मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज ‘इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्विसेस'(Integration of Ticketing Services) संदर्भात बैठक संपन्न झाली.
Rota Supari : रोठा सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरू!
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस मुंबईतील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शहरी वाहतुकीसाठी समर्पित असे सिंगल प्लॅटफॉर्म अॅपचा आज आढावा घेण्यात आला. या एकाच सिंगल अॅपवर मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस तसेच उपनगरीय रेल्वे (लोकल रेल्वे) जी मुंबई शहराची लाईफलाइन म्हणून ओळखली जाते, ती देखील यावर उपलब्ध असेल. या एकच अॅपद्वारे प्रवासी आपली यात्रा व्यवस्थितपणे प्लॅन करू शकतात. सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
काय आहे अॅपचा फायदा
या अॅपद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे त्याच्या जवळ असणारे स्टेशन किंवा कोणती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्याच्या जवळ आहे, हे कळू शकेल. तसेच वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा मोठा वेळ यामुळे वाचणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. तसेच लवकरच हे अॅप प्रवाशांच्या सेवेसाठी लॉंच करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, मुंबईत सध्या ३,५०० लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू करण्यासाठी १७,१०७ कोटींची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १.७० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे, त्यांनी याप्रंसंगी स्पष्ट केले. यावेळी महामुंबई मेट्रो, मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Integration of Ticketing Services)