Friday, February 7, 2025
Homeसाप्ताहिककोलाजपरदेशी प्रवाशांना मदत करणारी धनश्री पाटील...

परदेशी प्रवाशांना मदत करणारी धनश्री पाटील…

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा – श्रद्धा बेलसरे खारकर

आपला देश सोडून परदेशी गेलेल्या माणसांना काही अडचण आली तर त्यांनी काय करायचं? कोविड काळातील लॉकडाऊन असो किंवा युक्रेनमधील युद्धस्थिती. शेकडो लोक मातृभूमीला येण्यासाठी धडपडत असतात. धनश्री पाटील तिच्या ‘रेडिओ’ या संस्थेद्वारे अशा लोकांना मदत करते. आजवर तिने १० हजार लोकांना मदत केली आहे.

लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा प्रजासत्ताक दिन

इंजिनीयर असलेली धनश्री पूर्वी दुबईत होती. ती तिथे भारतीय सणांचे मोठे इव्हेंट्स करायची. चांगली स्थिरावली होती. घरच्या काही अडचणींमुळे तिला भारतात यायचे होते. तिने तिकीट काढले आणि कोविडमुळे सर्व विमाने रद्द झाली. दररोज ती भारतीय वकिलाकडे फोन करून पाठपुरावा करायची. जवळजवळ ६ हजार भारतीय दुबईत अडकले होते. काही आजारी होते, काही महिला गर्भवती होत्या, तर काहींच्या नोकऱ्याही गेल्या होत्या. धनश्रीने या लोकांचा एक ग्रुप तयार केला. सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना अन्नधान्य, औषधे पुरवण्यात आली. काहींकडे घरभाड्यासाठीही पैसे नव्हते.

दिवसेंदिवस वातावरणातील अनिश्चितता वाढत होती. लोक अस्वस्थ होते. भारतातील मंत्री, आमदार, खासदारांकडेही पाठपुरावा सुरू होता. ‘वंदेभारत मिशन’मधून भारतातील काही राज्यात विमानसेवा सुरू झाली. काही प्रवासी केरळला पाठवले पण तिथले विलगीकरण आणि तिथून महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास फारच त्रासदायक होता. त्यामुळे महाराष्ट्रात परत नेणाऱ्या विमानसेवेची गरज होती. धनश्रीचा संपर्क दुबईस्थित उद्योजक राहुल तुळपुळे यांच्याशी झाला आणि पहिली २ चार्टर विमाने भारतात आली. नंतर मसालाकिंग धनंजय दातार यांना त्यांचे ४००० कामगार भारतात परत पाठवायचे होते. धनश्रीने त्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. या कामामुळे तिचा फोननंबर फक्त दुबईच नाही तर सौदीमधीलही कामगारांपर्यंत पोहोचला. परत येण्यासाठी मदत मागणारे अनेक फोन येऊ लागले. मग ती परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागली. या कामाचा जगभर विस्तार व्हावा, अशी इच्छा व्यक्त करून डॉ. मुळे यांनी R.E.D.I.O (Rescuing every distressed Indian overseas) ‘रेडिओ’ संस्थेची स्थापना केली. धनश्री त्याची वैश्विक व्यवस्थापक झाली.

आजमितीस ३ कोटींपेक्षा जास्त लोक परदेशात आहेत. त्यांना कधी फसवले जाते, कधी मालकांकडून पासपोर्ट जप्त केले जातात. काहींना एजंट फसवतात. काही निर्दोष तुरुंगात अडकलेले असतात. अशावेळी भारतीय दूतावास मदत करतो पण त्याबरोबर रेडिओ संघटनेचीही मदत होते.

अनेक महिला, फसव्या एजंटांना बळी पडतात. अशा काहीजणी धनश्रीच्या संपर्कात आल्या. दुबईत ‘टीचर’ म्हणून नेलेल्यांना घरकामासारखी कामे करायला भाग पाडले जाते. कधी पासपोर्ट हिसकावून घेतले जातात. त्यांच्याशी संपर्क फार अवघड असतो. त्या कसा तरी संपर्क साधतात; परंतु वकिलातीच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत कुणी आपल्या वकिलातीमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत ते मदत करू शकत नाहीत. धनश्री मध्यस्थाची भूमिका करते. आता अनेक देशातील वकिलातीत तिची चांगली ओळख झाली आहे. तिच्या शब्दाला तिथे किंमत आहे. तिने अनेक महिलांना सोडवून भारतीय दूतावासात आणले, त्यांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करून मग भारतात आणले.

गतवर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. ‘कीव’ शहरातून भारतीय दूतावास दुसरीकडे हलवण्यात येत होता. धनश्रीने स्वत:चा नंबर हेल्पलाईन म्हणून दिला. यावेळी ४८२० विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आले. त्याकाळी तिचा फोन अहोरात्र चालू होता. मुले, त्यांचे पालक, दूतावासातील अधिकारी यांच्याशी संपर्क करून तिने या लोकांना परत आणले. काही मुले सकाळी उठून स्टेशनवर गेली. बाहेर गोळीबार चालू होता. स्टेशनवर युक्रेनी नागरिकांना प्राधान्य दिले जात होते. भारतात बसून हा ‘आंखो देखा हाल’ धनश्री दूतावासातील अधिकाऱ्यांना सांगत असायची.

