शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेनेचा मेळावा मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात पार पडला व त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा शिवोत्सव बीकेसीच्या मैदानावर संपन्न झाला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात उद्धट, मग्रुरीची आणि दादागिरीची भाषा ऐकायला मिळाली, तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात संयम, नम्रता व कार्यकर्त्यांना मानसन्मान बघायला मिळाला. ठाकरे व शिंदे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत. दोघांनाही मुख्यमंत्रीपदावर काम करण्याची प्रत्येकी अडीच वर्षे संधी मिळाली. एकाने घरी बसून राज्य कारभार केला, तर दुसरा राज्यभर अहोरात्र पायाला भिंगरी बांधल्यासारखा फिरत होता. उद्धव यांनी २०१९ मध्ये भाजपाशी संबंध तोडले व काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले, तर भाजपाच्या मदतीने व मोदी-शहांच्या आशीर्वादाने शिंदे यांना राज्याचे मुख्यंत्रीपद मिळाले व आता उपमुख्यमंत्रीपदावर ते काम करीत आहेत. शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात उठाव केला तेव्हा त्यांच्यासमवेत पक्षाचे ४० आमदार बाहेर पडले, तर नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६० आमदार जनतेने निवडून दिले.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ८० जागा लढवल्या व ६० जिंकून दाखवल्या, यावरून शिवसेना म्हणून राज्यातील जनतेने त्यांना व त्यांच्या पक्षाला संमती दिली आहे हे स्पष्ट झाले. म्हणूनच शिंदे यांनी शिवसेनेचा विजयोत्सव बीकेसी मैदानावर साजरा केला. भाजपाशी संबंध तोडल्यापासून ठाकरे यांना काही काळ मुख्यमंत्रीपदाच्या मखरात जरूर बसायला मिळाले. पण त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला. कडवट हिंदुत्वाची कास सोडून ते काँग्रेसच्या नादी लागले. त्यांना मुंबईतील मुस्लीम मतदारांचा पाठिंबा जरूर मिळाला कारण ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात राजकारण सुरू केले म्हणूनच हे शक्य झाले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या पक्षाचे सात ते आठ खासदार निवडून आले तेव्हापासून विधानसभा आपण जिंकलीच असे त्यांना वाटू लागले. आपणच महाघाडीचे पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून ते मुंडावळ्या बांधून बसले. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्या पक्षाला घरी बसवले. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उबाठा सेनेने राज्यात ९७ जागा लढवल्या पण जेमतेम २० आमदार निवडून आले. त्यातही घरातले दोघे आहेत. पक्षाची एवढी दाणादाण झाली असतानाही उसने अवसान आणून त्यांनी अंधेरीच्या क्रीडा संकुलात जे भाषण केले त्यामुळे त्यांचेच अधिक नुकसान होणार आहे. पराभव का झाला याचे विवेचन करण्यात त्यांना रस नाही. आपण कुठे कमी पडलो याची कारणे त्यांना शोधावीशी वाटत नाहीत. केवळ मोदी-शहा आणि एकनाथ शिंदेंवर वाटेल तशी बेलगाम टीका-टीप्पणी करून उबाठा सेनेची व्होट बँक वाढणार कशी? उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यापासून ते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांचा सातत्याने गद्दार म्हणून उल्लेख करीत आहेत. ते जर गद्दार असतील तर विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना पुन्हा का निवडून दिले? उलट शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ६० आमदार निवडून आले हाच उद्धव व त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव आहे.
सत्ता गेल्यापासून उद्धव हे अमित शहा व एकनाथ शिंदे यांच्यावर सतत दगाबाजीचे आरोप करीत आहेत. शहा व शिंदे यांचा ते सतत द्वेष करीत आहेत. निवडणूक काळात तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते सतत हल्लाबोल करीत होते, एकदा तर तू राहशील किंवा मी राहीन अशी धमकीही त्यांनी जाहीरपणे दिली. मतदारांनी त्याचे उत्तर मतपेटीतून दिल्यानंतरही उद्धव यांचे डोळे उघडलेले नाहीत. ते आपल्या व आपल्या पक्षाच्या भविष्याचा खड्डा स्वत:च खणत आहेत असे त्यांच्या भाषणावरून दिसून येते. उबाठा सेना संपवायला आता भाजपा किंवा शिंदे यांच्या शिवसेनेला फार काही करावे लागणार नाही, कारण ते काम स्वत: उद्धव व त्यांचे रोज सकाळी असबंद्ध बडबड करणारे प्रवक्ते करीत आहेत. नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला, या प्रसंगाला मोठी प्रसिद्धी मिळाली. पण त्यानंतर उद्धव यांची खदखद किंवा धमक्या देणारी भाषणे थांबली नाहीत. महापालिका निवडणुका येत आहेत, मला सूड… सूड… सूड… होय मला सूड हवाय असे ते अंधेरीच्या क्रीडा संकुलात आपल्या भाषणात बोलले. याचा अर्थ काय होतो? ते मुख्यमंत्री असतानाही त्यांनी तत्कालीन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांच्या फौजा पाठवल्या होत्या, ते सुडाचेच राजकारण होते. राणे यांना अटक करण्यासाठी ते व त्यांच्या ‘कोटरीतील’ नेते कसे उतावीळ झाले होते हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.
सत्ता गेल्यावरही आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही सुडाची भाषा ठाकरे बोलत आहेत, याचा अर्थ त्यांचा तोल सुटला आहे. त्यांना वास्तवतेचे भान राहिलेले नाही, असेच म्हणावे लागेल. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल, जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल, असा इशारा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिला. देशाच्या गृहमंत्र्यांना दिलेली धमकी हे असभ्य व उद्धटपणाचे लक्षण तर आहेच पण राजकारणातल्या मर्यादा ठाकरे यांनी ओलांडल्या आहेत. जिथे आम्ही औरंगजेबाला गाडले तिथे अमित शहा किस झाड की पत्ती असे म्हणायला ठाकरे यांना काहीच कशी लाज वाटली नाही? आपण महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावला आहे हे मान्य करायला ठाकरे तयार नाहीत, त्यांना अजूनही खुमखुमी असेल येत्या महापालिका व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत त्यांना जनता जबर धडा शिकवेल.