Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Dr. Kisan Maharaj Sakhre Death : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

Dr. Kisan Maharaj Sakhre Death : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

पुणे : वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किसन महाराज साखरे यांचे सोमवारी रात्री पुण्यातील चिंचवड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.


डॉ. साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ आणि पुत्र यशोधन साखरे व चिदंबरेश्वर साखरे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. तसेच आळंदी आणि देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची दृकश्राव्य प्रत प्रकाशित केली आणि संत साहित्याच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले.



त्यांच्या साहित्यप्रवासात त्यांनी संस्कृत व मराठीतून ११५ ग्रंथ लिहिले. यामध्ये सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद आणि सोहम योग यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांनी एकूण ५०० ताम्रपटांवर ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. २०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार प्रदान केला होता, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवीने सन्मानित केले होते.


डॉ. साखरे यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीच भरून निघणार नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment