राजकोट: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान भारताचा डाव ९ बाद १४६ धावांवर आटोपला. इंग्लंडने या सामन्यात २६ धावांनी विजय मिळवला. सोबतच पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ असे आव्हान जिवंत ठेवले.
इंग्ंलडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताकडून हार्दिक पांड्याने जबरदस्त ४० धावांची खेळी केली मात्र त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याव्यतिरिक्त अभिषेक शर्माने २४ धावा केल्या. बाकी कोणालाही चांगली धावसंख्या करता आली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव १४ धावांवर परतला.
याआधी इंग्लंडने २० षटकांत ९ विकेट गमावताना १७१ धावा केल्या. टीम इंडियासाठी वरूण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. तर इंग्लंडसाठी बेन डकेटने अर्धशतक लगावले. त्याने २८ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार लावले. तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोनने ४३ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. जोस बटलरने २४ धावा करत योगदान दिले.
५ विकेटसह वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास
वरूण चक्रवर्तीने ५ विकेट घेण्यासोबतच इतिहास रचला आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्वीपक्षीय टी-२० मालिकेत १०हून अधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्रच्या नावावर एका मालिकेत सर्वाधिक ८ विकेट घेण्याचा मान होता. इंग्लंडकडून एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड क्रिस जॉर्डनच्या नावावर आहे.