अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भाकिते वर्तवत असताना, दुसऱ्या इनिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे जगाचे लक्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा पराभव करून ट्रम्प यांनी अमेरिकन सत्तेत शानदार पुनरागमन केले. चार वर्षांच्या अंतरानंतर राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारी ती अमेरिकन इतिहासातील दुसरी व्यक्ती ठरली आहे. जगावर प्रभाव टाकणाऱ्या अमेरिकेची भूमिका हा पुढील काळात निर्णायक ठरणार आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, तिसरे महायुद्ध टाळणार आहोत, अशी घोषणा करून, एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या अध्यक्षीय इतिहासात, एवढ्या कमी कालावधीत जे घडले नाही, ते मी करून दाखविणार आहे, असे सांगून त्यांनी अमेरिकन जनतेच्या आशा पल्लवित केल्या आहेत. अध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेच्या नागरिकांना सर्वोत्तम प्रथम दिवस, उत्कृष्ट प्रथम सप्ताह आणि असामान्य प्रथम १०० दिवस देणार आहे. तसेच अमेरिकेत बेकायदा शिरलेल्या घुसखोरांना परत पाठविण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठे अभियान हाती घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यातून अमेरिकेच्या सीमारेषेवरील सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला जाईल.
सीमा ओलांडून अमेरिकेत प्रवेश करण्यासाठीचे सर्व बेकायदा मार्ग बंद करण्यात येतील, अशा अनेक निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल याकडे अमेरिकन नागरिकांचे लक्ष असेल. जगाच्या दृष्टिकोनातून ट्रम्प यांची धोरणे आणि भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपण सत्तेवर येण्यापूर्वीच इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करार झाला आहे. हा करार होण्यात आपण पुढाकार घेतला होता. जगात युद्ध होऊ नये असे आपले ध्येय असून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर चीनचे टिकटॉक हे अॅप बंद होणार, अशी शक्यता होती. त्यामुळे शनिवारपासूनच अमेरिकेतल्या स्टोअर्समधून हे अॅप गायब झाले होते. मात्र ते बंद केले जाणार नाही, अशी घोषणा ट्रम्प यांनी भाषणात केल्याने पुन्हा या चिनी कंपनीच्या अॅपची विक्री अमेरिकेत सुरू झाली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर आजच्या शेअर बाजारातील ट्रेंडबद्दल बोलायचे झाले, तर मंगळवारी जागतिक संकेत संमिश्र दिसले. आशियाई बाजार तेजीने व्यवहार करत असताना, देशातील सेन्सेक्स आणि निफ्टीने अचानक वेग घेतलेला दिसला होता.
ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली तरी त्याचे जागतिक बाजारपेठेत सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येणार आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या काही दशकांमध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध सातत्याने मजबूत झाले असले तरी, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हे संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाव्यतिरिक्त, इतर अनेक घटक आहेत ज्यांच्या आधारे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय वंशाचे रिचर्ड वर्मा यांनी भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्याबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केली आहे. दोन्ही देश तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता माहिती सामायिक करतात. तसेच, संयुक्तपणे सर्वात प्रगत प्रणालींचे उत्पादन आणि विकास करतात, याकडे वर्मा यांनी लक्ष वेधले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नागरी हक्क, राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत अनेक भारतीय-अमेरिकन लोकांना नियुक्त केल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी हरमीत कौर ढिल्लन, विवेक रामास्वामी, काश पटेल, जय भट्टाचार्य आणि श्रीराम कृष्णन ही नावे प्रमुख आहेत.
जागतिक भारतीय समुदायाची एक ना-नफा संस्था ‘इंडियास्पोरा’ने डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच नवीन प्रशासनाअंतर्गत अमेरिका-भारत संबंध अधिक मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली. दुसरीकडे ट्रम्प यांनी दिलेल्या इशारावजा धमकीमुळे अनेक देशांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचे कारण, ट्रम्प यांनी सत्तेवर येताच कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याची धमकी दिली होती. अमेरिका १ फेब्रुवारीपासून दोन्ही देशांकडून २५ टक्के कर वसूल करणार आहे. ट्रम्प यांच्या या आदेशानंतर या देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी एकाच वेळी ११ देशांत खळबळ माजवली आहे. या ११ देशांच्या यादीत भारत आणि चीनचा समावेश आहे. डिसेंबर २०२४ दरम्यान ब्रिक्स परिषदेतील देशांनी अमेरिकन डॉलरला कमकुवत करण्यासाठी किंवा डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाला पाठिंबा देण्यासाठी नवीन चलन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या नवीन चलनाबाबत पुनर्विचार केला नाही, तर त्या संबंधित त्या सर्व देशांवर १०० टक्के कर लादण्यात येईल आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिलेली आहे. ट्रम्प यांची ही धमकी खरी ठरली, तर ब्रिक्स देशांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. यामध्ये भारताचाही समावेश आहे, हे विसरून चालणार नाही.