मुंबई : गेले काही दिवस राज्यात थंडावा असलातरी हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. पहाटे गारवा आणि दिवसभर उकाडा या हवामानाच्या बदलामुळे नागरिकही चिंतेत आहेत. राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून श्रिलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचं सांगितल आहे.
हवामान विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार सध्या चक्राकार वारे राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. याचा परिणाम राज्याच्या तापमानावर होत असून गेल्या काही दिवसात होणारा तापमानातल्या बदलामागे हे कारण आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात येत्या २४ तासांत पुढील तीन दिवसांसाठी तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितल आहे. महाराष्ट्रात येत्या ३ दिवसात किमान तापमानात वाढ होणार असून २ ते ३ अंशांनी राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान वाढेल. त्यानंतर पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरलेला होता. अनेक भागात तापमान १० अंशांच्या खाली नोंदवले जात हेाते. तापमानाच्या चढउताराने सध्या नागरिक सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाने हैराण आहेत. अशातच कोकण, मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. आता गारठा कमी होणार असून २-३ अंशांनी तापमानात वाढ होऊन नागरिकांना उष्णतेला सामोर जावं लागणार आहे.