आखाती देशातील रुग्णालयात एका मृत व्यक्तीचे शव दोन महिने पडून होते. ‘रेडिओ’ टीमच्या मदतीने त्याच्या नातेवाइकांचा शोध अवघ्या तासाभरात लावून केरळमधील त्याच्या नातेवाइकांकडे त्या व्यक्तीचे पार्थिव पाठवण्यात आले. त्यासाठी कागदोपत्री अनेक औपचारिकता कराव्या लागल्या.

मर्चंट नेव्हीमध्ये अडकलेल्या लोकांची संख्या पण खूप होती. बेपत्ता व्यक्तींची माहिती घरच्यांना महिनोंमहिने मिळत नाही. ज्या बंदरात ते अडकले असतील त्या ठिकाणाचे कायदे लागू होतात. अशांची सुटका करणे हे अजूनच कठीण काम. पण रेडिओने अशा अनेकांचीही सुखरूप सुटका केली आहे. काही देशांत कामगार म्हणून गेलेले लोक अपघातात किंवा छोट्या-मोठ्या आजाराने मरण पावतात. त्यांचे मृतदेह विमानाने भारतात आणून घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कधी कधी ‘रेडिओ’कडून घेतली जाते.

अलीकडच्या अशाच एका घटनेत ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय धनश्रीला आला. साधारण २ महिन्यांपूर्वी एक बातमी भारतातल्या वृत्तपत्रात आली होती. ती दुबईतल्या काही व्हात्साप ग्रुपवरही फिरत होती. “हिंगोलीतील तरुणाचा दुबईत मृत्यू. कुटुंबीयाची पार्थिव परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडे धाव.’

मयताचे नाव होते दिलीप जाधव. याबद्दल सांगताना धनश्री म्हणाली, “अनेकांनी माझ्याकडे चौकशी केली पण माझ्याकडे काहीच तपशील नसल्यामुळे मी काही करू शकत नव्हते. त्यात माझे दुबईस्थित बंधू वसंत लोटलीकर यांचा फोन आला. वसंतदादा म्हणजे आमच्या रेडिओचे दुबईतील कोऑर्डिनेटर आहेत. मदत करायची वेळ आली की ते वेळकाळ, पैसा याची फिकीर न करता झोकून देऊन काम तडीस नेतात. वसंतदादाला एम्बसीतून एक चांगली बातमी मिळाली होती. दिलीपचा मृत्यू झाला नसून तो दुबईतील एका दवाखान्यात आहे असे कळले. मी घरच्यांना ही बातमी दिली. दिलीपच्या आईने विनंती केली की एकदा मुलाला पाहायचे आहे. वसंतदादाने व्हीडिओ कॉल करून घरच्यांची दिलीपशी भेट घडवून दिली. दिलीप उंचावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्याच्या कवटीचा निम्मा भाग काढून टाकण्यात आला होता. लक्षावधी रुपयांचा खर्च दुबईच्या ‘होप’ संस्थेचे कौसरभाई यांच्या डोनेशनमधून करण्यात आला. दिलीपची नोकरी गेली होती. दवाखान्याचा अमाप खर्च, दुबईमधील overstay मुळे येणारी कायदेशीर अडचण या सर्व बाबीमुळे दिलीपला भारतात आणणे गरजेचे होते. ‘Skull replecement’ची शस्त्रक्रिया तिथे शक्य नव्हती. आता ही जबाबदारीसुद्धा माझ्याकडे आली. वसंतदादा आणि कौसरभाई यांनी विमानाचा खर्च केला/मी त्याला डॉक्टर मिलिंद भोई, डॉक्टर केदार भोई आणि ससूनच्या डॉक्टरांच्या मदतीने दाखल केले. नुकतीच त्याला कृत्रिम कवटी बसवण्याची शस्त्रक्रिया पार पडली. २ महिने दवाखान्यात राहणे, तिथले उपचार, कवटी काढल्यामुळे भयंकर दिसणारा चेहेरा यामुळे दिलीप खूप निराश होता.

इथे आल्यावर मात्र नेहमी गप्प असणारा दिलीप बोलू लागला. त्याच्या आई आणि भावाची पुण्यात राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. पूर्वी कवटी काढल्याने कपाळावर जखम होती. त्यामुळे दिलीप नेहमी डोक्यावर हात झाकायचा. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर त्याच्या नकळत त्याचा फोटो काढून त्याला दाखवला तेव्हा तो म्हणाला, ‘ताई, मी तर आता हँडसम दिसतोय.’ त्यावेळचा त्याचा आणि माझा आनंद शब्दातीत होता.”

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -