गजेंद्र सिंह शेखावत ( केंद्रीय संस्कृती मंत्री )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून साजऱ्या केल्या जाणाऱ्या पराक्रम दिनानिमित्त आम्ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आणि आजच्या युवावर्गाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या अतुलनीय शौर्याला अभिवादन करतो. या दूरदर्शी नेत्याचे जीवन आणि त्यांचे आदर्श यांचा बहुमान राखण्यासाठी पाळला जाणारा हा पराक्रम दिन त्यांच्या तत्त्वांना आपल्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय आकांक्षांमध्ये कसे समाविष्ट करू शकतो, याचे चिंतन करण्याचा क्षण आहे. हा दिवस त्यांच्या बलिदानाची आठवण करून देणाराच नाही तर कृतीचे आवाहन आहे, ज्यामुळे आपल्याला एक समृद्ध, आत्मनिर्भर राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांच्या धैर्य, सचोटी आणि नेतृत्वाच्या तत्त्वांचा वापर करण्याची प्रेरणा मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नेताजींचे योगदान अभूतपूर्व पद्धतीने साजरे आणि संस्थात्मक केले जात आहे. नेताजींच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २३ जानेवारी हा दिवस देशभरात साजरा व्हावा, यादृष्टीने सरकारने २०२१ साली हा दिवस पराक्रम दिन म्हणून घोषित केला. कर्तव्य पथ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत इंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण ही त्यांच्या दूरदृष्टीला वाहिलेली अनोखी श्रद्धांजली होती. बोस यांच्या राष्ट्रवादाच्या आदर्शांशी सुसंगत असे हे कृत्य “भारतीय अभिमान आणि संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे” प्रतीक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले. याशिवाय, नेताजींच्या ३०४ फाईल्स सार्वजनिक करणे हे एक ऐतिहासिक पाऊल होते, ज्यामुळे दशकांपासून चालणाऱ्या अटकळींना पूर्णविराम मिळाला आणि त्यांच्या जीवनाबाबतच्या तसेच कार्याबाबतच्या महत्त्वाच्या नोंदी जनतेला उपलब्ध झाल्या. तसेच इंडियन नॅशनल आर्मीने प्रथम तिरंगा फडकावला होता, त्या मणिपूरमधील मोईरंग येथील आयएनए स्मारकाचे पुनरुज्जीवन हे नेताजींचा वारसा जपण्यासाठीची सरकारची वचनबद्धता दर्शवते. माननीय पंतप्रधान मोदी यांनी बोस यांच्या जागतिक प्रभावावर प्रकाश टाकत म्हटले की, “नेताजींचे जीवन स्वातंत्र्यासाठी समर्पित होते आणि त्यांनी अशा भारताची कल्पना केली होती जो आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण असेल.
कटकमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेले सुभाष बोस एक हुशार विद्यार्थी होते. कटकमधील रॅवेनशॉ कॉलेजिएट स्कूल, कोलकात्तामधील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आयसीएस) परीक्षेत त्यांनी आपली शैक्षणिक चुणूक दाखवली. तरीही देशभक्तीच्या तीव्र भावनेने आणि देशसेवेच्या इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी आश्वासक कारकिर्दीच्या सुखसोयींना नकार देत आयसीएसमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी १९२१ मध्ये भारतीय नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा संदेश पसरवण्यासाठी ‘स्वराज’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. नेताजींचा स्वतंत्र भारताचा ध्यास हे केवळ स्वप्न नव्हते तर कृतीचे आवाहन होते. १९४१ साली त्यांनी नजरकैदेतून सुटून आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला तेव्हा ते केवळ एक धोरणात्मक पाऊल नव्हते – ते दृढनिश्चय, लवचिकता आणि गरज पडल्यास अपारंपरिक मार्ग स्वीकारण्याची इच्छाशक्ती यांचा धाडसी आविष्कार होता. त्यांची सुप्रसिद्ध घोषणा, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा” म्हणजे खऱ्या स्वातंत्र्यासाठी फक्त शब्दांची नाही तर कृतीची आवश्यकता आहे, या त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. इंडियन नॅशनल आर्मी (आय एन ए)ची निर्मिती असो किंवा आजाद हिंद रेडिओवरील त्यांची भाषणे, बोस यांनी दाखवून दिले की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्न, त्याग आणि प्रगतीच्या मोठ्या पटावर योगदान देण्याची इच्छाशक्ती यांची आवश्यकता आहे. माजी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांनी एका निवेदनात ब्रिटिशांनी भारत सोडण्याची अनेक कारणे उद्धृत केली आहेत, त्यातील प्रमुख कारण म्हणजे नेताजींच्या सैन्य कारवायांमुळे भारतीय लष्कर आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांमधील ब्रिटिश राजमुकुटाबाबतची ढळलेली निष्ठा हे होय.
महात्मा गांधींबरोबरचे त्यांचे वैचारिक मतभेद सर्वज्ञात असले तरी गांधीजींच्या तत्त्वांबद्दल बोस यांचा आदर कायम राहिला आणि त्यांच्या परस्परविरोधी मार्गांनी त्यांचा स्वतःचा वेगळा दृष्टिकोन अधोरेखित केला. नेताजींनी १९३९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला; परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठीची त्यांची वचनबद्धता कधीही डगमगली नाही. समोरचा मार्ग आव्हानांनी भरलेला दिसत असला तरीही आपल्या आदर्शांशी एकनिष्ठ राहण्याचा महत्त्वपूर्ण धडा यातून आजच्या तरुणांना मिळतो. नेताजींनी आयएनएमध्ये “राणी झाशी रेजिमेंट” स्थापन करून “नारी शक्ती”चे महत्त्व प्रस्थापित केले. सर्व महिला असणाऱ्या या रेजिमेंटने त्यांचा महिला सक्षमीकरणावरील विश्वास दृग्गोचर केला. हे आदर्श माननीय पंतप्रधानांच्या भारताच्या दृष्टिकोनात चांगले प्रतिबिंबित होतात, जिथे महिला या देशाच्या भविष्याला आकार देण्यामध्ये अविभाज्य भूमिका निभावतात. पराक्रम दिन साजरा करणे म्हणजे नेताजींच्या अमर वारशाचे वार्षिक स्मरण आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांनी साजऱ्या केलेल्या या उत्सवाच्या मागील आवृत्त्यांमध्ये त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला आहे, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख ठिकाणी त्यांची एकता आणि देशभक्तीची भावना रस्त्यांवर प्रतिध्वनित झाली. यंदा कटकमध्ये हा कार्यक्रम झाला, त्याला विशेष महत्त्व आहे कारण तो त्यांच्या मुळांचा सन्मान आहे. लवचिकता आणि नवोन्मेषाची मागणी करणाऱ्या या जगात आत्मनिर्भर, विकसित भारत साकारण्यासाठी त्यांची जीवनगाथा म्हणजे युवा वर्गाला कृती करण्याचे तसेच योगदान देण्याचे एक शक्तिशाली प्रेरणास्थान आहे. अटलबिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की, “सुभाषचंद्र बोस यांचे नाव देशभक्ती जागृत करते आणि राष्ट्राला धैर्याने आणि नि:स्वार्थीपणे कार्य करण्यास प्रेरित करते.” चला उज्ज्वल, मजबूत भविष्यासाठी एकत्र काम करून त्यांचा वारसा पुढे चालवू या.