Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण, आरोपींना जामीन

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण, आरोपींना जामीन
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पानसरे हत्या प्रकरणातील पाच आरोपींना २०१८ ते २०१९ दरम्यान अटक करण्यात आली होती. हे आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. खटला निकाली निघण्यास होत असलेला विलंब आणि आतापर्यंतच्या तपासकामाचा आढावा घेतल्यानंतर न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांनी आरोपींना जामीन दिला. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना जामीन मिळाला आहे. आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाणार आहे.



कोण होते कॉम्रेड गोविंद पानसरे ?

गोविंद पानसरे यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३३ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार या गावी झाला. उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला गेलेल्या गोविंद पानसरे यांनी शिक्षण झाल्यावर वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. बी. ए. ऑनर्स आणि एल. एल. बी केलेल्या पानसरेंनी वर्तमानपत्र विक्रेता, नगरपालिकेत शिपाई, माध्यमिक शाळा मंडळात प्राथमिक शिक्षक, शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर, कामगारांसाठी वकिली अशी अनेक कामं केली. पुढे ते कोल्हापूरमधील एक प्रसिद्ध वकील झाले. अनेक वर्षे कोल्हापूरमधील वकिलांच्या संघटनेचे अध्यक्ष होते.



आधी राष्ट्र सेवा दल नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते सक्रीय होते. ते दहा वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात ते सहभागी झाले होते. शोषितांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. असंघटित क्षेत्रांतील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आंदोलन, कायदेशीर लढा असा संघर्ष केला. कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात ते सहभागी झाले होते.



लेखक आणि कवी अशीही गोविंद पानसरे यांची एक ओळख होती. अजून न स्वीकारलेला मंडल आयोग, अवमूल्यन : कळ सोसायची कुणी ?, काश्मिरबाबतच्या कलम ३७०ची कुळकथा, कामगारविरोधी कामगार धोरणे, काही कामगार कायद्यांची तोंडओळख, धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा, पंचायत राज्याचा पंचनामा, मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम, मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: पर्यायी दृष्टिकोन, मार्क्सवादाची तोंडओळख, मुस्लिमांचे लाड, राजर्षी शाहू : वसा आणि वारसा, शिवाजी कोण होता ?, शेतीधोरण परधार्जिणे ही गोविंद पानसरे यांनी लिहिलेली निवडक पुस्तके आहेत.

पानसरे हे डाव्या विचारांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये गोळीबार झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरेंना उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले. मुंबईत २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा पैकी पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जाणार आहे.
Comments
Add Comment