श्रीनिवास बेलसरे
पु.ल. देशपांडे यांची कथा, नायक सुनील दत्त, नायिका नंदा, सिनेमा हिंदी आणि दिग्दर्शक वसंत जोगळेकर! असा सिनेमा असू शकतो का? तर हो. तसाच नाही तर तोच सिनेमा येऊन गेला १९६३ साली. “पंचदीप चित्र”ने निर्माण केलेल्या या सिनेमाचे नाव होते ‘आज और कल’! आणि तो बेतला होता पु.लंच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकावर. संवादलेखन होते अख्तर-उल-इमान यांचे. ‘सुंदर मी होणार’च्या संवादापेक्षा ‘आज और कल’चे संवाद कितीतरी पट उजवे होते हेही इथे नोंदवण्यासारखे आहे! सुनील दत्त आणि नंदा या जोडीसोबत होते अशोक कुमार, तनुजा, धुमाळ, देवेन वर्मा, आगा आणि सुदेश कुमार. हिंमतपूरचे राजे बलबीर सिंग (अशोक कुमार) अतिशय पारंपरिक विचारांचे आणि कडक शिस्तीचे आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे आपल्या चारही मुलांशी असलेले संबंध तणावपूर्ण झालेत. राजकुमार प्रताप सिंग आणि राजेंद्र सिंग वडिलांना खूप घाबरतात. मोठी मुलगी हेमलता तर राजेसाहेबांच्या दहशतीमुळे जवळजवळ पंगू झालेली आहे. तिला खुर्चीतून उठता-बसता किंवा चालताही येत नाही. खरे तर राजेसाहेबांचे त्यांच्या अपत्यांवर प्रेम आहे पण ते ‘परिचय’मधल्या प्राणसारखे! त्यांच्याशिवाय कुणालाच न दिसणारे, न जाणवणारे!
राजेसाहेब राजकुमारी हेमलता बरी व्हावी म्हणून तिच्यावर अनेक उपचार करतात. स्वत: राजेच असल्यामुळे ते अनेक डॉक्टरांना राजवाड्यावर बोलावून, त्यांची तिथेच राहायची व्यवस्था करून राजकुमारीवर उपचार करवून घेतात. पण कोणत्याच उपचारांना तिची तब्येत प्रतिसाद देत नाही. मग ते अजून एका डॉक्टरला, डॉ. संजय यांना (सुनील दत्त), राजवाड्यावर घेऊन येतात. त्यांच्या अपेक्षेपेक्षा हा डॉक्टर खूपच तरुण आणि देखणा असतो. मात्र तो आधुनिक विचाराचा असल्यामुळे त्याला राजवाड्यातले शिष्टाचार, त्यातली वेगवेगळी बंधने आवडत नाहीत. तो राजवाड्यातले वातावरणच बदलून टाकतो. त्याच्या लक्षात आलेले असते की, राजकुमारीचे अपंगत्व शारीरिक नसून ते तिच्या मनात खोल रुजलेल्या नैराशाने निर्माण झालेले आहे. त्यामुळे तो तिच्यावर उपचार करतानाही तिच्या कलाकलाने घेतो. तिला तिटकारा आल्यामुळे आधीची सर्व औषधे बंद करून टाकतो. त्याच्या उपस्थितीमुळे सर्व राजपुत्रांत एका मोकळेपणाची, स्वातंत्र्याची भावना जागी होते. त्यांना जीवनात नवी आशा, नवा उत्साह वाटू लागतो.
या सर्वांमुळे डॉक्टर-रुग्ण नात्यातले अंतर कमी कमी होत राजकुमारी डॉ. संजयच्या प्रेमात पडते. तिच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाल्याने, केवळ नैराश्याने निर्माण झालेले अपंगत्व, हळूहळू कमी होत जाते. एकदा व्हील चेयरवरून डॉ. संजय तिला फिरायला घेऊन जाताना एक गाणे म्हणत असतो. त्यावेळी तो मागे मागे जात मुद्दाम एका कड्याच्या अगदी टोकाजवळ पोहोचतो. आता पुढचे पाऊल – आणि तो खोल दरीत कोसळणार! असा क्षण येतो…आणि एक चमत्कार घडतो! हेमलता खुर्चीतून उठून त्याला सावध करण्यासाठी मोठ्याने ओरडते! त्याला वाचवण्यासाठी ती त्याच्याकडे चालत येणार एवढ्यात तोच धावत जाऊन तिला धरतो आणि तिच्या लक्षात आणून देतो की त्याक्षणी ती तिच्या पायावर उभी राहिली आहे! त्या नाट्यमय क्षणी तो जे गाणे गात असतो ती साहीर लुधियानवी यांची गझल त्याकाळी खूप लोकप्रिय झाली होती. बिनाका गीतमालात सर्वात जास्त लोकप्रिय १६ गाणी वाजवली जात. मात्र बिनाकाने वर्षभर वाजवलेल्या सर्व गाण्यांना त्यांच्या लोकप्रियतेनुसार क्रमांकही दिले जात. त्या वर्षीच्या ३२ सर्वोत्तम गाण्यात रफीसाहेबांनी गायलेले हे गाणे २२व्या क्रमांकावर होते.
खोल नैराशामुळे हेमलताला एकंदर जगण्यातच अर्थ वाटेनासा झाला आहे. डॉ. संजय तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात पुन्हा ती काही सर्वसाधारण रुग्ण नाही, बुद्धिमान आहे. त्यामुळे तिला खोटा दिलासाही उपयोगी पडणार नाही. म्हणून संजय तिच्यातील स्वत्वाची भावना, आत्मभान जागे करण्याचा प्रयत्न करताना म्हणतो, ‘प्रिये, जरा बघ हे सुंदर वातावरण, ही खोल हिरवीगार दरी, कशी तुला बोलावते आहे. इथली निरव शांतता किती सुखद आहे. जणू तीच आपल्याशी बोलते आहे, तुला निमंत्रण देते आहे, हाका मारते आहे.’ संगीतकार रवी आणि महंमद रफी यांनी अजरामर केलेले साहीरचे ते शब्द होते – ‘ये वादियाँ ये फिजाएं बुला रही हैं तुम्हें, खांमोशियोंकी सदाएं बुला रही हैं तुम्हें.’
ही दरीतली रानफुले बघ. ती रंगीबेरंगी चिमुकली सुंदर फुले तुझ्या ओठांच्या चुंबनासाठी आसुसली आहेत. त्यांना हातात घे, त्यांचा सुवास घे, तुला त्यांचे चुंबनच घ्यावेसे वाटेल इतका त्यांचा सुंगध मधुर आहे. बेधुंद करणारा आहे. हवेच्या झुळका थांबून थांबून अशा उसळी घेताहेत की जणू त्याही तुलाच साद घालून खेळायला बोलावत आहेत-
‘तरस रहे हैं जवाँ फूल होंट छूनेको,
मचल मचलके हवाएँ बुला रही हैं तुम्हें.’
मागे बघ, सूर्यप्रकाश कसा वेगाने धावणाऱ्या ढगांवर पडून वेगवेगळे विभ्रम तयार करतोय. तुझ्या सुगंधी केशसंभाराकडून जणू थोडा सुंगध उसना घेण्यासाठी ढग कसे खाली उतरत आहेत. ‘तुम्हारी जुल्फोंसे खुशबूकी भीक लेने को, झुकी झुकीसी घटाएं बुला रही हैं तुम्हें.’ नैराशातून आलेल्या हतबलतेमुळे हेमलताच्या पायातील शक्ती गेली आहे. त्यामुळे तिला व्हीलचेयरवर बसूनच फिरावे लागते. तो भयगंड काढून टाकण्यासाठी डॉ. संजय मुद्दाम तिच्या पायांचा उल्लेख करून म्हणतो, ‘नदीच्या पाण्यावर उठणाऱ्या लहरीसुद्धा तुझे गोरेपान पाय बघून अचंबित आहेत. बघ, त्या आपला थंडगार स्पर्श तुला द्यायला उत्सुक झाल्या आहेत.’ ‘हसीन चम्पई पैरोंको जबसे देखा है, नदीकी मस्त अदाएं बुला रही हैं तुम्हें.’ प्रेयसीचा अनुनय करताना संजय स्वत:हूनच आपली भूमिका दुय्यम करून तिला म्हणतो, ‘प्रिये चल, असे मानू या की मी खोटे बोलत असेन. पण मग आजूबाजूचे सगळे अस्तित्वच तुझ्याशी बोलते आहे, हितगुज करते आहे ना? त्याच्या प्रार्थना, त्याचे आशीर्वाद तर स्वीकारशील की नाही? मग ये, या सगळ्या उत्सवात मनापासून सामील हो. ‘मेरा कहा न सुनो उनकी बात तो सुन लो, हर एक दिलकी दुआएं बुला रही हैं तुम्हें.’ साहीरची कसली ही गाणी! प्रियकराने प्रियेचा केलेला कसला हा ऋजू, मृदू, अनुनय! त्याचा हळुवारपणे घेतलेला आस्वाद एकदा अनुभवाचं..