आजच्या स्टार्टअप युगात अनेकजण आपापल्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी व्यवसाय सुरू करत आहेत. या गर्दीत काहीतरी वेगळं करून दाखवणाऱ्या आनंद सागर शिराळकर यांचा प्रवास ठळकपणे उठून दिसतो. पुण्यात जन्मलेल्या आणि जपानसारख्या तंत्रज्ञानप्रधान देशात दीर्घकाळ काम केलेल्या आनंद यांनी व्यवसाय, तंत्रज्ञान आणि समाजसेवेचा उत्तम संगम साधला आहे. व्यवसाय म्हणजे फक्त नफा मिळवण्याचं साधन नाही, तर टिकाऊ मूल्यनिर्मितीचं यंत्र आहे, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. बाजारपेठेतील अडचणी ओळखून त्या व्यापक प्रमाणावर सोडवणं हे उद्योजकाचं खरं काम आहे आणि याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. १२ ते १३ वर्षांपूर्वी जेव्हा स्टार्टअप हा शब्द प्रचलित नव्हता तेव्हा जपानहून पुण्याला परतून त्यांनी पहिला आयटी स्टार्टअप सुरू केला. त्यांच्या स्टार्टप्समध्ये आज अडीचशे ते तीनशे जणांना रोजगार मिळत आहे.
शिबानी जोशी
मुंबई विद्यापीठातून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आनंद यांनी जपान गाठलं. तिथे त्यांनी दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन) क्षेत्रापासून सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्सपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. जपानमधील कायझेन म्हणजेच सतत सुधारणा हे तत्त्वज्ञान आहे. त्यातून त्यांनी दीर्घकालीन योजना, व्यावसायिक शिष्टाचार आणि व्यवस्थापन कौशल्य शिकले. “जपानमध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन, संवादाची शिस्त आणि नेटवर्किंग किती महत्त्वाचं आहे, हे मला शिकायला मिळाले,” असे आनंद सांगतात. त्यांचा प्रवास मात्र नेहमीच सहज सुलभ नव्हता. सुरुवातीला त्यांनी छोटे-छोटे प्रयोग केले. म्युच्युअल फंड विश्लेषणासाठी साधन (म्युच्युअल फंड अॅनालायझर टूल) तयार करणं, ब्लूमबर्ग प्लॅटफॉर्मसाठी प्रॉडक्ट्स तयार करणं, गॉगल्स विकणे, इमिटेशन ज्वेलरी, आईस्क्रीम विक्री हे त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न होते. हे व्यवसाय पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत पण त्यातून त्यांना बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजल्या. याच अनुभवांवर आधारित त्यांनी आपल्या मोठ्या संकल्पनांना भविष्यात मूर्त रूप दिले. सुरुवातीला डीजी फ्युचर टेक नावाची कंपनी त्यांनी पुण्यात सुरू केली. यात सध्या ऐंशी जणांना रोजगार मिळाला आहे. जपानमधल्या बँकांचे फिनटेक क्षेत्रातले काम इथे चालते.
जपानमधील कामकाजादरम्यान भाषांतराच्या अडचणींना सामोरे जाताना “रिआन” या अभिनव कल्पनेचा उगम झाला. रिआन ही कंपनी एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर ए आय आधारित व्यासपीठ आहे, जे व्यावसायिक कागदपत्रे, यूट्यूब व्हीडिओ चित्रपट आणि पुस्तकांच भाषांतर वेगवान आणि नेमकं करते. रिआनचं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ भाषांतर करत नाही, तर त्या भाषांतरातून त्या शब्दांमागील भावना, संदर्भ आणि संस्कृती जपण्याचं काम करते. आजवर अनेक युट्यूब रील्स, चित्रपटांचे, ऑफिस कागदपत्रांच भाषांतर रिआननं केलं आहे. “भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही; ती लोकांना जोडणारा पूल आहे,” असं आनंद ठामपणे सांगतात. तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीमुळे अनेक नवे उद्योग निर्माण होतात आणि यामध्ये नोकऱ्यांच्या संधीही वाढतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भाषांतराशी संबंधित १०,००० हून अधिक नोकऱ्या निर्माण होऊ शकतात असा विश्वास आनंद व्यक्त करतात. “३०,४० वर्षांपूर्वी जेव्हा संगणक आले तेव्हा लोकांना वाटलं की नोकऱ्या कमी होतील, पण झालं उलट. संगणकामुळे काम अधिक उत्पादक झालं आणि नवीन संधी निर्माण झाल्या. AI चंही तसंच होईल,” असं ते ठामपणे सांगतात.
