वॉशिंगटन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनचं टॅरिफसंबंधी मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच, ट्रम्प यांनी मंगळवारी (२८ जानेवारी २०२५) पुन्हा एकदा अमेरिकेच्या हितासाठी शुल्क लादण्याबाबत मोठे विधान केले. अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही देशावर सरकार शुल्क लागू करेल.असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
फ्लोरिडा येथे रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही त्या देशांवर आणि बाहेरील लोकांवर शुल्क लादणार आहोत जे आमचे नुकसान करतील. ते त्यांच्या देशासाठी चांगले काम करत असले तरी त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आम्हाला त्रास होणार असेल, तर आम्ही अशा देशांवर नक्कीच शुल्क लादणार आहोत. चीनमध्ये प्रचंड शुल्क आकारले जाते. भारत, ब्राझील आणि इतर अनेक या यादीत आहेत.
चीनच्या ‘DeepSeek AI’ मुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ; अमेरिकेच्या स्टॉक मार्केटला मोठा धक्का
अमेरिकेला आमचे प्रथम प्राधान्य असणार आहे.अमेरिका अशी व्यवस्था निर्माण करेल, जी न्याय्य असेल आणि आपल्या तिजोरीत पैसा आणेल, जेणेकरुन अमेरिका पुन्हा श्रीमंत होईल. आम्ही आमच्या नागरिकांवर कर लादून इतर देशांना समृद्ध करणार नाही, तर इतर देशांवर कर लादून आम्ही आमच्या नागरिकांना श्रीमंत बनवू. इतर देशांवरील शुल्क वाढल्याने अमेरिकन लोकांवरील कर कमी होतील आणि अधिक रोजगार आणि कारखाने निर्माण होतील. असं ट्रम्प यांनी म्हणलं आहे. तसेच ज्यांना शुल्क टाळायचे आहे, त्यांनी अमेरिकेत कंपन्या आणि कारखाने सुरू करावे,असेही ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वीही ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे. भारतही ब्रिक्स समूहाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या घोषणेमुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात.