नवी दिल्ली : न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या केवळ सैद्धांतिक संकल्पना नाहीत. ही जीवनमूल्ये नेहमीच आपल्या सभ्यता आणि संस्कृतीचा भाग राहिली आहेत. भारताची प्रजासत्ताक मूल्ये आपल्या संविधान सभेच्या रचनेत प्रतिबिंबित होतात. संविधान हा आपल्या सामूहिक अस्मितेचा आधार आहे, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेला भारत, ज्ञान आणि बुद्धीचा उगम मानला जात होता, परंतु भारताला एका काळ्या काळातून जावे लागले. या दिवशी, सर्वप्रथम आपण त्या शूर योद्ध्यांचे स्मरण करतो ज्यांनी मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त केले. यासाठी त्यांनी सर्वात मोठा त्याग केला. या वर्षी आपण भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करत आहोत. राष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात ज्यांच्या भूमिकेला आता योग्य महत्त्व दिले जात आहे, अशा आघाडीच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी ते एक आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सरकारने सार्वजनिक कल्याणाची एक नवीन व्याख्या दिली
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या, सरकारने सार्वजनिक कल्याणाची एक नवीन व्याख्या दिली आहे. घर आणि पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत गरजा अधिकार म्हणून मानल्या गेल्या आहेत. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेद्वारे रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करून अनुसूचित जातीच्या लोकांची गरिबी झपाट्याने कमी केली जात आहे. सरकारने वित्त क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर ज्या पद्धतीने केला आहे ते अनुकरणीय आहे. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांच्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू करण्याचा निर्णय हे सर्वात उल्लेखनीय आहे.
Droupadi Murmu : आपली लोकशाही सर्व समावेशक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
महाकुंभ मेळा हा आपल्या वारसा समृद्धतेची अभिव्यक्तीच
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळा हा आपल्या वारसा समृद्धतेची अभिव्यक्तीच आहे. आपल्या परंपरा आणि चालीरीतींचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी संस्कृतीच्या क्षेत्रात अनेक उत्साहवर्धक उपक्रम सुरू आहेत. भारत हा महान भाषिक विविधतेचा केंद्र आहे. या समृद्धतेचे जतन आणि उत्सव साजरा करण्यासाठी सरकारने आसामी, बंगाली, मराठी, पाली आणि प्राकृत यांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. या श्रेणीमध्ये आधीच तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांचा समावेश आहे. सरकार आता ११ शास्त्रीय भाषांमध्ये संशोधनाला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. नीरजा भाटला, हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकित्सक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.