Monday, June 16, 2025

Devendra Fadnavis : गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ज्येष्ठ निरूपणकार, संत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.


‘गुरूवर्य डॉ. किसन महाराज यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य महत्त्वपूर्ण असे आहे. वेदांत तत्त्वज्ञान आणि संत विचारांची त्यांनी सांगड घालून त्याच्या प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित केले. महाराष्ट्रातील संताची साहित्य संपदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कीर्तन- निरुपणातून अविरत प्रयत्न केले. यासाठी आधुनिक ज्ञान- शिक्षण साधनांचा त्यांनी प्रभावी वापर केला. याच ध्यासातून त्यांच्याकडून अनेकविध मौलिक ग्रंथ निर्मिती झाली.



या सगळ्या गोष्टी भावी कित्येक पिढ्यांसाठी तेजोमय दीपस्तंभ म्हणून ज्ञानप्रकाश देत राहतील. महाराष्ट्र एका अलौकिक ज्ञानसाधकास, तत्वचिंतकास मुकला आहे. त्यांचा साधक परिवार, तसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ब्रम्हलीन गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा