Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईतील पुष्पोत्सवात भारताची राष्ट्रीय प्रतिके

मुंबईतील पुष्पोत्सवात भारताची राष्ट्रीय प्रतिके

उद्यानविद्या प्रदर्शनात पाच हजार फुल अन् फळझाडे


येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांचा पुष्पोत्सव


मुंबई(विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येत्या ३१ जानेवारी ते दिनांक २ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत हा पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. मुंबई पुष्पोत्सवात विविध प्रजातींची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती इत्यादी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा या पुष्पोत्सवात समावेश असेल. यासह भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ, भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्टीय खेळ हॉकी, राष्ट्रीय जलचर डॉल्फिन, राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय नदी गंगा आदींची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.



मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई पुष्पोत्सव अर्थात वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे यंदाचे हे २८ वे वर्षे आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांनी साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासह मुंबईकरांच्या ज्ञानातही यामुळे भर पडणार आहे. शिवाय आपल्या देशातील राष्ट्रीय प्रतिकांबाबत राष्ट्रभिमानही वाढणार आहे.


मुंबई पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पहावयास मिळतात. त्यासाठी महानगरपालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत असतो. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून असतात.



आतापर्यंत या पुष्पोत्स्वात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉईंट, डिज्नी लँड, जलजीवन, अॅक्वाटीक वर्ड, अॅनिमल किंग्डम आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच धर्तीवर आधारित यंदा भारताची राष्ट्रीय प्रतिके अशी संकल्पना ठरवून पुष्पोत्सवात फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment