बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील एकाही मारेकऱ्याला अद्यापही शिक्षा सुनावण्यात आली नसून संशयितांपैकी एक आरोपी अजूनही फरार आहे. याच आरोपीला पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या हत्येमागे असलेल्या ८ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडातील एक आरोपी अजूनही फरार असून तपासादरम्यान पोलिसांना हुलकावणी देत आहे. यावर आता पोलिसांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडून देईल त्याला बक्षीस जाहीर केले आहे. १४ जानेवारी रोजी नव्याने स्थापित झालेल्या एसआयटी टीममुळे तपासाला वेग आला आहे. दरम्यान आता कृष्णा आंधळेला पकडण्यात नव्या एसआयटी टीमला कशाप्रकारे यश येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.