Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीpopti party : माणगावमध्ये पोपटीचा सुटला घमघमाट!

popti party : माणगावमध्ये पोपटीचा सुटला घमघमाट!

रायगड : थंडी सुरू झाली की खवय्यांना वेध लागतात ते वालाच्या शेंगांच्या पोपटीचे. पोपटी म्हटलं की गावठी वालाच्या शेंगा किंवा पावट्याच्या शेंगा, या गावठी शेंगांची नुकतीच गोरेगाव माणगाव बाजारपेठेत आवक झाली असून चिकन प्रेमी नी पोपटीला पसंती देत आहेत आणि या गावठी शेंगाना बाजारपेठेत मागणी देखील चांगली आहे.

कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक

‘या’ ठिकाणी पोपटीची धूम पाहायला मिळते

विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी व बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध आहे. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. यालाच पोपटी असे म्हणतात. काही ठिकाणी मडक्याऐवजी पत्र्याचा डब्बासुद्धा वापरला जातो. पोपटीत वालाच्या शेंगांबरोबर कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन, मसाळी व चिंबोऱ्या घालून लज्जत वाढवली जाते. ठिकठिकाणी शेतावर तसेच मोकळ्या जागेवर, फार्म हाऊस व घराबाहेर मोकळ्या जागेत आदी ठिकाणी या पोपटीची धूम पाहायला मिळते.

पावट्याच्या शेंगांना ग्राहकांची पसंती

अलीकडे थंडी सुरू झाल्यानंतर शेतात लावली जाणारी ही पोपटी ग्रामीण भागात सुरू झाली असून थंडीच्या दिवसात मित्र, कुटुंबातील सदस्य खास कडधान्याच्या शेतात जाऊन तयार झालेल्या वालाच्या शेंगा, अंडी, मसाला लावलेले कोंबडीचे मांस किंवा बिन मांसाची फक्त शेंगांची, मडक्यात मांडणी करून शेतातील गवऱ्या, सुके शेण, पेंढा किंवा गवत यांच्या सहाय्याने भाजणी करतात. ठराविक वेळ उष्णता दिल्यानंतर मडक्यातील शेंगा, अंडी, मांस शिजले जाते. असे शिजलेले मांस, शेंगा इत्यादी पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. या मडक्यातील शेंगांची व अंड्याची चव उत्कृष्ट असल्याने ग्रामीण व शहरी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपटीचे कार्यक्रम सुरू झाले असून अनेक खवय्ये आपापल्या मित्रपरिवारासह शेतात व उघड्या माळरानावर एकत्र येत पोपटी लावत आहेत. या हंगामातील वालाच्या शेंगा २०० तर घाटमाथ्यावरून मुबलक येत असलेल्या पावट्याच्या शेंगांना ग्राहकांची पसंती देखील मिळत असून १०० रुपये किलोने पावट्याच्या शेंगा भाजी बाजारात मिळत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -