ओंजळ – पल्लवी अष्टेकर
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही ना काही चिंता भेडसावत असते. सतत चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे व्यक्तीच्या रोजच्या जीवनावर, आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एखाद्या गोष्टीविषयी वारंवार चिंता करण्यामुळे व्यक्तीला अस्वस्थता, अनिश्चितता व असुरक्षितता जाणवते. चिंतेची कारणे असंख्य आहेत. यात ताणतणाव असणे जसे की वैयक्तिक समस्या, कौटुंबिक समस्या, कामाचा ताण, आर्थिक समस्या यांचा समावेश होतो. शारीरिक व मानसिक समस्या उदा. डिप्रेशनसारखे मानसिक आजार यांचा समावेश होतो. शारीरिक आजार जसे की, हृदयविकार, मधुमेह यांची सुरुवात होते.
काही लोकांना जीवनातील मोठे बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या पेलवता येत नाहीत, जसे की नवीन नोकरी, घर बदलणे, मुलांचा जन्म इ. आसावरीच्या आईचे ती आठवीत असतानाच निधन झाले. तिचे वडील एका कारखान्यात कामाला होते. आसावरीला धाकट्या दोन बहिणी होत्या. अचानक घर सांभाळण्याची जबाबदारी आसावरीवर येऊन ठेपली. तिने दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिक्षण बंद केले. आता घरची कामे करण्यातच तिचा दिवस जाऊ लागला; परंतु आसावरीने पुढे शिकावे अशी तिच्या आत्याची इच्छा होती. आत्याने आसावरीला पुढील शिक्षण घेण्याविषयी खूप समजावले. आसावरीच्या शिक्षणाचा भार आत्याने उचलला. आसावरीच्या आत्याच्या भक्कम आधारामुळे पोरींचे शिक्षण व घरकामाचा ताळमेळ जमू लागला. या अचानक उद्भवलेल्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांना सोपे गेले.
मेंदूत रसायनांचे असंतुलन चिंता निर्माण करू शकते. तज्ज्ञांच्या मते, मेंदूत ‘न्युरोट्रान्समीटर’ नावाच्या रसायनांचे संतुलन बिघडल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. तसेच जीवनात येणाऱ्या भावनिक अनुभवांमुळे चिंता वाढू शकते. उदा. नाते तुटणे, दु:खदायी घटना इ. काही लोकांमध्ये चिंता, अस्वस्थता ही अानुवंशिक असू शकते.
अपुरी झोप झाल्यास, मन अस्वस्थ होऊन चिंता वाढू शकते. आहार व जीवनशैलीचा चिंतेशी निकटचा संबंध असतो. व्यायामाचा अभाव, असंतुलीत जीवनशैली, अनियमित आधार या गोष्टी चिंतेला कारणीभूत ठरू शकतात. तसेच एकलकोंडेपणा, सामाजिक असुरक्षितता, पर्यावरणातील बदल या गोष्टींमुळेही चिंता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक कलह, नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव या गोष्टी नैराश्याला कारणीभूत ठरतात.
मृदूला एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी. तिचा स्वभाव स्वत:कडून अति-अपेक्षा ठेवण्याचा होता. त्यानुसार काम करण्याचा दबाव तिच्यावर सतत असे. त्यामुळे ती नेहमी काळजीत असे. यासाठी तिने समुपदेशकाचा सल्ला घेण्याचे ठरविले. समुपदेशकांना भेटून आपली व्यथा तिने त्यांना सांगितली. समुदेशकांनी तिला दबावरहित होण्यासाठी काही मार्ग सांगितले. जसे की, नियमितपणे योगाभ्यास करणे. अधे-मधे गेट-टुगेदर करून सर्वांच्यात मिळून-मिसळून वागणे. तेव्हा आपली सुख-दु:खे इतरांसोबत शेअर होतात. यातून स्वत:बद्दलच्या अति-अपेक्षा कमी होण्याची शक्यता बळावते. तसेच नेहमी पूर्णत्वाच्या ध्यासामुळेही व्यक्तींची चिंता वाढू शकते.
शारीरिक लक्षणांमध्ये घाम येणे, कंप, हृदय वेगाने धडधडणे, डोकेदुखी, पोटात गडबड होणे, अतिथकवा, चक्कर येणे या गोष्टींचा समावेश होतो. मानसिक लक्षणांमध्ये चिडचिडेपणा, झोप पूर्ण न होणे, समाजापासून दूर राहणे, अवास्तव विचार करणे, कामात मन न लागणे या गोष्टींचा समावेश होतो.
चिंतेचे प्रकार अनेक आढळतात.
- सामाजिक चिंता विकार : यामध्ये व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी वावरताना खूप घाबरटपणा व अस्वस्थपणा जाणवतो. समाजातील विविध लोकांच्या प्रतिक्रियेमुळे ही व्यक्ती चिंताग्रस्त होते.
- सामान्यीकृत चिंता विकार : सामान्यीकृत चिंता विकारामध्ये व्यक्तीला एखाद्या विशिष्ट कारणाशिवाय सतत चिंता व काळजी जाणवते. यामध्ये आरोग्य, आर्थिक समस्या, दैनंदिन कामकाज, कौटुंबिक समस्या इ. बाबत अधिक
चिंता जाणवते.
माधवराव नोकरीत असताना साहजिकच ते आपल्या कामात व्यस्त असायचे; परंतु ते रिटायर झाल्यावर वेळ खायला उठला. कुटुंबातील इतर मंडळी आपापल्या कामात व्यस्त असायची. माधवरावांना मात्र अनेक चिंता सतावू लागल्या. ते स्वत:बद्दल विचार करण्यात तासनतास व्यस्त राहू लागले. कुटुंबीयांना त्यांच्यातील हा बदल लक्षात आला. मग कुटुंबीयांनी मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेतली. मानसोपचारतज्ज्ञांनी अनेक गोष्टी सुचविल्या. त्यात करमणुकीचे कार्यक्रम, आपल्या वयातील मित्र-मंडळींसोबत सहली काढणे, गेट-टुगेदर करणे, घरातील लहान-सहान कामे करणे या व अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. अर्थात हे बदल अगदी तातडीने होतील असे नाही; परंतु त्या दिशेने वाटचाल करत राहणे जरूरीचे होते. आर्थिक कामे करणे, आपला वेळ सकारात्मक गोष्टींमध्ये घालविणे तितकेच आवश्यक होते. माधवराव या नवीन बदलांमध्ये हळूहळू रूळत चालले होते.
- फोबिया : फोबिया म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू, परिस्थिती, प्राणी किंवा ठिकाण यांच्याबद्दल असलेली असामान्य भीती. जसे की उंची, अंधार, प्राण्यांची भीती. अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या भीतीमुळे शरीर व मनावर परिणाम होण्याची शक्यता दाट असते.
- पॅनिक विकार : पॅनिक विकारामध्ये व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, हृदयाचे जोरदार धडधडणे अशा स्वरूपात पॅनिक अॅटॅक येतात. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हे अॅटॅक येऊ शकतात.
- ऑबसेसिव्ह : कंपल्सिव्ह विकार – या विकारामध्ये व्यक्तीला काही विकार सतत मनात येतात व त्यामुळे ती व्यक्ती एखादी कृती सतत करते. जसे की, वारंवार हात धुणे, काही गोष्टी ठरावीक पद्धतीने लावणे इ.
- विभक्ती चिंता विकार : यात व्यक्तीला एखाद्या प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याची तीव्र भीती आणि अस्वस्थता जाणवते. हा विकार लहान मुले, प्रौढ व्यक्ती यांच्यात प्रामुख्याने आढळतो.
- आरोग्य चिंता विकार : या विकारामध्ये व्यक्तीला आपल्या आरोग्याबद्दल सतत चिंता असते. व्यक्तीला कोणत्याही लहानशा लक्षणांमुळे मोठ्या आजाराची भीती वाटते. त्यामुळे अशी व्यक्ती वारंवार डॉक्टरांकडे जाते.
- पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑडर : हा विकार एखाद्या आघातानंतर किंवा एखाद्या गंभीर घटनेनंतर उद्भवतो. यात व्यक्तीला त्या घटनेचे सतत विचार, दु:स्वप्न येतात. त्यानंतरच्या परिस्थितीत व्यक्तीला सामान्य जीवन जगणे कठीण जाते.
यामध्ये व्यक्तीला तो गंभीर आजारी झाल्याची किंवा होणार असल्याची तीव्र भीती वाटते, जरी व्यक्तीला कोणतेही परिमाण नसले तरी. चिंता कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. यात नियमितपणे व्यायाम, श्वासोच्छ्वासाचे तंत्र, ध्यान व मेडिटेशन, पुरेशी झोप, संतुलित आहार व सामाजिक समर्थन अशा गोष्टींचा समावेश होतो.
यातील आजारी व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांशी, नातलगांशी, मित्रांशी आपल्या भावना व चिंतेची चर्चा करावी. तसेच आपला मानसिक आजार थांबविण्यासाठी मानसिकरीत्या सुदृढ जीवन जगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे चिंताग्रस्त आयुष्य जगण्यापेक्षा आपल्या वेदना, दुःख इतरांशी बोलून तणावरहित आयुष्य जगा.
करमणुकीचे उपक्रम चिंता, तणाव कमी करण्यास मदत करतात व स्वस्थतेची जाणीव वाढीस लावतात. आपला रिकामा वेळ स्वतःच्या आवडी पूर्ण करण्यात घालविणे. यामुळे तणाव कमी होतो. छंद जोपासल्यामुळे आराम मिळतो.
आधारगट, योगाभ्यास, दृष्टीचे व्यायाम या गोष्टी व्यक्तीला शांत ठेवण्यास मदत करतात. चिंता दूर सारा व आरोग्यसंपन्न आयुष्य जगा.