Monday, February 10, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सकुटुंब रंगलंय कलेत...

कुटुंब रंगलंय कलेत…

फिरता फिरता – मेघना साने

एका वर्गमैत्रिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्त आम्ही काही क्लासमेट्स अमरावतीला लग्नसमारंभात भेटलो. तेथेच ओळख झाली. राजेंद्र कोल्हेकर या आमच्या वर्गमित्राच्या पत्नीशी. डॉ. साधना राजेंद्र कोल्हेकर यांचे शिक्षण एम. एससी., एम. फील. आणि संख्याशास्त्राच्या पीएच. डी. असून त्यांनी अडतीस वर्षे प्राध्यापकी केली. त्या संख्याशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखही होत्या. अमरावतीत त्या रांगोळी कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी आम्हाला ‘रांगोळी पाहायला घरी चला ना’ असे आमंत्रण दिले. आणि हॉलपासून जवळच असलेल्या त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.

राजेंद्रच्या या टुमदार बंगल्याभोवती अगदी शिस्तीत बाग उभी होती. बगिच्यांतून तो एका दिवाणसारख्या मोठ्या मेजावर रांगोळी काढलेली दिसली. या रांगोळीवर काच ठेवली होती. त्यामुळे ती वाऱ्याने अजिबात विस्कटणार नव्हती. ती सुंदर रांगोळी पाहून मी स्तिमित झाले. ते एका पाठमोऱ्या स्त्रीचे चित्र होते. पेंटिंग असावे तसे दिसत होते. त्या स्त्रीच्या कपड्यांचा पोत, हालचालीची लकब, साऱ्याचा अंदाज रांगोळीतून येत होता. गणित आणि संख्याशास्त्राची प्राध्यापकी करणाऱ्या स्त्रीकडे इतकी सुंदर रांगोळीची कला कशी असावी याचे कोडे मला उलगडेना.

गप्पांमधून कळले की साधनाताईंना रांगोळी काही कुठल्या क्लासमध्ये शिकून आलेली नव्हती. साधनाताईंचे वडील उत्तम कलाकार होते. त्यामुळे वारसानेच त्यांना व त्यांच्या भावंडांना काही कला येऊ लागल्या असे म्हणता येईल. भरतकाम, विणकाम, क्रोशे इत्यादी अनेक गोष्टीत त्यांना रस आहे. साधना यांनी आपल्या पतीला म्हणजे राजेंद्र यांनाही क्रोशेची कला शिकवली. निवृत्तीनंतर राजेंद्र यांना क्रोशाचे रुमाल बनविण्याचा छंदच जडला. ते फक्त गोलाकार मंडल, ज्याला इंग्रजीत Doily म्हणतात, ते विणतात. त्यांनी आजपर्यंत असे सुमारे १५० क्रोशे विणले आहेत. त्यांनी तयार केलेले क्रोशेचे गोल रुमाल आणि विविध रंगांच्या दोऱ्यांमध्ये केलेले विविध डिझाइन्स आम्हाला पाहायला मिळाले. काही भिंती क्रोशे कामाने सजवल्या होत्या. साधनाताईंनी सांगितले, “राजेंद्र यांनी क्रोशेचे एक विश्वच निर्माण केले आहे. विणलेले सर्व रुमाल त्यांनी स्टार्च करून कडक केले आहेत. त्यामुळे ते एखाद्या ताटलीसारखे वाटतात. ही कल्पना त्यांनी स्वतःच शोधून काढली आहे.” साधनाताईंच्या रांगोळीच्या कलेला राजेंद्र यांनी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांची कला वृद्धिंगत होत गेली असे त्या अभिमानाने सांगतात.

साधनाताईंचे वडील, शंकर त्र्यंबक जोशी हे फार मोठे नामवंत कलाकार होते. पूर्वी चित्रपटगृहाबाहेर लाकडाच्या फ्रेम्सवर रंगवलेले मोठमोठे बॅनर्स ठोकून प्रदर्शित केले जायचे. हे बॅनर्स रंगविण्याचे काम ते करीत असत. साधना आणि तिची भावंडे वडिलांचे हे हृदय ओतून केले जाणारे काम टक लावून पाहत राहत असत. ही चारही भावंडे आता कलाकार झाली आहेत. साधनाचा धाकटा भाऊ सुनील स्वतः शास्त्रज्ञ असून आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कलाकार झाला आहे. त्यांची मोठी बहीण अलका क्रोशे शिकवण्याचा युट्युब चॅनेल चालवते. मधली बहीण संध्या विणकाम भरतकामात निपुण आहे.

एखादे चित्र पाहून हुबेहूब तसेच रांगोळीत साकारायचे म्हटले तर त्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करावे लागते. जवळजवळ, त्या चित्राची अनुभूतीच घ्यावी लागते असे साधनाताई म्हणतात. आता या पाठमोऱ्या स्त्रीचे चित्र किंवा उधळले जाणारे घोडे आणि गाडीत बसलेला गाडीवान अशी चित्रे साकारताना त्यातील figure ला त्यावेळी काय वाटत असेल असा विचार करावा लागतो. त्या भावना मनात आणून ते चित्र साकारावे लागते. मग ते बरोबर साकारते. अत्यंत बारीक निरीक्षणाने त्याच्या शेड्स लक्षात येतात. आणि शेड्सचा अभ्यास केल्याशिवाय चित्रातील कपड्यांचा पोत किंवा शरीराची ठेवण निश्चित साकारता येणार नाही. व्हेल्वेट किंवा इरकली पदर हा शेड्समुळेच छान साकारता आला आहे. रांगोळीतून राम मंदिर साकारताना साधनाताईंनी विचार केला की श्रीराम हा सर्वव्यापी आहे आणि त्याचं प्रतीक ही वास्तू आहे. हेच ही रांगोळी पाहतानाही पाहणाऱ्याच्या मनात उमटतं.

रांगोळीची काही बलस्थाने आहेत तर काही कमकुवत बाजू आहेत. वॉटर कलर मधे एखाद्या स्त्रीचा चेहेरा रंगवायचा तर ते सोपे जाते. पण रांगोळी ही मुळातच जाड असते. त्यामुळे एखाद्या युवतीच्या नाजूक भुवया काढायच्या तर पंचाईत येते. आणि जाड भुवया काढून तिचे सौंदर्य कमी होते. मग इतर रंगांच्या छटा भुवईपर्यंत पोचवून ती नाजूक करावी लागते. रांगोळी ही भुरभुरते. वॉटर कलर असे भुरभुरत नाहीत. साधनाताई अमेरिकेला गेलेल्या असताना त्यांनी नायगारा फॉल्सचे चित्र रांगोळीतून साकारले. त्या चित्रात काठाच्या जवळ असलेले आणि दूर असलेले तुषार दाखवणे हे भुरभुरणाऱ्या रांगोळीमुळे शक्य झाले. साधनाताईंची मूळ वृत्ती संशोधकाची असल्याने, रांगोळीवर संशोधन करण्याची त्यांची इच्छा आहे. आर्चिस ग्रुपने दसरा रंगोत्सव नावाची एक रांगोळी स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेत साधनाताईंना शंभर स्पर्धकांमधून पहिला क्रमांक मिळाला.

साधना आणि राजेंद्र, दोघेही कलाकार. त्यांच्या मुलीही कलाकार झाल्या आहेत. मोठी मुलगी ऋचा ही भरतकामात तरबेज असून राज्यस्तरीय एम्ब्रॉयडरी स्पर्धेत पारितोषिक विजेती आहे. लहान मुलगी केतकी कलेशी संबंधित फिरोदिया करंडकच्या स्पर्धांमधे तीनही वर्षे प्रथम पारितोषिक विजेती ठरली. कॉफी पेंटिंगमध्ये ती एक्सपर्ट आहे. ही कला मूठभर लोकांनाच अवगत आहे. साधनाच्या धाकट्या भावाने एकदा गानकोकिळा लताबाईंचे स्केच काढले. ही बातमी लताबाईंना कळली तेव्हा त्यांनी स्वतः फोन करून त्याला आपल्या आई-वडिलांचे स्केच काढण्याची विनंती केली. लताबाईंच्या दोन मिनिटे वीस सेकंदाच्या संभाषणने त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्याने माई मंगेशकर व दीनानाथजी यांचे स्केच काढून दिले आणि लताबाईंनी त्याचे खूप कौतुकही केले. खरोखर, या कुटुंबाच्या तीन पिढ्या कलेत रंगलेल्या आहेत!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -