शहापूर : दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतांनाही शहापूरकरांच्या नशिबी मात्र पाणी टंचाईचे ग्रहण काही सुटतांना दिसत नाही त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा सारखी मोठ-मोठी जलाशये असतांनाही तालुक्यातील जनतेला जानेवारीच्या आरंभापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
Free Travel : जाणून घ्या कोणाला मिळणार तेजस, वंदे भारतसह हमसफरचा मोफत प्रवास?
तालुक्यातील दुर्गम भागातील फुगाळा हद्दीतील आघानवाडी, कसाराखुद यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट त्यातून बुडणारी रोजंदारी यामुळे नागरिक हताश झाले आहे. यावर्षी पाऊस मुबलक पडूनही पाण्याची पातळी खालावत असल्याने कसाराखुर्द, फुगाळे परिसरातील विहिरीचे नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. तर गावातील विहिरींनी तळ गाठला आहे काही ठिकाणी विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. फुगाळे हद्दीतील आघानवाडी वस्तीतील महिलांना सध्या गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असलेले नैसर्गिक पाझर शोधून हंडाभर पाणी टिपून भरण्याची वेळ आली आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
डबक्यातील पाणी पिण्यासाठी वापरल्याने आरोग्याचा प्रश्न ही उपस्थित होणार आहे. या वस्तीला आता वेळीच टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास साथीच्या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असून या वस्तीला त्वरीत टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास प्रशासनाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.
शहापूर तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणत निधी खर्च केला जातो मात्र त्याचा विधायक परिणाम कुठेही होताना दिसत नाही, एकीकडे ग्रामीण भागात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आदिवासी बांधव मेटाकुटीस आले असताना आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा आहे. या टंचाई निवारणासाठी प्रशासनाला केव्हा जाग येईल, असे श्रमजीवी संघटना, सचिव प्रकाश खोडका यांनी म्हटले.