राज्य पर्यटन विभागास प्रस्ताव सादर करण्याचे केंद्राचे निर्देश, खासदार सुनील तटकरे यांची माहिती
अलिबाग : तारापूर अॅक्वारियमच्या (Tarapur Aquarium) धर्तीवर रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे मत्स्यालय (Diveagar Aquarium) उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने राज्याच्या पर्यटन विभागास दिले असून, ६० कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच राज्य पर्यटन विभागाकडून सादर करण्यात येईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे बोलताना दिली.
रायगड जिल्ह्यातील पर्यटनाचे वाढते महत्व आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उभारी घेत असलेल्या पर्यटन उद्योगास चालना देण्याच्या हेतूने केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे तारापूर अॅक्वारियमच्या धर्तीवर अॅक्वारिय उभारण्याची मागणी केली होती. कोकणात समुद्र आणि मासे यांच्या आकर्षणापोटी पर्यटक येत असतात. त्यांना अॅक्वारियममध्ये विविध प्रजातींचे मासे पहाण्यास उपलब्ध झाल्यास पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद वृद्धींगत होईल आणि त्यातून स्थानिक पातळीवर पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल अशी भूमिका मांडली होती असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.
श्रीवर्धनमध्ये अॅक्क्वारीयमची उभारणी करुन पर्यटनास चालना देण्याचा हा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मान्य करून या अॅक्वारीयमचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राज्याच्या पर्यटन विभागास दिले आणि त्याचे पत्र आपल्याला पाठविले असल्याचे खासदार तटकरे यांनी पुढे सांगीतले. येत्या काही दिवसातच श्रीवर्धन तालुक्यांतील दिवेआगर येथे अॅक्वारीयम उभारण्याकरिता ६० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राच्या पर्यटन विभागाकडे पाठविण्यात येऊन त्याला मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.
पद्मदुर्ग किल्ला जेट्टीसाठी प्रस्ताव
पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा श्रद्धास्थन असलेल्या या किल्याजवळ सुरक्षित प्रवासाकरिता जेट्टीची नितांत गरज आहे. मात्र पुरातत्व विभागाव अन्य शासकीय विभागांच्या निर्बंधांमुळे येथे जेट्टी उभारण्यात अडचणी येत होत्या. आता या किल्ल्याजवळ जेट्टी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष बाब म्हणून परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येत असून, परवानी प्राप्त होताच जेट्टीचे काम करण्यात येईल, असे खासदार तटकरे यांनी सांगितले.
जलजीवन मिशनचा निधी मिळवणार
केंद्र सरकारकडून राज्याला जवजीवन मिशन योजनेसाठी जो निधी येतो, तो येण्यास विलंब झाल्याने जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे काही प्रमाणात रखडली आहेत. केंद्राकडून राज्याला येणारा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात येत आहे. राज्याला हा निधी प्राप्त होताच त्यातून जिल्ह्यास निधी वितरीत होईल आणि जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे मार्गी लागतील असा विश्वास खासदार तटकरे यांनी व्यक्त केला.
पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणेश देवस्थानचा पाणी प्रश्न सुटणार
अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर गणेश देवस्थानच्या पाली शहरातील पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार तटकरे यांनी सांगितले.
रोहा रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा
रोहा रेल्वेस्थानकात येत्या २५ जानेवारीपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात आल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.