Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यावा ?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे कसा घ्यावा ?
मुंबई : विधानसभा निवडणूक २०२४ च्या आधी आणि नंतरही महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेली आणि देशभर चर्चेचा विषय ठरलेली लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. पण अपात्र असलेल्या आणि निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेत प्रवेश केलेल्या अशा महिलांना वगळून योजना पुढे सुरू ठेवली जाईल. राज्य शासनाने महिलांना योजनेचे निकष बघा आणि अपात्र असाल तर स्वतः योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. अपात्र असलेल्या महिला स्वतः योजनेतून बाहेर पडत आहेत अनेक महिलांना अपात्र असल्याचे लक्षात आले असले तरी योजनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया माहिती नाही. या महिलांनी काळजी करू नये. कारण लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करणे आणि योजनेतून स्वतः बाहेर पडणे शक्य आहे.



ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा नाही अथवा ज्या महिला अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या आणि आता योजनेतून बाहेर पडू इच्छितात अशा महिला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकतात. यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या....

१. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा

२. तक्रार निवारणाचा पर्याय निवडा

३. योजनेसाठी पात्र नाही असे सांगत ऑनलाईन तक्रार नोंदवा

ही प्रक्रिया पूर्ण झाली की संबंधित महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडेल.



पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल केली जाईल या भीतीने अनेक अपात्र असलेल्या पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी योजनेतून बाहेर पडायला सुरुवात केली आहे. दंड आकारण्याबाबत अद्याप राज्य शासनाने विचार केलेला नाही. पण रक्कम थेट हस्तांतर योजनेशी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केला होता. यातील दोन कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. यातील दोन कोटी ३४ लाख महिलांना विधानसभा निवडणुकीआधी पाच महिने दरमहा १५०० रु. प्रमाणे लाभ मिळाला आहे. पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment