पिंपरी : जीबीएस (GBS) या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्याकरिता ८ रुग्णालय झोन अंतर्गत प्रत्येकी दोन असे एकूण १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत शनिवारअखेर १० हजार ७१८ घरे तपासण्यात आली असून यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
जीबीएस या आजारामध्ये बाधित रुग्णांच्या मज्जातंतूवर आघात होऊन हा आजार संभावतो. या आजाराची लागण सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. अत्यल्प रूग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येतात. दुषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने त्या दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजअखेर गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचे संशयित रुग्ण १५ आहेत. यापैकी ६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आलेले आहेत तसेच सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
या आजारावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधोपचार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व इतर रुग्णालयांत उपलब्ध आहेत. तसेच या आजाराचे उपचार “एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” मध्ये समाविष्ट असून वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत रुग्णांकरिता मोफत उपचार उपलब्ध आहेत.
त्यानुसार जीबीएस या आजाराविषयी संपूर्ण कामकाज करणेकरीता आठ रुग्णालय झोन येथील आठ वैद्यकिय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांनी आपल्या झोनल रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रामधील सर्व अहवालांचे संकलन, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांचेशी समन्वय साधणे, रुग्णाच्या परिसरात सर्वेक्षण करणे व बाधित रुग्णांवर योग पध्दतीने उपचार याबाबतचे कामकाज देण्यात आलेले आहे.
तसेच गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी व नागरिकांच्या शंकांचे निरसन व्हावे याकरिता पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर तज्ञ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असतील. नागरिक या आजाराबद्दल चौकशीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर (हेल्पलाईन क्रमांक- ७७५८९३३०१७) फोन करू शकतात. (GBS)