजी जोशी यांनी आपल्या कर्तृत्वाने आठ दशके महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती, राजकारण यांवर आपले महत्त्व टिकवून धरले. हा आठ दशकांचा कालावधी म्हणजे संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्राचा साहित्य, संस्कृती व राजकारण याचा चालता-बोलता इतिहास ठरला.
अनिल जोशी, वाई
धर्मशास्त्राचे गाढे पंडित, साहित्य संस्कृती मंडळ व मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक, प्राज्ञपाठशाळा मंडळाचे अध्यक्ष, नवभारत मासिकाचे संपादक, धर्मकोशाचे प्रमुख संपादक, स्वातंत्र्य सैनिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, संस्कृत तज्ज्ञ, समीक्षक, ज्येष्ठ वक्ते, ‘पद्मविभूषण’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २०२५ हे शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपल्या विविध गुणांनी आणि कतृत्वाने संपन्न असणारे तर्कतीर्थ जोशी २० व्या शतकांतील ‘लोकहितवादी’ झाले. ९४ वर्षे असे दीर्घायुष्य लाभलेले तर्कतीर्थ जोशी म्हणजे एक आनंदयात्री होते. २ फेब्रुवारी १९१४ मध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या खेड्यातून आलेले लक्ष्मण बाळाजी जोशी यांनी आपल्या कर्तृत्वाने आठ दशके महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती, राजकारण यांवर आपले महत्त्व टिकवून धरले. हा आठ दशकांचा कालावधी म्हणजे संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्राचा साहित्य, संस्कृती व राजकारण यांचा चालता- बोलता इतिहास ठरला. धर्मशास्त्राचे सखोल अध्ययन करण्याच्या हेतूने आलेले लक्ष्मण बाळाजी जोशी पद्मविभूषणाने सन्मानित झाले. आयुष्यभर मैत्री हे मूल्य त्यांनी जाणीवपूर्वक जोपासल्याने त्यांना आठ दशकांतील आयुष्याच्या काळात अगणित मित्र लाभले. त्यामध्ये साहित्यिक होते, धर्मपंडित होते, राजकीय नेते होते, समाजसुधारक होते आणि जीवाभावाचे संगीततश देखील होते. या सर्वांचे कारण म्हणजे तर्कतीर्थ जोशी यांनी एक जीवनसूत्र जोपासले होते. ते म्हणजे ‘जगी आहे जर्गमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र.’
तर्कतीर्थ जोशी यांच्या राजकीय विचारांवर अनेकवेळा बदल होत राहिला. सुरुवातीस ते टिळक विचारांचे होते. टिळकांच्या निधनानंतर ते गांधींच्या विचारांकडे झुकले. १९३० च्या काळात ते मार्क्सवादी विचाराने प्रभावित झाले आणि त्या विचारांच्या आधारे त्यांनी पंथनिर्मिती देखील केली. १९३३ नंतर शारणोजी रॉय यांच्या विचारांनी प्रभावित झाले. याच विचारांनी प्रभावित झालेले त्यांना मित्र लाभले. द्वा. भ. कर्णिक, व. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, भाऊसाहेब तारकुंडे इत्यादी. १९४७ नंतर शास्त्रीजी लोकशाही विचारप्रणाली आदर्श मानत राहिले. त्याच्या मते लोकशाही ही दिव्य अशी राजकीय प्रणाली आहे.
तर्कतीर्थ जोशी यांच्या विचारशैलीत जो महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे दलितांविषयीचे व त्यांच्या साहित्याविषयीचे प्रेम होय. कारण त्यांच्या मते दलित माणूस हा कित्येक पिढ्या विविध बंधनात अडकलेला होता व आहे. त्या सर्व वर्गास असंख्य वर्षे स्वातंत्र्याला मूल्यापासून फार दूर ठेवण्यात आले. त्या वर्गास स्वतःच्या भावना आणि विचार जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही किंवा अन्य सामाजिक वर्गातील लोकांनी ही संधी दिली नाही. या संपूर्ण दलित वर्गास मराठी साहित्य क्षेत्राने देखील उपेक्षित ठेवले; परंतु काळाच्या गतीमध्ये या वर्गास शिक्षणाची संधी मिळत राहिली. राजकीय स्वातंत्र्याबरोबर विचारांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. दलित वर्ग वर्षानुवर्षे आपल्या दडपल्या गेलेल्या विचारांना व भावनांना व्यक्त करू लागला. त्यामध्ये त्यांना जसे विचार स्वातंत्र्य मिळाले तसे लेखन स्वातंत्र्य देखील मिळाले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दलितांबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केल्याची उदाहरणे आहेत. खुद्द त्यांचे गुरू केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ जोशी यांना मानवनिर्मित जाती व पंथ मान्य नव्हते. कारण खुद्द विनोबा भावे यांनीच केवलानंद सरस्वती यांना दलितांना वेद शिकविण्याबद्दलचा प्रश्न विचारला होता. खुद्द शास्त्रीजी हे स्वातंत्र्य या मूल्याचे आचरण करीत होते. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे त्यांच्या घरी मेणवली या गावातील सावित्री गायकवाड ही दलित महिला चाळीस वर्षे स्वयंपाक करीत होती. त्यामुळे विचार आणि आचार या दोनही मूल्यांचे जतन शास्त्रीजी आयुष्यभर करीत राहिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रणदिवे नावाच्या एका दलित विद्यार्थ्यास तर्कतीर्थ जोशी यांच्याकडे संस्कृत साहित्याच्या अभ्यासासाठी पाठविले होते आणि तो विद्याची शास्त्रीजींच्या घरामध्ये राहत होताच पण त्यांच्या पत्नी सत्यवतीबाई जोशी यांच्या स्वयंपाक घरात तो मुक्तपणे वावरत होता.
१९८१ मध्ये अमरावती येथे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. १९४७ मध्ये तर्कतीर्थ जोशी यांचा ‘ज्योतिनिबंध’ प्रसिद्ध झाला. या ग्रंथास समाजसुधारक रा. ना. चव्हाण यांची प्रस्तावना आहे आणि या त्यांच्या प्रस्तावनेत विठ्ठल रामजी शिंदे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. जोतिबा फुले यांच्या आचार-विचारांची मांडणी करताना शास्त्रीजी म्हणायचे, “परिणामक्षम सूक्ष्म मने असल्यामुळे आणि बुद्धी विचारशील आणि चौकस असल्यामुळे बदललेल्या परिस्थितीचा अर्थ अत्यंत व्यापकपणे जोतिबांना समजल्याशिवाय राहिला नाही. इंग्रजी राज्याच्या आगमनाने झालेल्या क्रांतीचा अर्थ त्यांना त्यांच्या काळात समजला तितका फरक थोड्या लोकांना समजला होता. स्वतःच्या परिस्थितीचा अर्थ समजणारे आत्मप्रत्ययशील लोकच स्वतंत्र होऊ शकतात आणि आत्मोन्नती करू शकतात.” तर्कतीर्थ जोशी यांनी लिहिलेल्या ‘ज्योतिनिबंध’ या ग्रंथामुळेच समाजातील त्यावेळच्या सुशिक्षित वर्गास जोतिबांच्या विचारांची ओळख झाली. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांतील उदारमतवादाशी तर्कतीर्थ सहमत होते.
तर्कतीर्थ जोशी यांनी ‘हिंदू धर्माची समीक्षा’ हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी हिंदू धर्मातील रूढी-परंपरा आणि पारंपरिक दृष्टिकोन याबाबत आपले कठोर मतप्रदर्शन केले आहे. ज्यामुळे मानवी समाजाचा विकास थांबतो त्या त्याज्य आहेत असेही मत त्यांनी या ग्रंथात प्रतिपादिले आहे. तसेच त्यांनी ‘सर्वधर्म समीक्षा’ हा ग्रंथ लिहिला. त्यातही संपूर्ण मानवी समाजाच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासास अडथळा आणणाऱ्या विचारांचा कठोरपणे परामर्ष घेतला आहे. या दोनही ग्रंथांच्या प्रसिद्धीनंतर मी स्वतः शास्त्रीजींना धाडस करून प्रश्न विचारला की, “शास्त्रीजी तुम्ही कोणता धर्म मानता?” शास्त्रीजी म्हणाले, “मी विश्वधर्म मानतो”, शास्त्रीजींच्या विचारांतील हा विश्वव्यापक गुण समजावून घेणे आणि त्यासाठी नवीन पिढीने कार्यरत राहणे हीच त्यांच्या विचारांना आदरांजली ठरेल.