मृणालिनी कुलकर्णी
भारत एक प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियंत्रणाखाली असलेली शासनव्यवस्था! यामुळेच भारत हा स्वयंशासित प्रदेश आहे. २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही व्यवस्थेसह राज्यघटना अस्तित्वात आली. म्हणजेच भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. राष्ट्राचा आत्मा असलेल्या संविधानाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून ब्रिटिश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाला. भारतीयांना स्वतंत्र विचाराचे, स्वातंत्र्याचे अधिकार सापडले. देशासाठी, या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव भारतात सर्वत्र आनंदाने, उत्साहाने, अभिमानाने साजरा केला जातो. या सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावे म्हणून देशभर राष्ट्रीय सुट्टी देण्यात येते. प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर मोठ्या थाटात होणाऱ्या कार्यक्रमाकडे साऱ्या जगाचे लक्ष असते. मुख्यतः लष्कराच्या तिन्ही दलांचे संचलन आणि भारताच्या संरक्षणाच्या शस्त्रांचे प्रदर्शन पाहताना ऊर भरून येतो. दिल्लीच्या राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, राष्ट्रगीत, २१ तोफांची सलामी, अमरज्योती स्मारकाजवळ शहिदांना श्रद्धांजली, लष्करी संचालनाकडून राष्ट्रपतींना मानवंदना, ऐतिहासिक लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे देशाला उद्देशून भाषण, विविध राज्यांचे आपली पारंपरिक, सांस्कृतिक वारसा जपणारे कलाविष्कार, निवडलेल्या विषयांची चित्ररथावरची विरासत पाहताना आपण एकरूप होतो.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनन्य असाधारण धैर्य, कर्तृत्व दाखविणाऱ्या भारतीय सैनिकांना अशोक, परमवीर चक्र… तसेच इतरही अनेक पदके प्रदान करून सन्मान केला जातो. त्याचबरोबरीने पोलीस, अग्निशामक, नागरी संरक्षण अशा अनेक दलातील सेवकांचा सुद्धा सन्मान करतात. आपत्तीकाळात पटकन निर्णय घेऊन धाडस दाखविणाऱ्या बालकांना शौर्य पुरस्काराने गौरवतात. भारताच्या भविष्याचा प्रगतीसाठी, विकासाठी अनमोल योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावान व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान करतात. या दिवशी बाहेर राज्यातील प्रमुख वास्तू, सरकारी कार्यालय, सोसायटी, रस्त्याचा दोन्ही बाजू विद्युत रोषणाईने झगमगत असतात. शालेय मुलांच्या प्रभात फेरीतील घोषणा, फलक लक्ष वेधून घेतात. शाळा, महाविद्यालयात, राहत्या सोसायटीत प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या स्पर्धांमुळे लोकांचा सहभाग वाढतो. अशा कार्यक्रमांतून नागरिक प्रजासत्ताक दिनाशी जोडले जातात. देशभक्तीपरच्या गीतांनी साऱ्या माहोलमध्ये चैतन्य पसरलेले असते. (संविधान विविधतेला प्रोत्साहन देतो.) असा हा लोकशाहीचा सार्वभौम सोहळा “मी भारतीय आहे” याची जाग देतो. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मुख्य भाग, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही भारताच्या लोकशाहीची राष्ट्रीय मूल्ये आजही जोपासली जातात. याचे उत्तम उदा. सामान्य कुटुंबातून आलेले नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू, एकनाथ शिंदे अनुक्रमे पंतप्रधान, राष्ट्रपती, आणि मुख्यमंत्री झाले.
अनेक भाषा, प्रांतीय रितिरिवाज वेगळे असूनही एकता आहे हे भारताचे वैशिट्य! हीच विविधता मे एकता आणि समृद्ध सांस्कृतिक संस्कृती जतन करण्यासाठी आणि जगाच्या बरोबरीने वाटचाल करण्यासाठी २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाची थीम, ‘‘स्वर्णिम भारत : विरासत आणि विकास’’ स्वर्णीम भारत: सुवर्ण भारत. अखंड भारत स्वर्णीम भारत होता. हजारो वर्षांचा जुना इतिहास सांगतो. भाषा, ज्ञान, विज्ञान, गणित (शून्याचा शोध), खगोलशास्त्र, आयुर्वेद, योगा, शिल्पकला (लेण्या) अध्यत्म, धर्म आणि तत्त्वज्ञान या साऱ्या ज्ञानशाखेच्या सखोल अभ्यासामुळे भारताने जगाला मोठा वारसा दिला आहे. हेच भारताचे सुवर्णयुग ! असे ऐकले आहे, भारतातून सोन्याचा धूर निघत होता. विरासत : भारतात प्राचीन आणि आधुनिकता, परंपरा आणि नवीनता याचा सुंदर गोफ विणलेला आहे. पुरातन, प्राचीन परंपरा लाभलेल्या काही ऐतिहासिक, अध्यात्मिक वास्तू, काही मंदिरे, अजंठा, वेरूळ, खजुराहो येथील शिल्पकला, अभयारण्ये, बर्फाच्छादित हिमालयाची हिमशिखरे, सह्याद्रीचे गड किल्ले, समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्याने नटलेली काही राज्ये हे सारे पर्यटकांना आकृष्ट करतात. भारतात प्रत्येक कोसावर भाषा बदलते. सण, उत्सवात प्रत्येक राज्याची प्रथा, परंपरा, पोशाख, पाककृती ही त्या राज्याच्या संस्कृतीची ओळख असते. हाच अनेक पिढ्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा. हीच आपली समृद्ध विरासत.
विकास : आजच्या २१ व्या शतकात समाज, समाजातील प्रश्न पूर्णपणे बदललेत. माध्यमांची क्षमता वाढलीय, डिजिटल युगामुळे सारे व्यवहार पारदर्शक झाले. वेळ वाचतो, दगदग कमी झाली. आज भारत विज्ञान, आरोग्य, आयटी, अंतरिक्ष यांत खूप प्रगत आहे. अंतरिक्ष क्षेत्र आणि संरक्षण खात्यांत स्वबळावर संशोधन आणि निर्मिती आणि निर्यातही करत आहे. दळणवळणाचे रस्ते, फ्लायओव्हर, ट्रेन, हवाई विमाने या साऱ्या वाहतुकीच्या साधनांत अनेक पटीने सुधारणा होत असल्याने सारी राज्ये जोडली गेली आहेत. भारतीय वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळत आहे. तरीही आजही समाजात काही प्रश्न निश्चित आहेत. अवकाशातील भरारी, समानता, वैज्ञनिक दृष्टिकोन, नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारताचा सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करायचा आहे. ‘‘समर्थ भारत, आत्मनिर्भर भारत”च्या प्रवासांत प्रत्येक भारतीयांचा हातभार लागल्यास “विरासत भी, विकास भी’’ स्वप्न लवकर सत्यात येईल.
[email protected]