नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एक आनंदाची बातमी आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांची कपात झाली आहे. यामुळे १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर जो राजधानी दिल्लीत १८०४ रुपयांत उपलब्ध होता तो आता १७९७ रुपयांत मिळेल. किमतीतील कपातीमुळे १९ किलोचा एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांचा एलपीजीवरील खर्चात कमी होण्यास मदत होणार आहे.
Budget 2025 : अर्थमंत्री सीतारामन यांच्या पेटाऱ्यातून आज गरीब, मध्यमवर्गीयांना मिळणार दिलासा?
जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या दरातले बदल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याआधारे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचे दर निश्चित होत असतात. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज सकाळी तेल कंपन्या जाहीर करतात. तर सीएनजी, पीएनजी यांच्या दरात अधूनमधून बदल होतात. हे बदल संबंधित कंपन्यांकडून जाहीर केले जातात. एलपीजीचा दर साधारणपणे दर महिन्याच्या एक तारखेला जाहीर केला जातो. या व्यवस्थेनुसार कंपन्यांनी शनिवार १ फेब्रुवारी रोजी दरांबाबत घोषणा केली. कंपन्यांच्या घोषणेनुसार आता व्यावसायिक सिलिंडर सात रुपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली होती.
स्थानिक कर आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरात राज्यानुसार बदल होतात. एलपीजीच्या किमती राज्यानुसार बदलतात. हा बदल किरकोळ असला तरी कमी झालेल्या दरांमुळे देशभरातली एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना फायदा होईल.
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली
मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे.