Tuesday, May 13, 2025

क्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

इटलीचा जॅनिक सिनर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता

इटलीचा जॅनिक सिनर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता
मेलबर्न : इटलीच्या जॅनिक सिनरने सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. यंदा त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झेवरेवला पराभूत केले. जॅनिक सिनरने अलेक्झांडर झेवरेव विरुद्धचा सामना ६ - ३, ७ - ६ ( ७ - ४), ६ - ३ असा जिंकला. अंतिम सामना दोन तास ४२ मिनिटे सुरू होता. संपूर्ण सामन्यावर जॅनिकचे वर्चस्व दिसून आले. याआधी उपांत्य फेरीत जॅनिकने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा ७ - ६, ६ - २, ६ - २ असा पराभव केला होता.



जॅनिक सिनरने १३ महिन्यांत तिसरे ग्रँड स्लॅम जिंकले. सर्वात आधी त्याने यूएस ओपन २०२४ ही स्पर्धा जिंकली. नंतर त्याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ जिंकली. आता त्याने सलग दुसरी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. जॅनिकने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा जॅनिक हा ११ वा खेळाडू झाला. तसेच सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा तो जिम कुरियर नंतरचा सर्वात तरुण खेळाडू झाला. जिमने १९९२ आणि १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. अलेक्झांडरला परत एकदा ग्रँड स्लॅम विजेतेपदाने हुलकावणी दिली. अलेक्झांडर २०१५ पासून आतापर्यंत तीन वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला पण तिन्ही वेळा त्याचा पराभव झाला. उपांत्य फेरीत अलेक्झांडर समोर नोवाक जोकोविच होता. पण नोवाकने पहिल्या सेटनंतर माघार घेतली. यामुळे अलेक्झांडरला लगेच अंतिम फेरीत प्रवेश मिळाला होता.
Comments
Add Comment