क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळातर्फे खासदार नारायण राणे “मराठा गौरव” पुरस्काराने सन्मानित
मुंबई : पुरस्कार सोहळे हे फक्त पुरस्कार सोहळे न राहता त्यातून समाजातील व्यक्ती एकत्र येऊन आपल्या विचारांचे आदान प्रदान करून त्यातून उद्योजक निर्माण होतील तेव्हा तेच खरे त्या पुरस्कारांचे यश असेल असे मनोगत रत्नागिरी – सिंधुदुर्गचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या (मुंबई) वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मराठा गौरव पुरस्कार खासदार नारायणराव राणे यांना रविवारी दादर येथे तावडे कौटुंबिक स्नेहमेळाव्यात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे तावडे समाज कुलभूषण पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ शिक्षणमहर्षी उज्वल जयवंतराव तावडे यांना देण्यात आला.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, आपल्याच समाजातील कर्तुत्ववान व विधायक कामे करणाऱ्या लोकांचा आपल्या समाजाकडून सत्कार होणे ही बाब पुढे जाण्यास प्रेरणा देतात. माझं काम निश्चितच कौतुकास पात्र असल्यानेच तावडे समाजाने आपला सत्कार केला म्हणून त्यांनी तावडे समाजाचे आभार मानले. मात्र आता येथेच न थांबता तावडे समाजाने आता एकत्रित येऊन उद्योजकता कशी वाढीस लागेल व तावडे हे जास्तीत जास्त उद्योजक कसे बनतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की मुंबई कोकणात आहे पण कोकणात मुंबई कुठे आहे ? केंद्रात मुंबईचा वाटा ३३ टक्के आहे. पण मराठा समाजाचे योगदान मात्र त्यात एक टक्का आहे. ते वाढले पाहिजे. त्यासाठी समाजातून उद्योजक निर्माण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. मुंबईत आज अनेक उद्योजक आहेत. मात्र मराठी माणसाची संख्या खूप कमी आहे. आपल्यात कुठलीही कमतरता नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो, असा मंत्र देतानाच याबाबतीत मी कधीही आपल्याला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार असल्याचे
त्यांनी सांगितले.
दरम्यान, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव हिरोजी तावडे, सरचिटणीस सतीश तावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी मंडळाच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार चंद्रशेखर श्रीधर तावडे (वाडा), बाळकृष्ण रघुनाथ तावडे (वाल्ये), उदय पांडुरंग तावडे (वाल्ये) यांना देण्यात आला . तर कृषी पुरस्कार विवेक विश्वनाथ तावडे (वाडा), राजेश परशुराम तावडे (नाधवडे) यांना प्रदान करण्यात आला आहे. तर उद्योजक पुरस्कार : स्नेहा अनिल तावडे (नाटक ), क्रीडा : रिधान सुनील तावडे (देवधामापूर), ठाणे येथील स्टेशन मास्तर केशव सदानंद तावडे (वाल्ये), आशा स्वयंसेविका : अनुश्री अनंत तावडे, एसीपी महेश रमेश तावडे, डाक पोस्ट कार्यालय उपअधीक्षक . मनाली राजेंद्र तावडे, डाक पोस्ट कार्यालय सहाय्यक उपअधीक्षक प्रफुल्ल महादेव तावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. २०२४ च्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तावडे कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.