
अलिबाग : खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल पहाता पटसंख्येअभावी रायगड जिल्ह्यातील (Raigad News) २६ शाळा बंद (Primary School) झाल्या आहेत. या शाळांमधील अन्य विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाणार आहे. सातत्याने घटणारी पटसंख्या ही चिंतेची बाब असून, खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल हे यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. मोफत शिक्षण, मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन यासारख्या सोयीसुविधा देऊनही रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यात शिक्षण विभागाला अपयश येत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५२८ शाळा कार्यरत होत्या. यांपैकी २६ शाळा पटसंख्याअभावी बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता सुरू असलेल्या शाळांची संख्या घटून दोन हजार ५०२ वर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षात शंभरहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत.

शहापूर : दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतांनाही शहापूरकरांच्या नशिबी मात्र पाणी टंचाईचे ग्रहण काही सुटतांना दिसत ...
जिल्ह्यात पहिली ते आठवी शाळेत ८७ हजार १४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांचा कल लक्षात घेतल्यास २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. बंद पडलेल्या २६ शाळांमध्ये अलिबाग तालुक्यातील दोन, पेण तालुक्यातील दोन, कर्जत तालुक्यातील एक रोहा तालुक्यातील सहा, माणगाव तालुक्यातील सहा, श्रीवर्धन तालुक्यातील तीन, पोलादपूर तालुक्यातील तीन, तर महाड तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. यात दुर्गम भागांतील शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे शाळा बंद पडल्याचा सर्वाधिक फटका हा दुर्गम भागांतील विद्याथांना बसणार आहे. त्यामुळे दुर्गम भागांतील पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शाळा सुरळीत ठेवण्याची मागणी
खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा हे शाळेतील पटसंख्या घटण्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे शासकीय शाळांमधील पटसंख्या थोपवणे हे शिक्षण विभागासमोरील मोठे आव्हान असणार आहे. रायगड जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. काही तालुके हे अतिशय दुर्गम डोंगराळ आहेत. अशा दुर्गम भागांतील शाळा ज्याठिकाणी कमी पटसंख्या आहे, तिथे एक शिक्षक देऊन शाळा सुरळीत ठेवण्याची मागणी केली जात आहे. (Raigad News)