फिरता फिरता – मेघना साने
मित्रहो, महाराष्ट्रात जशी मराठी साहित्य संमेलने होत असतात, तशी इतर देशातही मराठी भाषा संमेलने होत असतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमधून काही कलाकार मंडळी मराठी नाटकेही बसवत असतात. तिथे गणेशोत्सव देखील होत असतात. अमेरिकेप्रमाणे जर्मनीतही मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी महाराष्ट्र मंडळांतर्फे विविध उपक्रम होत असतात. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन सिडनी येथे २५, २६, २७ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. आणि MASI (मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड) या संस्थेने या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आहे.
२००५ साली ऑस्ट्रेलियात जयंत ओक यांच्या गप्पागोष्टी कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकलाकार म्हणून गेले असताना सिडनी व मेलबर्न येथील महाराष्ट्र मंडळातील मराठी जनांचा सहवास मिळाला. महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांना अतिशय प्रेमाने ते आपल्या उपक्रमांबद्दल सांगत होते. पुणे, सातारा, सांगलीकडे मराठी मंडळी तेथे येऊन स्थायिक झाली होती. हनुमानाने आपली छाती उघडून रामाचे दर्शन द्यावे, त्याच भक्तिभावाने आपल्या हृदयात जपलेले मराठीचे प्रेम ही मंडळी सहजपणे दर्शवित होती. तेथील मराठी माणूस नाट्यवेडाही आहेच. एकदा घाशीराम कोतवाल हे नाटक तेथे तालीम करून बसवण्यात आले. मात्र त्याला लागणारे कॉस्च्युम ऑस्ट्रेलियात कसे मिळणार? म्हणून भारतातून (पुण्यातून) ते बोटीने आणण्यात आले होते. सिडनी, मेलबर्न येथील मंडळातील लोकांनी आजवर अनेक मराठी नाटके बसवली आहेत.
एवढंच काय पुढील पिढीलाही मराठीशी जोडून ठेवण्यासाठी इथे मराठी शाळाही सुरू झाल्या आहेत. २०१८ साली सिडनी ऑस्ट्रेलियातील कलाकारांचे नाटक ‘सुखांशी भांडतो आम्ही’चा प्रयोग भारतात होणाऱ्या थिएटर ऑलिंपिकसाठी निवडला गेला. भोपाळ आणि दिल्ली येथे त्यांना प्रयोग करण्याची संधी मिळाली. तेव्हा नाटकातील कलावंतांनी स्वखर्चाने येण्याची तयारी दर्शवली. नाटकाचे लेखक अभिराम भडकमकर हे स्वतः नाटकाला उपस्थित होते. नेपोलियन अल्मेडा हे नाटकाचे दिग्दर्शक अभिमानाने आपल्या टीमबद्दल बोलत होते. ऑस्ट्रेलियात राहूनही आपल्या भाषेशी आणि संस्कृतीशी जोडून राहण्याची येथील लोकांना फार निकड वाटत असते. १९९० पासून सिडनी मराठी मंडळाचे सभासद झालेले नेपोलियन आल्मेडा ऑस्ट्रेलियातील मराठी जगात हळुहळू सामावून गेले. नाटकांचे दिग्दर्शन करू लागले. आणि ऑस्टेलियातील मराठी रंगभूमीच्या कक्षा त्यांनी अधिक विस्तृत केल्या.
ते मूळ वसई गावचे! नाट्यकलेची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी नाटकाचा अभ्यासही केला होता. अनेक एकांकिकांमधून, नाटकांमधून भूमिका साकारल्या होत्या. महाराष्ट्रातून ऑस्ट्रेलियात स्थलांतर केल्यावर मात्र ते नाटकावाचून बैचेन झाले होते आणि मायदेशी परत फिरणार होते. पण तेवढ्यात त्यांना कोणी सिडनीच्या मराठी मंडळांबद्दल सुचवले आणि तेथील कलाकारांचे दालन संपन्न करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे ते सिडनी मराठी असोसिएशन; कार्यकारिणीचे सभासद आणि नंतर अध्यक्षही झाले. सिडनी मराठी मंडळाचे ते एकमेव मराठी ख्रिस्ती सभासद आहेत. अध्यक्ष असताना, सिडनीतील पहिल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाची धुरा त्यांनी आणि कमिटीच्या सर्व सभासदांनी वाहिली. अशा कार्यक्रमांसाठी भारतातील कलाकारही येत असतात. तसंच इतर देशातील मान्यवर मंडळीही उपस्थित असतात.
नेपोलियन आल्मेडा यांचे आणखीन एक कार्य उल्लेखनीय आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी त्यांनी एक मोठा संकल्प हाती घेतला. एक छानसं नाटक बसवलं. स्मरणिका छापली. पैसे देणगी स्वरूपात गोळा करून आनंदवनाला चक्क ३५००० डॉलर्सचा धनादेश पाठवला. त्या वेळच्या मंडळाच्या कमिटीच्या आणि सिडनीत मराठीजनांच्या सहकार्यानेच हे घडलं असं ते आवर्जुन सांगतात. परदेशात राहूनही मायदेशासाठी सामाजिक भान ठेवून काम करणारी माणसं पाहिली की डोळ्यांत पाणी येतं. ज्यांच्यामुळे ऑस्ट्रेलियातील सध्याच्या मराठी जगाचा कानोसा घेण्याची संधी मला मिळाली, त्या सिडनी येथील अभिनेत्री नीलिमा बेर्डे यांची मी आभारी आहे. अलिबाग येथे झालेल्या जागतिक मराठी संमेलनात त्या ऑस्ट्रेलियातर्फे आल्या होत्या तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली होती. अभिनय, लेखन हे त्यांचे छंद आहेतच पण महाराष्ट्र मंडळालाही त्यांनी काम केले आहे. २०१३ साली सिडनी येथे झालेल्या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनात सिडनीच्या साऊथ वेस्ट झोनच्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली होती. समन्वयक म्हणून १६५ कलाकारांना सहभागी करून घेऊन दिमाखदार कार्यक्रम बसविला होता. त्यासाठी अनेक दिग्दर्शकांनी काम केले होते. नीलिमा बेर्डे तेव्हापासून हरहुन्नरी कलाकार म्हणून प्रसिद्ध झाल्या.
२०१८ साली भारतात झालेल्या थिएटर ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियातर्फे सादर झालेल्या अभिराम भडकमकर लिखित ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकात त्या अभिनेत्री म्हणून सहभागी होत्या. मायमराठीबद्दल त्यांना अतिशय आदर आहे. आता नीलिमा बेर्डे मासीच्या उपाध्यक्ष आहेत व यांच्यासहित श्रीधर भागवत, विनीत पसरणीकर, दीपाली जमदाडे, कल्याणी कुलकर्णी, रसिक कुलकर्णी, शिरीष रबडे, स्वाती अभ्यंकर, भूषण महाजन, श्रेयस काळे, राधिका मोगरकर हे सर्व अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५साठी झटून काम करीत आहेत. भारतातून परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा विरह जास्तच जाणवतो. आपली नोकरी, व्यवसायाची व्यवधाने सांभाळून ही माणसे मराठी संस्कृती रुजवण्यासाठी धडपड करताना मी गेली २० वर्षे पहात आहे. त्यांनी लावलेल्या रोपाचा आता बहारदार वृक्ष झालेला पाहायला मिळत आहे.