टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
क्षिती जोगने केवळ अभिनयाचा वारसा न जोपासता चांगल्या कलाकृती निर्माण करण्याचा देखील ध्यास घेतला आहे. झिम्मा, झिम्मा २, चित्रपटानंतर तिने फर्स्टक्लास दाभाडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.
क्षितीच महाराष्ट्र मंडळ शाळा, कटारिया हायस्कूल पुण्यात शालेय शिक्षण झालं. आठवीनंतर लोकमान्य टिळक हायस्कूल, चेंबूर येथे तीच शिक्षण झालं. शाळेमध्ये आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला होता. नंतर माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. तिथे तिची खऱ्या अर्थाने अभिनयाला सुरुवात झाली. तिने एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला. तिचं एकांकिकेमधल काम पाहून तिला दामिनी मालिकेतील भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला बोलावले गेले. १२ वीची परीक्षा दिल्यानंतर तिला ‘दामिनी’ मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ती मालिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिला भरपूर कामे मिळत गेली.
वादळवाट, श्रीयुत गंगाधर टिपरे, तुझ्याविना, तू तिथे मी, गंध फुलांचा गेला सांगून या मराठी मालिकेमध्ये काम केले. घर की लक्ष्मी बेटिया, आप की अंतरा, ये रिश्ता क्या कहलाता है, ये रिश्ते है प्यार के यांसारख्या पुढे हिंदी मालिकामध्ये ती काम करत गेली. शेवटी तर ती हिंदी मालिकेमध्ये बिझी झाली. तिला व हेमंतला चांगला चित्रपट निर्माण करून प्रोडक्शन सुरू करायचे होते. त्यासाठी चांगल्या कथानकाच्या शोधात असताना झिम्मा चित्रपटाचा विषय सुचला व तिने अभिनयासोबत प्रोडक्शन सुरू केले. त्यानंतर झिम्मा २ देखील केला.
आता तिचा ‘फर्स्टक्लास दाभाडे’ हा चित्रपट आलेला आहे. हा चित्रपट पिंपरखेड या हेमंतच्या गावी शूट झालेला आहे. हा केवळ फॅमिली ड्रामा नाही,तर सेमी रुरल गावातून तरुण पिढी, त्यांचे प्रश्न, त्यांच्यातील भांडणं, शहरात जाण्याची घाई, लग्न संस्था या साऱ्यावर भाष्य या चित्रपटामध्ये केलेले आहे. या चित्रपटामध्ये तिची जयश्री नावाची व्यक्तिरेखा आहे. तिला घरात सगळे तायडी या नावानेच बोलावतात. ती दाभाडे कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी आहे. भावंडांवर प्रेम करणारी, घरातील सर्व जबाबदारी स्वतःवर घेणारी अशी आहे. थोडीशी फटकळ वाटणारी, परंतु भावंडांवर प्रेम करणारी अशी तायडी आहे.
श्रुतीला चित्रपटातील इतर कलाकाराविषयी विचारले असता ती म्हणाली, की अमेय वाघ सोबत मी पहिल्यांदाच काम केले. तो फार गुणी, हरहुन्नरी कलाकार आहे. त्याच्या सोबत काम करण्यात मजा आली. सिद्धार्थ चांदेकर सोबत मी या अगोदर झिम्मा, झिम्मा २, या चित्रपटात काम केले आहे. तो एक चांगला नट आहे. तो सहकलाकार म्हणून खूप मनापासून काम करतो,आपल्या भूमिकेवर प्रेम करतो, प्रोजेक्टवर प्रेम करतो. हा गुण त्याच्याकडून शिकण्यासारखा आहे. राजसी भावे नावाची एक अभिनेत्री आहे, जिने अगोदर घरत गणपती, लाईक अँड सबस्क्राईब हे चित्रपट केले आहेत. तिने देखील चांगल काम केले आहे. तृप्ती शेडगे नावाची मुलगी आहे, जी साताऱ्याची आहे. तीच गावाकडच्या गोष्टी नावाचं यू ट्यूबवर चॅनेल आहे, ती हेमंतला अगोदरच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी भेटली होती. तिने देखील या चित्रपटात छान काम केले आहे. राजन भिसे, निवेदिता सराफ जे आमचे आई-वडील झाले आहेत. या ज्येष्ठ मंडळींकडून देखील भरपूर गोष्टी शिकण्यास मिळाल्या. हरीश दुधाने ज्याच्या सोबत मी तिची मुलगी काय करते या मालिकेमध्ये काम केले होते. त्याचं काम मला माहीत होत. अशा सर्व गुणी कलाकारांसोबत या चित्रपटामध्ये मला काम करायला मिळाले.
या चित्रपटामध्ये पाच गाणी आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी ती लिहिली आहेत व अमितराज यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटामध्ये रोमँटिक गाणे, कुटुंबाचे गाणे, लग्नाचे गाणे असे प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे नेहमी नवीन विषय आणण्याचा प्रयत्न करतो. नवीन पद्धतीने त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. हसत-खेळत जीवनाचा एखादा बोध सांगण्याचा तो प्रयत्न करतो. या चित्रपटाचे शूटिंग त्याच्या गावी झाल्याने तेथील बोलीभाषेत त्याने संवाद लिहिले आहेत, चित्रपटाची कथा देखील त्याने लिहिली आहे. क्षितीला ‘फर्स्टक्लास दाभाडे’ या चित्रपटाच्या यशासाठी, भावी आयुष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!