Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर पोहचली, १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर!

‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर पोहचली, १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर!

पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली असून, त्यातील १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून ७ हजार २१५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


राज्यातील एकूण ७३ रुग्णांपैकी ४७ पुरुष आणि २६ महिला आहेत. पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, पुणे ग्रामीणमध्ये ४४ रुग्ण, पुणे महापालिकेच्या हद्दीत ११, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १५ रुग्ण आहेत. यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ७० वर पोहोचली आहे.


पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ‘जीबीएस’ची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत. पुणे महापालिकेने १ हजार ९४३ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ हजार ७५० आणि ग्रामीणमध्ये ३ हजार ५२२ अशा एकूण ७ हजार २१५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.



आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पाहणी सुरू केली आहे. रुग्णांचे शौचनमुने आणि रक्तनमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात येत आहेत. यातील काही रुग्णांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले असून, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. याचबरोबर पुण्यातील विविध भागांतील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेकडून तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Comments
Add Comment