आज मोठमोठ्या कॉर्पोरेट, वैयक्तिक स्तरावर सर्वांनाच आपली डॉक्युमेंट्स जतन करून ठेवायची असतात, ते काम ए आय मार्फत होऊ शकत , त्यामुळे या क्षेत्रात काम खूप वाढणार आहे. रिआनच्या माध्यमातून केवळ व्यवसाय नव्हे, तर समाजासाठीही योगदान देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. रिआन ॲकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आणि दूरस्थ कामगारांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून भाषांतराचं कौशल्य शिकवलं आहे व शिकवणार आहेत. हे उपक्रम महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल ठरू शकणार असून एआयच्या वापरातून घरच्या घरी दोन हजार महिलांना काम देता येऊ शकेल अशी त्यांची योजना आहे. आनंद यांच्या इतर कंपन्यांमध्ये डिजी फ्युचर टेक हे नाव प्रामुख्याने पुढे येतं. ही कंपनी जपानमधील मोठ्या आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेक) क्षेत्रात काम करणाऱ्या पेमेंट गेटवे कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. त्याचबरोबर FTB Starnex ही त्यांची कंपनी नवीन स्टार्टअप्सना भांडवल उभारण्यासाठी मदत करते. या कंपनीच्या माध्यमातून अनेक नवीन उद्योजकांना फंडिंग, मार्गदर्शन, आणि संपर्कसंधी उपलब्ध झाली आहे. “योग्य कल्पना आणि योग्य भांडवल यांची सांगड घालून मोठं मूल्य निर्माण करता येतं,” तेच नवीन स्टार्टअप्स ना ते उपलब्ध करून देतात, असं ते सांगतात.
आनंद यानी १२, १३ वर्षे जपानमध्ये नोकरी केली आणि आता जपानमधील बँकिंग क्षेत्रातलं काम त्यांच्या पुण्यातील आयटी कंपनीतर्फे करून दिलं जातं.आज त्यांच्याकडे अंदाजे दोनशे जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जपानमध्ये उत्तम नोकरी सुरू असतानाही परदेश सोडून भारतात उद्योग निर्माण करण्यासाठी आनंद परतले पण आनंद यांचा वैयक्तिक दृष्टिकोन नेहमी भारत आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याकडे राहिला आहे. “व्यापाराच्या माध्यमातून या दोन देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक बळकट होऊ शकतात,” असं ते आवर्जून सांगतात. आनंद शिराळकर यांचा प्रवास हा केवळ यशाचा नसून सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा आहे. त्यांच्या व्यावसायिक धाडसामुळे आणि नव्या कल्पनांमुळे त्यांनी एक चळवळ उभारली आहे, अनेक होतकरू स्टार्टअप्स ना ते कधी सल्ला तर कधी भांडवलही पुरवतात. एआय वापरून भाषांतराच्या माध्यमातून जगाला एकत्र आणण्याचं स्वप्न उराशी बाळगल आहे. पुण्यात आल्यापासून स्वतःच्या दोन मोठ्या कंपन्यांसोबतच अनेक लहान-मोठ्या कंपन्यांमध्येही त्यांच कामं चालत आहे. कालानुरूप नवनवीन क्षेत्र पादाक्रांत करण्याची उर्मी आहे. उद्योजकाकडे लागणारी जिद्द ,सकारात्मकता, दृष्टी, बुद्धी त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्याबरोबर अनेकांचा विकास करत त्यांना पुढे जायच आहे. असे उद्योजक फारच विरळ सापडतात.
joshishibani@yahoo. com