Sunday, June 22, 2025

Rota Supari : रोठा सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरू!

Rota Supari : रोठा सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरू!

रायगड : रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग तालुक्यात सुपारीचे पीक घेतले जाते. श्रीवर्धनची रोठा सुपारी जास्त उत्पन्न देणारी आहे. मात्र, रायगड किनारपट्टीवरील ५० टक्क्यांहून अधिक सुपारीची झाडे चक्रीवादळात उन्मळून पडली होती. यामुळे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सहकार्यातून सुपारी संशोधन केंद्रात रोठा सुपारीची उंचीने कमी असलेली झाडांची जात विकसित करण्यात येत आहे. यामुळे झाडावरील सुपारी काढणीची कामेही सुलभ होणार असून, रोठा सुपारीच्या बागा आणि बागायतदारांना नवसंजीवनी मिळणार आहे.



रोठा सुपारीला विदेशातही मागणी


श्रीवर्धनची रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला मधूर असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने रोठा सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते.



सुपारीचे उत्पन्न वाढणे शक्य


रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अन्य प्रांतातील बुटक्या जातीच्या सुपारीबरोबर रोठा सुपारीची संकरित जात विकसित करण्यात येत आहे. रोठा सुपारीची चव, गुणधर्म कायम ठेवून झाडांची उंची कमी कशी राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बागायतदारांना सुपारीचे अधिकाधिक उत्पन्न घेणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment