Friday, February 14, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखशब्दशिल्पकार पद्मश्री अच्युत पालव

शब्दशिल्पकार पद्मश्री अच्युत पालव

सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेला हा पुरस्कार पालव यांच्या कॅलिग्राफी कलेतील चार दशकांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्याच्या प्रचारासाठी दिलेला आहे. सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांचा शब्दशिल्पांचा हा प्रवास जाणून घेऊ…

सुधीर शालीनी ब्रह्मे

केवळ आणि केवळ शब्दशिल्प कलेला आपलं आख्खं आयुष्य वाहिलेलं, अनेक विदेशातील कला दालनात मराठी आणि विशेषकरून मोडी लिपीतील ज्यांच्या कलाकृती मानाच्या पगडी घालून दिमाखात बसल्या आहेत आणि तरीही ज्याचे पाय सदा जमिनीवर आहेत असा विनम्र स्वभावाचा मराठमोळा कलावंत पद्मश्री खिताबाने सन्मानित व्हावा हा मराठी भाषेचा आणि ब्राह्मी, खरोष्टी, मोडी तसेच देवनागरी लिपींचा बहुमान आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविणाऱ्या मराठीचे झेंडे अच्युतने केव्हाचेच अटकेवर नेऊन ठेवले आहेत. इतके की जे. जे. कला महाविद्यालयाचा हा स्नातक उत्तम इंग्रजी बोलता येत असतानाही आपल्या मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगून जर्मनीच्या एका आंतरराष्ट्रीय दृक्श्राव्य वाहिनीवरील इंग्रजी मुलाखतीत चक्क मराठीत उत्तरे देता झाला.

पंधराव्या ते सतराव्या शतकातील मोडीच्या विकासावर लिहिलेल्या प्रबंधामुळे १९८२ साली उल्का अडव्हर्टायझिंगची संशोधन शिष्यवृत्ती पालव यांना मिळाली आणि त्यानंतर लालबागच्या लाल मातीत वाढलेल्या त्यांनी सदैव सैनिका पुढेच जायचे हाच मंत्र जपला. उल्का जाहिरात एजन्सीचे तत्कालीन कला संचालक र. कृ. जोशी त्यांचे गुरू. रकृंनी कवितेत शब्दशिल्पांचे अनेक प्रयोग केले. कवितेची मांडणी बदलताना त्यांनी मराठीत प्रथमच आशय, अभिव्यक्ती आणि शब्दलय यांचा मिलाफ साधताना एकाच कवितेत शब्दांची अनेक रूपं साकारली. अच्युतमध्येही एक सुप्त कवी दडलेला आहे. तोही कविता लिहितो. त्याला आशयाची जाण आणि शब्दांचे उत्तम भान आहे. काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, इकार आणि उकार यांना असणारे परंपरागत व्याकरणी घटकांचे मूल्य बदलून अच्युतने आपल्या कलेने त्यांना वांङ्मयीन मूल्यात परावर्तीत केले. फार्राटे, रफार, बाक यांना अच्युतने शब्दाच्या अर्थाशी, आशयाशी जोडले. त्यासाठी त्याने लेखणी आणि कुंचल्याखेरीज अनेक साध्या साध्या वस्तूंचा, उपकरणांचा अर्थवाही वापर केला. “लादेन” हा शब्द लिहिण्यासाठी त्याने दाढीचा ब्रश वापरला तर “लता” या नावातील लय अचूक पकडताना त्याने केसासमान नाजूक रेषेला वळणदार लय दिली. म्हणूनच अच्युतच्या कलेला केवळ सुलेखन न म्हणता शब्दशिल्प म्हणने अधिक योग्य ठरते.

साधी, सोपी कविता रसिकांच्या मनात घर करून राहते हे पालव यांनी केव्हाच ओळखले होते. कवितेला मनातून घरात नेण्यासाठी १९९० साली पालव यांनी संत ज्ञानेश्वरांच्या काव्याच्या आधारे आपल्या शब्दशिल्प शैलीत मराठीतील पहिली रोजनिशी लिहिली, तयार केली व ती प्रकाशितही केली. पुढे १९९४ मध्ये संत तुकाराम आणि १९९५ मध्ये संत रामदास यांच्या काव्यावर आधारित रोजनिशा त्यांनी प्रकाशित केल्या. १९९६ मध्ये त्यांनी शब्दपुराण ही दिनदर्शिका प्रकाशित केली. आपल्या शब्दशिल्प कलेच्या रजत महोत्सवी वर्षात २००७-८ साली देवनागरी कॅलीग्राफीला तिच्या अन्य लिपी भगिनींशी जोडत सर्व भाषकांशी हस्तांदोलन करत पालव उभा भारत हिंडले. अनेक ठिकाणी त्यांनी या कलेचे जाहीर प्रदर्शन केले. महाविद्यालयांतून त्यांनी विद्यार्थ्यांना कॅलीग्राफीचा परिचय करून दिला. हे त्यांचे मिशन होते. उर्दू, गुरुबानी, आसामी, ओरिया, बंगला, गुजराथी, तमिळ, तुळू, अशा अनेक लिपीतील शब्दशिल्पकारांना त्याने आपल्या या मिशनमध्ये जोडले. कॅलीफेस्ट हा तीन दिवसांचा भाषा, लिपी आणि शब्दशिल्प यांचा उत्सव ते वेगवेगळ्या शहर, जिल्हा आणि तालुक्यात भरवत असतात. हे सर्व ते एकाकीपणे करत आले आहेत. मागील काही वर्षांत शरीर, छत्र्या, टी-शर्ट, घरातील प्रदर्शनी वस्तू अशा विविध वस्तूंवर त्यांनी शब्दशिल्प साकारली आहेत. शिवाय नृत्यातील पदलालित्य तसेच गायकाचे आपाल, मिंड मुरकी यास अनुरूप असे प्रात्यक्षिकाचे जाहीर प्रयोग त्यांनी केले आहेत. शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत.

अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तीन शब्दाशक्तींपलीकडली ‘ऊर्जा’ ही चौथी शक्ती शब्दशिल्पाच्या माध्यमातून पालव यांनी शब्दांना दिली. शब्दांमध्ये केवळ भौमितिक आकार सामावलेले नाहीत तर आकार, इकार, उकाराच्या वर्तुळाकारात, फार्राट्यात असलेल्या ऊर्जा स्रोताचा शोध घेत त्यांना सर्जनात्मक रूप देत पालव यांनी शब्दशिल्पकलेला वेगळे आयाम दिले आहेत. दुबई, रशिया, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड, फ्रांस या देशांत त्यांनी शब्दशिल्प कलेच्या कार्यशाळा घेतल्या आणि प्रात्याक्षिके सादर केली आहेत. भाषेला आणि तिच्या लिपीला पालव यांनी उपयोजिततेचे वेगळे आयाम दिले आहेत.
मातृभाषेपासून दूर चाललेल्या माणसापाशी भाषा नेण्याचे पथदर्शी कार्य अच्युत पालव यांनी केले आहे. सातत्य, परंपरा आणि नवता ही त्रिसूत्री त्याच्या या कार्याचे अधिष्ठान आहे. त्याच्या या प्रचार-प्रसार कार्याने काळाच्या ओघात चळवळीचे रूप धारण केले. मोडीचा अभ्यास करतानाच असेल कदाचित त्यांना आपण निवडलेला मार्ग कुठे जाणार आहे याची जाण, भान आणि आत्मविश्वास असावा म्हणूनच त्यांनी एकट्याने प्रवास सुरू केलेल्या या प्रवासात आज त्यांच्या या मार्गावर तांडे चालत आहेत. आज र. कृ. जोशी असते तर कदाचित तेही सहज म्हणाले असते, “अच्युत तू तर माझ्याही पुढे गेलास”. अशा या मराठमोळ्या, मोठ्या मनाच्या माणसास मनाचा मुजरा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -