इंडिया कॉलिंग- डॉ. सुकृत खांडेकर
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर रात्री २.३० वाजता त्याच्या घरात घुसून चाकूने झालेला हल्ला ही मुंबईकरांना वॉर्निंग बेल आहे. हल्लेखोर तरुणाने सैफवर चाकूचे सपासप सहा वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत सैफ ऑटोरिक्षातून लीलावती इस्पितळात गेला. तेथील डॉक्टरांनी त्याला वाचवले, त्याच्या मणक्यात घुसलेला चाकूचा तुकडाही बाहेर काढला. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याने बॉलिवूडला हादरा बसलाच पण मुंबईकरांनाही सावध राहा असा इशारा या घटनेने दिला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे येथे सद्गुरू शरण या बहुमजली इमारतीत सैफ व त्याचा परिवार अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर राहतो. आलिशान डुप्लेक्स फ्लॅटमध्ये सैफ, करिना, त्याची मुले तैमूर व जेह राहतात. मुलांना संभाळणाऱ्या आयाही घरातच राहतात. चंदेरी दुनियेत सैफ-करिना ही जोडी जशी सेलिब्रिटी आहे तसेच हा परिवार धनाढ्यही आहे. पण मध्यरात्रीनंतर आपल्या घरात घुसून कोणी आपल्यावर हल्ला करील अशी किंचितही कल्पना या दाम्पत्याने कधी केली नव्हती.
सैफ अली खानची आई शर्मिला टागोर एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सैफचे वडील मन्सूर अली पतौडी हे स्टार क्रिकेटपटू होते. नबाब कुटुंबात जन्मलेला सैफ नेहमीच शाही जीवन जगत आला आहे आणि त्याच्या भोवती ग्लॅमरही कायम आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून हल्ला करणारा बांगलादेशी तरुण आहे. या तरुणाने हल्ला करण्यासाठी सैफ हे टार्गेट का निवडले, तो सैफच्या घरापर्यंत पोहोचलाच कसा, वांद्रे परिसरात उच्चभ्रू वस्ती आहे, हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बांगलादेशी हल्लेखोराला प्रवेश मिळाला कसा, त्यामागे कोणी मास्टर माईंड आहे का, सैफवर चाकूचे वार करून तो तेथून पसार कसा झाला, अशा प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. सैफ याच्या आलिशान फ्लॅटमध्ये लायब्ररी, आर्ट वर्क, स्विमींग पूल, मुलांना नर्सरी, थिएटर, सुंदर सजावट केलेले सिंलिग आहे. घरात ऑडी स्पायडर, मर्सिडिज बेंज, रेंज रोव्हर अशा आलिशान मोटारी आहेत. सैफचे आजवर ७५ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दिल चहाता है (२००१), कल हो ना हो (२००३), हम तूम (२००४), ओमकारा (२००६) हे त्याचे गाजलेले चित्रपट.
करिनाशी लग्न होईपर्यंत सैफ वांद्रे येथील फॉर्च्युन हाईट्समध्ये राहात होता. सैफचे स्विझर्लंडला घर आहे. शिवाय वडिलोपार्जित गुरुग्राम येथे मोठा पॅलेस आहे. आजवर मुंबईत सेलिब्रिटींवर आणि सार्वजनिक जीवनातील आघाडीच्या नेत्यांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण घरात घुसून सैफवर झालेला हल्ला ही अतिशय गंभीर घटना आहेच पण पोलीस, प्रशासनाला आव्हान देणारी बाब आहे. राज्यात सरकार कोणाचे असो, देशात मुंबई हे सर्वात सुरक्षित महानगर म्हणून ओळखले जाते. दिल्ली, कोलकता, बंगळूरु, हैदराबाद, लखनऊ, पाटण्यापेक्षा मुंबई खूपच सुरक्षित आहे. मुंबई हे चोवीस तास धावणारे महानगर आहे. या महानगरात धनाढ्य, गर्भश्रीमंत आहेत आणि लाखोंच्या संख्येने कामगार, कर्मचारी आणि रोजंदारीवर पोट भरणारे आहेत. मुंबई कोणालाही उपाशी ठेवत नाही. रात्री १२ नंतरही एकटी तरुणी या महानगरात लोकल, बस किंवा रिक्षा-टॅक्सीने प्रवास करू शकते. मुंबई महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर आहे व महामुंबईची लोकसंख्या दोन कोटींवर आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येत रोजगार-नोकरी व उद्योग व्यवसायासाठी परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या पंचावन्न लाखांपेक्षा जास्त असावी. पाटणा किंवा लखनऊपेक्षा मुंबईत हिंदी भाषिक जास्त आहेत. बाहेरून येणारे लोक कोण आहेत, ते कुठून आले, कुठे राहतात, काय करतात, त्यांचे पोलीस रेकॉर्ड काय आहे याची सविस्तर व अद्ययावत माहिती मुंबई पोलिसांकडे आहे काय? मुंबईत पकडलेल्या गु्न्हेगारांमध्ये अन्य भाषिक जास्त सापडतात हे वास्तव आहे. मुंबईतील घुसखोरीवर नियंत्रण आहे का, हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची लढून मिळवलेली राजधानी आहे. देशातील सर्वात महागडे शहर म्हणून मुंबई ओळखली जाते. अन्य कोणात्याही शहरापेक्षा रिअल इस्टेटचे दर मुंबईत सर्वात उंचीवर असतात. वांद्रे ते जुहू, अंधेरी, गोरेगाव हा परिसर चंदेरी दुनियेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी चित्रपटसृष्टीतील संबंधितांचे आगार आहे. विविध क्षेत्रांत ग्लॅमर असलेले मुंबईत खूप आहे. व्यापार-उद्योग-व्यवसाय-वित्तीय क्षेत्रातील बडे आसामी मुंबईतच आहेत. देशातील सर्व दिग्गज राजकीय नेत्यांची निवासस्थानेही मुंबईत आहेत. म्हणूनच या महानगराची सुरक्षा व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. सैफ याच्यावर त्याच्या घरात जाऊन झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन-चार कोटींपासून ते पन्नास कोटी किमतीचे आलिशान फ्लॅट घेऊन राहणारे कदाचित सुखी-समाधानी असतील, वैभवात लोळत असतील पण ते सुरक्षित आहेत का, हा मुद्दा आव्हान देणारा ठरला आहे.
सैफ याच्यावर घरात घुसून हल्ला करणारा हा बांगलादेशी आहे. शरीफुल इस्लाम शेहजाद मोहंमद रोहिल्ला अमीन फकीर हे त्याचे नाव. वय वर्षे ३०. मेघालयमार्गे तो भारतात आला.
पश्चिम बंगालमध्ये काही काळ राहिल्यानंतर त्याने मुंबई गाठली. विजय दास या नावाने तो वावरत होता. बांगलादेशी लोकांची घुसखोरी वर्षानुर्षे चालू आहे. केंद्रात कितीही सरकारे बदलली तरी या घुसखोरीला लगाम कुणालाच घालता आलेला नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन केंद्रीयमंत्री मदनलाल खुराणा यांनीच देशात दोन कोटींपेक्षा जास्त बांगलादेशी असावेत असे संसदेत म्हटले होते. मग आज त्यांची संख्या किती असेल? पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी आहे. त्यांना देशात आधार कार्ड मिळते, रेशन कार्ड मिळते, रोजगारही मिळतो. सीमा सुरक्षा दलाची नजर चुकवून बांगलादेशी घुसखोर वर्षानुवर्षे येा-जा कशी करतात? भारतात रोजंदारीवरील मजूर, भाजी विक्रेते, मासे विक्रेते, बांधकामांवर, वॉचमन, सुरक्षारक्षक, घरकाम अगदी बारमध्येेही ते काम करतात. पण त्यांना हुडकून काढणे हे खूप कठीण आहे. सैफच्या हल्लेखोराला पकडण्यासाठी मुंबईचे दोनशे पोलीस अहोरात्र काम करीत होते. त्याला ठाण्याला पकडण्यात यश मिळाले.
सैफवर हल्ला झाला तेव्हा तो नि:शस्त्र होता व हल्लेखोर सशस्त्र होता. हल्लेखोर बांगलादेशातून केव्हा आला, कसा आला, कुठे कठे राहिला, त्याला आसरा कोणी दिला, मुंबईत कधी आला, मुंबईत कोणाबरोबर राहिला, तो सैफच्या घरी कसा पोहोचला, त्याचे टार्गेट थेट सैफ होते की, त्याच्या मुलाचे अपहरण करून त्याला खंडणी मागायची होती, या सर्व प्रश्नांची उत्तरे गूढ आहेत. जेव्हा हल्लेखोर सद्गुरू शरण इमारतीत घुसला तेव्हा तेथील वॉचमन चक्क झोपले होते. त्याला अडवणारे कोणी नव्हते. सैफच्या घराबाहेर सुद्धा सीसीटीव्ही नव्हता. तो जिन्यावरून चढताना व उतरतानाचे त्याचे कॅमेऱ्यात झालेले चित्रीकरण हाच पोलिसांना मोठा क्लू मिळाला.
अभिनेता-निर्माता राकेश रोशन याच्यावर अंडरवर्ल्ड गँगकडून सन २००० मध्ये हल्ला झाला होता. ‘कहो ना प्यार है’ हा त्याचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेचच हल्ला झाला पण तो त्यातून वाचला. सलमान खानला तर ठार मारण्याच्या आजवर सर्वाधिक धमक्या आल्या आहेत. एप्रिल २०१४ मध्ये सलमानच्या घराबाहेर गोळाबीर करून हल्लेखोर पसार झाले. गोळीबारामागे लॉरेन्स बिष्णोई गँगवर संशय घेतला गेला. सलमानचे वडील सलीम खान यांनाही जून २०२२ मध्ये वांद्र्याच्या घरी धमकी देणारी पत्रे आली. १९९३ मध्ये मुंबईत दंगल झाली तेव्हा संजय दत्तवरही गोळ्या झाडल्या गेल्या. सन २०१४ मध्ये गौहर खानचा लाइव्ह परफॉरमन्स चालू असताना स्टेजवर येऊन एकाने थप्पड लगावली होती. पण त्यानंतरही कार्यक्रम चालूच राहिला. मार्च २०२३ मध्ये शहारूख खानच्या मन्नत बंगल्यात दोन मुले घुसली व बराचवेळ लपून बसली होती. नंतर मन्नत बंगल्याबाहेर रेकी केल्याची घटना घडल्याचे लक्षात आले. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व येथील त्यांच्या कार्यालयाबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या झाली व हल्लेखोर पसार झाले.
सैफवर झालेला हल्ला त्याच्या घरात घुसून झाला हे जास्त गंभीर आहे. सैफ अली खानला भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान दिला, पण पद्मश्री प्राप्त सेलिब्रिटी मुंबई महानगरात त्याच्या घरातसुद्धा सुरक्षित नाही, हा संदेश मात्र या घटनेने दिला.
[email protected]
[email protected]