Sunday, May 11, 2025

विदेशताज्या घडामोडी

ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाचे स्थान

ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाचे स्थान
वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून दिलीप म्हस्के उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख देशांचे मंत्री, अमेरिकेचे मावळते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मान्यवर उपस्थित होते. दिलीप म्हस्के यांनी १९९५ मध्ये फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरिझॉन ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत संयुक्तपणे सामाजिक कार्य करते.



डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला जगातील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि नेते उपस्थित होते. म्हस्के यांनी या नेत्यांसोबत व्यक्तिगत संवाद साधत जागतिक विकासासाठी त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांच्याशी चर्चा करून, ई-कॉमर्सद्वारे ग्रामीण विकासाला चालना देण्याबाबत आणि भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी Amazon सारख्या कंपन्यांच्या सहकार्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर मार्क झुकेरबर्ग यांच्याशी Meta च्या आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कसा करता येईल, यावर चर्चा झाली. झुकेरबर्ग यांनी म्हस्के यांच्या अफ्रिका प्रकल्पाबाबत कौतुक व्यक्त केले.



टेसला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये म्हस्के यांनी भारतात ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी तर Alphabet चे सह-संस्थापकसर्गे सर्गे ब्रिन यांच्यासोबत म्हस्के यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली. त्याचसोबत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी, फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आर्नॉल्ट, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन आणि रुपर्ट मर्डोक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

दिलीप म्हस्के यांचा या शपथविधी समारंभातील सहभाग हा मराठी माणसासाठी आणि भारतासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांनी जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना आपल्या कार्याची ओळख अधोरेखित केली आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी प्रयत्न केले.
Comments
Add Comment