Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Sai temple security : साई मंदिराच्या सुरक्षा पथकात नव्या श्वानाची एन्ट्री

Sai temple security : साई मंदिराच्या सुरक्षा पथकात नव्या श्वानाची एन्ट्री

शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात (Sai temple security) आता 'सिंबा' नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री झाली आहे. 'वर्धन' श्वानाने दहा वर्ष सेवा दिल्यानंतर तीन महिन्याचा 'सिंबा' आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झाला आहे. सिंबाची बीडीडीएस पथकाकडून ट्रेनिंग सुरू असून लवकरच तो साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.


शिर्डी साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. याचबरोबर व्हीव्हीआयपी देखील मोठ्या प्रमाणात इथे येत असतात.साई मंदिर आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने साईबाबा मंदिरासाठी स्पेशल बीडीडीएस पथक तैनात करण्यात आले आहे.



साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या पहाटेच्या काकड आरती,मध्यान्ह आरती आणि धुपाआरती तसंच रात्रीच्या शेजारतीच्या अगोदर साईंच्या समाधी मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरात बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली जाते. बीडीडीएस पथकात पूर्वी 'वर्धन' नावाचा श्वान कार्यरत होता. मात्र,तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी आता सिंबा दाखल झाला आहे. सिंबाचे सध्या साई मंदिर परिसरात प्राथमिक प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच तो पुणे सीआयडी येथून ट्रेन होऊन साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.


गेल्या दहा वर्षांपासून साई मंदिरात वर्धन श्वानाने सेवा दिल्यानंतर आज तो सेवानिवृत्त झाल्याने बीडीडीएस पथकातील अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पथकाच्या वतीनं वर्धनचा साईबाबांची शाल, फुलांचा हार देऊन सन्मान करण्यात आला. तर सिंबाला साई मंदिर परिसरात आणण्यात आले. यावेळी साईबाबांची 'ओम साई राम' नावाची शाल देऊन सिंबाचा सत्कार करण्यात आला.

Comments
Add Comment