Mahakumbh 2025 : महाकुंभतील दुर्घटना

Share

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे महाकुंभमेळ्याला गालबोट लागलेे. महाकुंभमेळ्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यांतून तसेच विदेशातूनही भाविक पवित्र स्नानासाठी येत आहेत. भाविकांची ही संख्या हजारोंच्या नाही तर लाखोंच्या नाही तर करोडोंच्या घरात असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण निर्माण होणे स्वाभाविक आहे. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या करोडो भाविकांची संख्या पाहता उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजनाची खरोखरीच प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. महाकुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनीदेखील चेंगराचेंगरी होणार नाही, दुर्घटना घडणार नाही, याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक होते. देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा.

पद्मपुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते, म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान, दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुण्य लाभ होतो. कुंभ राशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते. कालचक्रमध्ये ग्रहांचा राजा, सूर्य, राणी चंद्र आणि ग्रहांचा गुरू याला महत्त्वाचे स्थान आहे. या तीन ग्रहांचे विशिष्ट राशींमध्ये होणारे संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो. प्रयागराजमध्ये, गुरू वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असल्याने, माघ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मीळ योगायोग निर्माण करतो. महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व असते. या मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी देशविदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी झाले होते. त्यातच चेंगराचेंगरी झाली. ३० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला, शंभराहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. हा प्रशासकीय आकडा असला तरी यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांच्या वारसांना उत्तर प्रदेश सरकारकडून ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही दुर्घटना घडल्यावर उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे पावले उचलली, प्रशासकीय यंत्रणा राबविली, परिस्थितीवर नियंत्रण मिळविले, या सर्व घटना खरोखरीच प्रशंसनीय आहेत. मुळात कुंभमेळ्यात सहभागी कोट्यवधी भाविकांची संख्या, त्यात झालेली चेंगराचेंगरी, त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी योगी सरकारने राबवलेली पोलिसी यंत्रणा व जखमींवरील उपचारासाठी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेली यंत्रणा, जखमींना रुग्णालयापर्यंत विनाविलंब पोहोचविण्यासाठी काही मिनिटांमध्ये निर्माण केलेले स्वतंत्र कॉरिडॉर या एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेसे दृश्य योगी सरकारने वास्तवात साकारले.

उत्तर प्रदेशचे पोलीस, आरोग्य यंत्रणा, रस्ते व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस आणि या सर्वांवर संचलन करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी तसेच या सर्वांचा वेळाेवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळ्यातील दुर्घटनेनंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनेतील खरे ‘देवदूत’ ठरले आहेत, असे म्हणणेदेखील अतिशयोक्तीचे ठरणार नाही. महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी सातत्याने मुख्यमंत्री योगी यांच्या संपर्कात होते. जखमींच्या उपचाराबाबत माहिती जाणून घेत होते. दिवसभरातील व्यस्त कार्यबाहुल्यातूनही त्यांनी उत्तर प्रदेशातील घडामोडींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. रवी, चंद्र व गुरू हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कधी सहा वर्षे, तर कधी बारा वर्षे, तर कधी १४४ वर्षांनी हे योग येत असतात. आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभ मेळा म्हणतात. जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ म्हटला जातो आणि असा योग जर १४४ वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा म्हटला जातो. जानेवारी २०२५ मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या भूमीवर सुरू असलेला महाकुंभमेळा हा देखील १४४ वर्षांनीच आला असल्याने देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे या ठिकाणी आगमन झाले होते. भाविकांच्या स्नानासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज परिसरात असंख्य कुंडांची निर्मिती केली होती. बुधवारी मौनी अमावस्येला अमृतस्नानापूर्वी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी दिवसभर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्रिवेणी संगम परिसराकडे जात असल्याने ही दुःखद घटना घडली. ही चेंगराचेंगरी प्रयागराजमधील संगम घाटाजवळ घडली. संगम घाट हे नाव या ठिकाणाच्या आकारामुळे पडले आहे.

हे संगम घाट प्रयागराजमध्ये स्नानासाठी सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. असे म्हणतात की येथेच यमुना आणि सरस्वती नदी गंगेला मिळते. या ठिकाणी बहुतेक साधू-मुनी स्नान करतात. भाविकही या ठिकाणी स्नानाला सर्वाधिक महत्त्व देतात. उत्तर प्रदेश सरकारने भाविकांच्या स्नानासाठी शेकडोंच्या संख्येने घाट बनविले असतानाही संगम घाटावरच स्नान करण्याचा भाविकांचा मोह या दुर्घटनेस प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे. भाविकांना मौनी अमावस्येच्या दिनी स्नानासाठी प्रत्येक कुंभमेळ्यात वाढत चाललेली लाखोंच्या संख्येने वाढत जाणारी भाविकांची संख्या पाहता संगम घाटाचे क्षेत्र देखील प्रत्येकवेळी वाढवले जाते. २०१९ च्या तुलनेत यावेळी गर्दी पाहता संगम घाटाच्या परिसरात वाढ करण्यात आली. याआधी येथे दर तासाला ५० हजार लोक स्नान करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी महाकुंभात दर तासाला २ लाख लोकांनी स्नान करण्याची तयारी केली आहे. महाकुंभ मेळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे जगाचे लक्ष या प्रयागराजवर केंद्रित झाले आहे.

घटना घडल्यावर घटनेची समीक्षा करण्यासाठी अनेकजण आकलन करत असले तरी घटना घडल्यानंतर घटना सावरण्यासाठी, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्तर प्रदेशने राबविलेल्या उपाययोजनांची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. घटनेचे पडसाद देशाच्या कानकोपऱ्यांत उमटले असले तरी या घटनेमुळे महाकुंभमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांच्या उत्साहावर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. महाकुंभसाठी स्नानादरम्यान कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये म्हणून पाण्याच्या अंतर्गत भागातही विशेष प्रकारची उपाययोजना उत्तर प्रदेश सरकारने राबविली होती. दुर्घटना क्षणिक काळात होते; परंतु दुर्घटना घडूच नये यासाठी आयोजकांना एक-सव्वा वर्ष नियोजनाची तयारी करावी लागते. कोट्यवधींचा सहभाग असलेल्या ठिकाणी कधीही काहीही होण्याची भीती असते. नेमकी चेंगराचेंगरी झाल्याने महाकुंभवर दुर्घटनेचे सावट निर्माण झाले. आयोजन ही सरकारची जबाबदारी असली तरी दुर्घटना घडू नये ही सहभागी होणाऱ्या भाविकांचीही जबाबदारी असते, हे विसरून चालणार नाही.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

8 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

32 minutes ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

1 hour ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

3 hours ago