Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Mahakumbh 2025 : गृहमंत्री अमित शहांचे त्रिवेणी संगमात पवित्र 'कुंभस्नान'

Mahakumbh 2025 : गृहमंत्री अमित शहांचे त्रिवेणी संगमात पवित्र 'कुंभस्नान'

प्रयागराज : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज, सोमवारी प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाला भेट दिली. यावेळी त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. याप्रसंगी गृहमंत्र्यांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरू बाबा रामदेव देखील उपस्थित होते आणि स्नानात सहभागी झाले. महाकुंभात स्नान करण्यापूर्वी अमित शहा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते की, “महाकुंभ हे सनातन संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचे एक अद्वितीय प्रतीक आहे.”

कुंभ हा सुसंवादावर आधारित आपल्या शाश्वत जीवन तत्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. आज, पवित्र प्रयागराज शहरात एकता आणि अखंडतेच्या या महान उत्सवात, मी संगमात डुबकी मारण्यास आणि संतांचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे असे शाह यांनी आपल्या संदेशात नमूद केले होते. शहा यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबिय देखील महाकुंभ स्नानासाठी उपस्थित झाले होते. दरम्यान स्नानानंतर शाह यांनी प्रयागराजमध्ये आलेल्या विविध आखाड्यांच्या संतांची भेट घेऊन त्यांच्यासह भोजन देखील केले. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यातील महाकुंभात सहभागी होण्यासाठी भाविकांचे त्रिवेणी संगम येथे आगमन सुरूच आहे. उत्तर प्रदेश माहिती विभागाच्या मते, २६ जानेवारी पर्यंत १३. २१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. ही संख्या सतत वेगाने वाढत आहे.

Comments
Add Comment