पुणे : पहिले लग्न झालेले असतानाही लग्न जमवणाऱ्या वेबसाईटवर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे (२५) या तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत (३० रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याला नवी मुंबई येथून शोधून काढत अटक केली.
याप्रकरणी मयत पल्लवी यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती.
आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झाले असतानाही विवाह विषयक संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली होती. त्याद्वारे त्याची पल्लवीशी ओळख झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवत, कुलदीपने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. पैसे देण्यासही तो टाळाटाळ करु लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये पल्लवीने विषारी औषध घेत आत्महत्या केली. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी कुलदीप याच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Ramdas Athawale : पुण्याचे महापौरपद आरपीआयला देण्याची आठवले यांची मागणी
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे, तपास अधिकारी पीएसआय शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस कर्मचारी नीलेश खोमणे, सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले आणि प्रवीण पाटील यांनी केली.