भाजपाने अखेर आपली पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी ठेवली आहे. कारण हा जिल्हा नक्षलवादाने होरपळत असतो. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. भाजपाच्या या यादीत एक आश्चर्यकारक अपवाद म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. मुंडे यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलेले नाही. त्याचे कारण मस्साजोगचे सरपंचाच्या हत्येत मुंडे यांचे नाव घेऊन आरोप केले जात होते. त्यामुळे मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलेले नाही. भाजपाने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करताना सत्तासमतोलाची कसरत केली आहे हे स्पष्टच जाणवते. भाजपाचे उभरते नेते आणि हिंदुत्ववादाची मशाल हाती घेतलेले तरुण तडफदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री केले आहे. त्यामुळे कोकणात आता भाजपाला चांगले दिवस आले आहेत. त्यातच राणे घराण्याची छाप कोकणावर उमटली आहे.
कोकणात अगोदरच राणे मंत्री आहेत आणि त्यांचे दोन पुत्र आमदार आहेत. पालकमंत्रीपदांसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू होती. कारण भाजपाचे सारेच नेते निवडून आले आहेत आणि त्यातच मित्रपक्षांचे नेतेही निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यावर पकड कोणाची हे पालकमंत्री पदावरूनच ठरते. त्यामुळे पालकमंत्रीपद कोणाकडे आहे यावरून जिल्ह्यात वट कोणाची हे ठरते. त्यात भाजपाने बाजी मारली आहे, तर दुसरी बाजी शिवसेना शिंदे गट यांनी मारली आहे. ४२ मंत्र्यांपैकी ३४ मंत्र्यांनाच पालकमंत्रीपदे मिळाली आहेत. रायगडच्या पालकमंत्र्यासाठी जोरदार रस्सीखेच होती. पण भरत गोगावले आणि योगेश कदम यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मुंबई शहराची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. पालकमंत्री पदांसाठी नव्या मंत्र्यांचे डोळे लागले होते. पण आज अखेर उशिराने का होईना पण पालकमंत्रीपदे जाहीर केली आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही याचे कारण त्यांच्याभोवती असलेला विवाद सांगितला जातो. त्यांचे नाव मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येत घेतले जात असल्याने त्यांना या पदापासून वंचित ठेवले आहे. अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद राखण्यात बाजी मारली आहे.
पुण्याचे पालकमंत्रीपद महत्त्वाचे आहे कारण तेथे पुण्याचे जागरूक लोक राहतात. त्यांचे राजकीय विचार हे नेहमीच महाराष्ट्राल दिशा देत असतात. पण पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. त्याचे कारण आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आता अत्यंत महत्त्वाचे आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरले आहे. त्यामुळे बीडचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेले आहे. यंदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाला प्रतिष्ठा यावी यासाठी सहपालकमंत्री म्हणूनही त्यांच्या दिमतीला काही लोक दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातील घडामोडींकडे लक्ष तर ठेवतीलच, पण जिल्ह्यातील बारीकसारीक घडामोडींकडे त्यांचे लक्ष राहील. यानुसार मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद आशीष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा हे त्यांना सहाय्य करतील. ही रचना करण्यामागे मंत्रीमंडळात सुसूत्रता आणणे याबरोबरच अधिक समन्वय राखला जावा हेही कारण आहे. अर्थात पालकमंत्रीपद जाहीर होताच नाराजीचे सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. पण इतक्या विशाल बहुमताने मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असल्याने नाराजी उद्भवणार यात काही शंका नाही. पण फडणवीस हे वादळ दाबून टाकण्यात यशस्वी होतील यात काही शंका नाही. नाराज झालेल्या मंत्र्यांमध्ये दोन प्रकारच्या मत्र्यांचा समावेश आहे. एक ते ज्यांना पालकमंत्रीपद अजिबातच मिळालेले नाही. त्यात भरत गोगावले, दादा भुसे यांचा समावेश आहे, तर दुसरे मंत्री आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालेले नाही.
दादा भुसे तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेही नाराज असल्याची चर्चा आहे, पण प्रत्येकाला मंत्रिमंडळात घेता येत नाही तसेच पालकमंत्रीपद देता येत नाही. गुलाबराव पाटील यांनी भुसे आणि गोगावले यांना पालकमंत्रीपद न दिल्याने नाराजी उघड व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. या पदासाठी दादा भुसे प्रयत्न करत होते. रायगडचे पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता होती. पण ते पद आदिती तटकरे यांनी पटकावले आहे. त्यांच्यामुळेच भरत गोगावले यांना पद मिळू शकले नाही अशी चर्चा आहे. पण रायगडमधील रस्सीखेच सुनील तटकरे यांनी आपल्या कन्येला पालकमंत्रीपद मिळवून देऊन जिंकली आहे असे बोलले जाते. या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच होती. पण त्यात आदिती तटकरे यांनी बाजी मारली आणि त्यामुळे गोगावले यांना स्वस्थ बसावे लागले आहे. भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे यासाठी आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या. पण त्यांना निराश व्हावे लागले आहे. रायगडात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत पण ते साहजिक आहे. शिवसैनिकांकडून या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला. पण शेवटी राजकारण आहे आणि ते समजून शिवसेनेला समजून घ्यावे लागेल. मुंबई-गोवा महामार्गावर शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला. मुळात पालकमंत्रीपदाला घटनात्मक अधिकार नसतात. केवळ प्रशासकीय व्यवस्थेतील ते एक पद आहे. पण त्यासाठी एवढा संताप व्यक्त करणे अनुचित आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळाले किंवा नाही तरी मंत्र्यांचे अथवा राजकारणाचे काही अडत नाही. राजकारणी जेव्हा सत्ताधारी होतात तेव्हा त्यांच्या मनात अनेक इर्षा निर्माण होत असतात. पण या पदाला तसाच काही अधिकार किंवा अर्थ नाही. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळाले नाही की नाराज होणे हे सर्वस्वी अयोग्य आहे. आता जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काम करावे हीच अपेक्षा आहे.