विशेष – ऋतुजा केळकर
बारा विद्यांचे आणि चौसष्ट कलांचे आराध्य दैवत “श्री गणपती”. भारत देशातच नव्हे तर अखिल जगतात गणपती… गजानन… लंबोदर… हेरंब… विनायक या आणि अशा अनेक नावाने प्रसिद्ध आहे. अशा या गजाननाचा जन्म हा माघ शुद्ध चतुर्थीला झाला आणि आपण तो माघी गणेशोत्सव किंवा जन्मोत्सव म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतो. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजाननाच्या स्मरणाने आणि पुजनाने होते.
श्री गणपती हे दैवत सौंदर्य तसेच मांगल्याचे प्रतीक आहे. हृदयातील मांगल्याची ज्योत अखंड तेवत राहावी तसेच क्षुद्र मोहाच्या ध्यासापायी माणुसकीचे बकुलगंध हृदयात घमघमत राहून आपले जीवन परिपूर्ण व्हावे म्हणून या विनायकाचे अखंड पूजन गरजेचे आहे.
विघ्नहर्ता विनायकाचे मी पामर काय बरे शब्दचित्र रेखाटणार? अखिल सृष्टीचा पालनहार असलेला हा ‘विनायक’ जो मला कळला तो असा. पाहा बरं पटत असेल तर.
‘विनायक’ या शब्दातील पहिलंच अक्षर आहे ‘वि’ माझ्या मते ‘वि’ म्हणजे विद्या,‘वि’ म्हणजे विनय, ‘वि’ म्हणजे विकास. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम गरजेचे आहे ते निखळ आणि सखोल विद्येची आणि ‘विद्या विनयेन शोभते’ ही उक्ती तर सर्वश्रुतच आहे नाही का? विद्या म्हणजे फक्त विद्याभ्यासच का? तर नाही. विद्या म्हणजे सखोल ज्ञान. खरं तर माणूस हा कायमच विद्यार्थी असतो. आयुष्याच्या वळणवाटेवर कायमच पावलापावलांवर तो काही ना काही शिकतच असतो. रिपुंनी मळलेल्या, झाकोळलेल्या आभाळातून मनशांतीकडे नेणारा वसंतोस्तव म्हणजे विद्या किंवा ज्ञान. याच ज्ञानाचे स्त्रोत म्हणजे आत्मविष्काराच्या वेदीचेच नाव आहे ‘विनायक’.
‘विनायक’ या अक्षराच्या पुढील शब्द आहे तो म्हणजे ‘ना’. ‘ना’ म्हणजे नाद . ‘ना’ म्हणजे नावीन्य. आयुष्यातील गोंदण गीताच्या सुरेल तसेच सुस्वर लकेरीसाठी गरजेचे असतो तो नाद ज्याला इंग्रजीत ‘रिदम’ म्हणतात. अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर आज प्रत्येकजण येनकेन प्रकारेण प्रवास हा करतोच करतो. कधी कार, कधी बस तर कधी चालत देखील. प्रत्येक गाडीचा एक ‘रिदम’ असतो म्हणजे एक विशिष्ठ वेग असतो की जो चटकन बदलला तर गाडीचा अपघात होतो. चालतानाही तसेच, जर भराभर चालू किंवा पळू लागलो तर धडपडण्याची भीती असते तोच नाद किंवा रिदम नावीन्याने तसेच अखंडपणे टिकवून धरण्याची गरज आहे आणि त्याकरिता सातत्य आणि एकाग्रता वाढवणे गरजेचे आहे. तीच एकाग्रता, तोच नाद हा ‘विनायकाच्या’ ‘ना’ या शब्दात दडलेला आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.
‘विनायक’ या शब्दातील पुढील अक्षर ‘य’ असे आहे. ‘य’ म्हणजे ‘यमक’. ‘य’ म्हणजे ‘यश’. ‘य’ म्हणजे ‘यथार्थ’ जीवनातील जीवन, कर्म आणि कष्ट याचे यथार्थ समीकरण जुळवून आणण्याकरिता ‘विनायक’ या शब्दातील हा ‘य’ आत्मसाद करणे प्रत्येकालाच गरजेचे आहे असे नाही का वाटत आपल्याला?
‘विनायक’ या शब्दातील अखेरचा शब्द आहे ‘क’. ‘क’ म्हणजे कल्पित कर्मयोग पण कसा तर रचनात्मक. आपण आपले कर्म हे आपल्या योग सामर्थ्याने तसेच मनाच्या सामर्थ्याने रचनात्मकरीत्या आयुष्याला एक सुयोग्य सुबक आकार देण्याकरिता घेतलेला आधार म्हणजे ‘विनायक’ या शब्दातील अखेरचे; परंतु अत्यंत महत्त्वाचे ‘क’ हे अक्षर आहे.
कसं आहे ना की, आत्म्याच्या तळापासून आयुष्याच्या चढउतारात आपल्याला वेगवेगळे अनुभव हे येतच असतात. त्यात काही गोड तर काही कडू असतात. या वैशाख वणव्यात होणारी तगमग ही आपल्या आत्म्याच्या तळापासून ढवळून काढते नि अखेरीस आपले मूठभर मातीत रूपांतर करते. फक्त ती तारीख, तो क्षण मात्र कुणालाच माहिती नसतो. तो माहिती असतो तो त्या विघ्नहर्त्या गणाधीशालाच. त्याला ज्याचे माघी चतुर्थीच्या सुमुहूर्तावर अधिष्ठापन करून अखेरीस दहा किंवा अकरा दिवसांने विसर्जन पाण्यात करतो आणि अखेरीस तो त्याच्या मूळ ठिकाणी पोहोचतो. आपले शरीर देखील पंचमहाभुतांनी बनलेले आहे. त्याचे देखील अखेरीस विसर्जनच केले जाते आणि आपण देखील आपल्या देहाचा त्याग करून आपल्या आत्म्याला मुक्त करून ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ या उक्तीप्रमाणे आसमंतात भरून राहातो ते अगदी तसेच जसे विनायक या चराचरांत चैतन्यस्वरूप भरून उरतो.
त्यामुळे प्रत्येक सजीव निर्जीवाची एक्सपायरी ही त्याच्या जन्मासोबतच ठरलेली आहे. म्हणूनच ती तारीख लक्षात घेऊन या, ‘विनायक’ या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या आणि आपल्या मनमंदिरात त्याची कायमची प्रतिष्ठापना करून ठेवा आणि म्हणा,
‘गणपती बाप्पा मोरया’