Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘धरतीका प्यार पले...’

‘धरतीका प्यार पले…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

प्रसिद्ध अमेरिकी विचारवंत आणि साहित्यिक राल्फ वॅल्डो इमर्सन यांची दृढ श्रद्धा होती की, निसर्ग केवळ सजीवच आहे असे नाही तर तो डिवाईन म्हणजे पवित्र आहे. भारतीय संस्कृतीत आपण युगानुयुगे हे गृहीतच धरलेले होते. त्यामुळेच आपण वृक्ष, प्राणी, नद्या, डोंगर, पृथ्वी, चंद्र, सूर्य यांचा संबंध दैवत्वाशी जोडत आलो.

‘ये वादियाँ ये फिजाएं बुला रही हैं तुम्हें…’

जे जे मानवजातीच्या हिताचे ते ते आपल्याच पिढीने वापरून संपवून टाकणे हा आजच्या कॉर्पोरेट जगाचा अजेंडा आहे. भारतीय संस्कृतीची शिकवण याच्या नेमकी उलटी! ईश्वराने दिलेल्या नैसर्गिक वरदानांचा संयत वापर करून ती पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याकडे, त्यांचे प्रेमाने संवर्धन करण्याकडे, आपला कल होता. त्यामुळे काही पवित्र वृक्ष तोडणे, काही प्राणी मारणे हे पाप मानले जाई. आधुनिक न्यायव्यवस्थेत जरी ‘अर्थ’पूर्ण व्यवहाराला महत्त्व आल्याने असे ‘पापी’ कायद्याच्या कचाट्यातून तातडीने सुटत असले तरी सश्रद्ध आदिवासी बिष्णोई समाज आजही अशा श्रद्धांसाठी प्राणपणाने लढताना दिसतो तो आपल्या सांस्कृतिक वारशामुळेच!

पाश्चिमात्य जगात मात्र ‘सगळे जग हे देवाने केवळ मानवजातीच्या उपभोगासाठीच निर्माण केले आहे’ असे त्यांचे धर्मग्रंथ सांगतात. आजच्या उद्ध्वस्त, मरणासन्न पर्यावरणाच्या मागचे तेही एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र कवी कोणत्याही भाषेतले असोत, नेहमीच स्वतंत्र विचार करणारे असतात. ते लिखित साहित्य, धर्मग्रंथातील कालबाह्य आदेश, समकालीन जनरीत यापेक्षा वेगळा विचार करू शकतात. कवी आपल्या अंत:प्रेरणेला महत्त्व देतात. याच कारणामुळे पौर्वात्य अध्यात्माने प्रभावित झालेले अमेरिकी विचारवंत, साहित्यिक इमरसन निसर्गात देव पाहत असत. त्यांच्या धर्मशास्त्रात प्रिस्क्राईब केलेल्या एकाच अदृश ईश्वराची संकल्पना सगळ्या अस्तित्वापर्यंत विस्तारित करण्याची क्षमता त्यांच्या कविमनात होती. ते एका दीर्घकवितेत म्हणतात की,

“The Gods talk in the breath
of the woods,
They talk in the shaken pine,
And full of the long reach
of the old seashore
with dialogue divine.”
(देव वनराईत वाहणाऱ्या
वाऱ्यातून बोलतात,
पाईन वृक्षाच्या पानातील सळसळीतून
त्यांचे शब्द ऐकू येतात. दूरच दूर पसरलेल्या
सागर किनाऱ्याच्या गाजेतून
त्यांचे पवित्र मंत्रपठन सुरू असते.)

आज इमर्सन यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे? – साहीर लुधियानवी साहेबांचे एक गाणे! सिनेमा होता बी. आर. चोप्रा दिग्दर्शित १९६७ चा ‘हमराज’. त्यात अनेक दिग्गज होते – राजकुमार, सुनील दत्त, बलराज सहानी, मदन पुरी, जीवन, इफ्तेखार, अन्वर हुसैन आणि हेलन. पदार्पणालाच नायिका झालेली विमी आणि बेबी सारिकाही होत्या. हमराजसाठी सर्वोत्तम पार्श्वगायनाचा फिल्मफेयर पुरस्कार महेंद्र कपूर यांना मिळाला. सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफीचे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेयर एम. एन. मल्होत्रांना मिळाले होते. शिवाय ‘सर्वोतम हिंदी फिचर फिल्म’चे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.

साहिर लुधियानवींची सर्वच गाणी लोकप्रिय झाली. त्यात होते महेंद्र कपूरने गायलेले ‘तुम अगर साथ देने का वादा करो’, हे संगीतकार रवीजींनी एका रम्य ठेक्यावर बसवलेले गाणे, ‘ना मुंह छुपाके जियो और ना सर झुकाके जियो’, हे कव्वालीवजा गीत आणि महेंद्र कपूरकडून आशाताईंबरोबर गाऊन घेतलेले ‘तू हुस्न हैं मैं इश्क हुं, तू मुझमे हैं मैं तुझमे हुं’ हे गाणे. मात्र आज इमर्सनची आठवण दिली ती १९६८ साली ‘बिनाका गीतमाला’च्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ‘ए नीले गगन के तले धरती का प्यार पले’! या गाण्याने. त्याला अतिशय भावानुकूल संगीत दिले होते रवीजींनी. साहिर लुधियानवी यांचे गूढरम्य शब्द होते-
“ए… नीले गगन के तले, धरती का प्यार पले,
ऐसेही जग में, आती हैं सुबहें,
ऐसेही शाम ढले…”
साहिरची ही कविता आपल्याला एका वेगळ्याच मूडमध्ये घेऊन जाते. सकाळची प्रसन्न वेळ आहे. वर निळेभोर आकाश कोणत्याही आधाराशिवाय एखाद्या विशाल तंबूसारखे अधांतरीच विसावले आहे. खाली हिमालयाचा बर्फाने आच्छादलेला डोंगर. आजूबाजूला हिरव्यागार वृक्षवल्लींची गर्दी. उंचच उंच वृक्ष आणि त्यांना लगडलेल्या वेली आणि तिथे तुम्ही आणि तुमची मनस्वी प्रेयसी! मनाला उन्मुक्त करणारी कल्पना!

गाण्याच्या वेळी सिनेमातही हेच सुरू आहे. राजकुमार विमीचा रोमान्स वनराईने नटलेल्या एका हिरव्यागार डोंगरावर सुरू आहे. गाण्याचा कथेशी तसा काहीही संबंध नाही पण साहिरने इथे फार वेगळा विचार मांडला, खूप स्वातंत्र्य घेतले होते. कशाबशा दोन-तीन कडव्यांच्या गाण्यात निसर्ग जणू सजीव आहे असेच गृहीत धरले आहे. ईश्वरी प्रेम सृष्टीतील कणाकणांतून व्यक्त होत आहे असे सूचित केले आहे आणि म्हणून आपणही त्यात सामील होऊ असे हळुवारपणे सूचित केले होते.

नायक राजकुमार विमीला म्हणतोय, ‘या निळ्या आकाशाच्या घुमटाखाली धरणीचे प्रेम बघ कसे फुलते आहे. त्या प्रेमाच्या विशाल दालनात अशीच रोज या सुंदर जगाची सकाळ उगवत असते आणि अशीच हळुवारपणे संध्या अस्तंगत होत असते.
जेव्हा सकाळ उगवते तेव्हा कळ्यांवर दवबिंदूचे अमृत थेंब पडलेले असतात. ती जणू त्या वत्सल विश्वनिर्मात्या ईश्वराची योजनाच असते. कारण दवबिंदूंना त्या सुंदर कळ्यांचा सहवास हवा असतो तर कळ्या उमलून जेव्हा त्यांची फुले होतात तेव्हा त्या दवबिंदूतील आर्द्रता शोषून त्यांना जास्त वेळ ताजेतवाने राहायचे असते. असे हे दोघांना लाभदायी प्रेम निळ्याभोर आकाशाखाली रोज सुरू असते. (तेव्हा आपणही प्रेमाचा स्वर्गीय आनंद घेऊ या.)
‘शबनम के मोती, फूलों पे बिखरे
दोनों की आस फले…
ए… नीले गगन के तले, धरती का प्यार पले’

प्रिये, या मंदमधुर झुळकांचा आनंद घे. त्या वेली बघ वाऱ्यावर कशा आनंदाने डोलत आहेत. जणू त्या झाडांना आलिंगन देत त्यांच्याशी खेळकर प्रणयक्रीडेतच मग्न आहेत आणि रोज निळ्या गगनाच्या छताखाली प्रेमाचे हे असेच मुक्त प्रकटीकरण सुरू असते. (म्हणून आपणही प्रेमाचा आस्वाद घेऊ या.)
‘बलखाती बेलें, मस्ती में खेलें
पेड़ों से मिलके गले…
हे… नीले गगन के तले, धरती का प्यार पले.’
तिकडे ते नदीचे अवखळ पाणी बघ. मोठ्या जलाशयात प्रवेश करण्यासाठी ते बघ कसे आतुरपणे उड्या मारत चालले आहे. शेवटी त्याला अतिविशाल समुद्रात विलीन होऊन जायचे आहे. प्रेमात स्वत:चे संपूर्ण समर्पण साधायचे आहे.
‘नदीया का पानी, दरिया से मिलके,
सागर की ओर चले…
ए…, नीले गगन के तले, धरती का प्यार पले.’
खरे तर सिनेमा या दृकश्राव्य माध्यमात सगळे कसे स्पष्ट, थेट, उघड, अनेकदा तर लाउड असावे लागते. पण साहिरसारखे सिद्धहस्त कवी अशा मुग्ध, संदिग्ध, सुखद रचनातून आगळाच प्रसन्न अनुभव देऊन जातात. कधीकधी तोही आनंद घ्यायलाच हवा ना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -