Sunday, May 11, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Big Scam : उत्तर प्रदेश-बंगालच्या महिलांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा

Big Scam : उत्तर प्रदेश-बंगालच्या महिलांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin) योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या मोठ्या रॅकेटचा (Scam) पर्दाफाश झाला आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे भासवून बनावट लॉगिन आयडी तयार करण्यात आले आणि त्याद्वारे तब्बल १,१७१ अर्ज दाखल करण्यात आले. हे अर्ज राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिलांचे असल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्ष तपासात अर्जदार उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथील असल्याचे उघड झाले आहे.


या घोटाळ्याचा तपास सुरू असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस अर्ज सादर करणाऱ्या दोन लॉगिन आयडींपैकी २२ अर्ज बार्शी तालुक्यातील होते. योजनेअंतर्गत मंजूर झालेले लाभ तातडीने थांबवण्यात आले आहेत.



कसा उघड झाला घोटाळा?


बार्शी तालुक्यातील एका गावात मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले, मात्र त्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिक चौकशीत संबंधित आधार क्रमांकाच्या आधारे बँक खात्यांची माहिती घेतली असता ती खाती उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले.



बनावट लॉगिन आयडीचा गैरवापर


योजनेसाठी राज्य सरकारने www.ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती. एक लॉगिन आयडी तयार करून त्याद्वारे अनेक अर्ज भरता येतात. या सुविधेचा गैरफायदा घेत ‘मुनमुन ठाकरे, अंगणवाडी वर्कर, हजारवाडी, ता. पलूस, जि. सांगली’ आणि ‘अनवरा बेगम, अंगणवाडी वर्कर, बोरगाव बु., ता. जि. लातूर’ या नावांनी बनावट आयडी तयार करण्यात आले. या दोन लॉगिन आयडींवरून तब्बल १,१७१ अर्ज भरले गेले. प्रत्यक्ष चौकशीत लातूर आणि सांगली जिल्ह्यात अशा नावाच्या कोणत्याही अंगणवाडी सेविका नसल्याचे स्पष्ट झाले.



आधार कार्डाच्या आधारे फसवणूक


ऑनलाइन अर्ज करताना आधार क्रमांक टाकून त्यासोबत आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागत होती. या रॅकेटने नकली आधार क्रमांक वापरून अस्पष्ट प्रती अपलोड केल्या, ज्यामुळे पडताळणीच्या वेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती. याच युक्तीचा फायदा घेत हा मोठा गैरव्यवहार उघडकीस येईपर्यंत सुरू होता. सध्या पोलीस, महसूल आणि महिला व बालविकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.



सर्वजण बाहेरील राज्यातील


याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आधारशी लिंक असलेले बँक खाते तपासले. त्या बँकांच्या स्थानिक शाखेत जाऊन संबंधित खात्यांना लिंक असलेले मोबाईल क्रमांक आणि पत्ते काढले. त्यात काही उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील पत्ते आहेत. शिवाय ज्या आयडीवरून हे अर्ज भरले आहेत, ते देखील बाहेरील राज्यातीलच असल्याचे समोर आले आहे. यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. - बाळासाहेब जाधव, एपीआय, बार्शी शहर पोलीस ठाणे

Comments
Add Comment