युवराज अवसरमल
कांचन अधिकारी या अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका आहेतच, शिवाय आयुष्यभर कलेशी नात जपणारं व्यक्तिमत्त्व आहे. अनेक सिनेमांतून अभिनय केल्यानंतर त्यांनी, चांगल्या कलाकृती निर्माण व दिग्दर्शित केल्या. ‘दामिनी’ ही त्यांनी दिग्दर्शित केलेली मालिका ब्लॉकबस्टर ठरली. अनेक कलाकारांना अभिनयाची कवाडं उघडी करणारी ही मालिका होती. जवळपास सर्वच मराठी कलाकारांनी या मालिकेत काम केले. ‘बातों बातों में’ हा त्यांचा नवीन मुलाखतीचा कार्यक्रम सध्या यूट्यूबवर खूप गाजतोय. गोरेगावच्या महाराष्ट्र हायस्कूल व अ. भि. गोरेगावकर इंग्लिश शाळेमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या कॉलनीत तेव्हा नाटके व्हायची, त्यामध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता. विलेपार्लेच्या डहाणूकर कॉलेजमध्ये त्यांचं पुढील शिक्षण झालं.वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी घेतली. कॉलेज संपल्यानंतर त्यांनी आविष्कारच शिबीर केलं. त्यावेळी अभिनेते नाना पाटेकरांचं ‘पाहिजे जातीच’ हे नाटक व्हायचं. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक व्हायचं. जयदेव हट्टंगडी यांनी ‘मीडिया’ नावाचं नाटक बसवलं होतं. त्यावेळी भरपूर एकांकिका स्पर्धा व्हायच्या. त्यांनी संजय मोनेंसोबत एकांकिका केली त्यात त्यांना पारितोषिक मिळाले. नंतर त्यांनी उदय टिकेकरांसोबत एक एकांकिका केली त्याबद्दल देखील त्यांना पारितोषिक मिळाले. पाच वर्षे त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. ज्यावेळी त्या बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होत्या, त्यावेळी बँकेतर्फे त्याची महाराष्ट्र राज्य शासनाच्या नाट्यस्पर्धेसाठी असलेल्या नाटकात निवड झाली होती. त्या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
आत्माराम भेंडेच्या ‘पळा पळा कोण पुढे पळतो’ या नाटकात त्यांना भूमिका मिळाली. अभिनेते विजय कदम यांनी त्यांचं नाव सुचवलं होतं. हे नाटक त्यांच्या जीवनातलं टर्निंग पॉइंट ठरलं. या नाटकानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या अभिनयाची गाडी सुस्साट वेगाने धावू लागली.त्यानंतर यह जो है जिंदगी, तितलीया, बनते बिगडते या मालिकेमध्ये काम केले. अभिनेते दिनेश ठाकूर यांच्या ग्रुपमध्ये राहून त्यांनी सपने, आपस की बात, कछुआ-खरगोश या नाटकात कामे केली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेविषयी विविध वर्तमानपत्रांतून लिहून आले. सरिता सेठींच्या ‘और भी है राहे’ या मालिकेत त्यांनी काम केले. प्रेमासाठी वाटेल ते, हीचं काय चुकलं का, बाळाचे बाप ब्रह्मचारी या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. चंद्रप्रकाश द्विवेंदीची ‘चाणक्य’ ही हिंदी मालिका त्यांना मिळाली होती; परंतु त्याचवेळी त्यांनी अधिकारी ब्रदर्सचे मार्कड अधिकारी यांच्यासोबत विवाह केला. त्यामुळे चाणक्य मालिका त्यांना सोडावी लागली. १९८५ ते १९८८ या दरम्यान त्यांनी मुंबई दूरदर्शनवर निवेदक व वृत्तवाचक म्हणून काम केले. लग्नानंतर त्यांच्या सब टीव्हीवरील कमांडर, श्रीमान-श्रीमती या मालिकेसाठी त्यांनी कथा लिहिल्या. कल्पना सांगितल्या. नंतर संकलनाचे काम त्या शिकल्या. त्या दिग्दर्शिका झाल्या. त्याचवेळी ‘दामिनी’ मालिकेचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला होता. सुरुवातीला ती तेरा भागांची मालिका होती. नंतर ती दैनंदिन मालिका झाली. ‘दामिनी’ मालिका त्यांच्या जीवनातील सर्वांत मोठी टर्निंग पॉइंट ठरली. २००४ साली ‘मानिनी’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. स्वप्नील जोशी, गिरिजा ओक यांनी या चित्रपटाद्वारे सर्वप्रथम रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाला जवळपास अठरा पुरस्कार मिळाले होते.
त्याचदरम्यान त्यांनी मी मराठी हे चॅनेल सुरू केले. त्याची सर्व संकल्पना त्यांची होती. त्या चॅनेलसाठी तेरा कार्यक्रम निर्माण करण्यात आले व त्या साऱ्यांची संकल्पना त्यांचीच होती व दिग्दर्शन देखील त्यांनी केले. ‘मोगरा फुलला’ हा नवीन कार्यक्रम सकाळी त्यांनी चॅनेलवर आणला. त्याचे शीर्षक गीत, गायिका, कविता, कृष्णमूर्तींनी गायलं होतं व त्याचे संगीत अशोक पत्की यांनी दिले होते. ते शीर्षक गीत खूप गाजले. त्या कार्यक्रमांमध्ये ब्रेकफास्ट नाश्ता, व्यायामाचे प्रकार, कलेसंबंधी (रांगोळी व इतर कला), भविष्यवाणी हे कार्यक्रम होते. तो मॅगझिन कार्यक्रम खूप गाजला. त्यांचा एक टॉक शो ‘दिलखुलास’ देखील खूप गाजला. या कार्यक्रमासाठी त्यांना बेस्ट अँकर व बेस्ट प्रोग्राम अवॉर्ड देखील मिळाला होता. ‘‘दावत’’नावाचा एक कार्यक्रम होता, त्याचे सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले होते. ‘धरलं तर चावतय, सोडलं तर पळतंय’ हा कार्यक्रम अभिनेता भरत जाधव यांना घेऊन केला होता. अभिनेता स्वप्नील जोशीला घेऊन ‘दे दणादण’ हा कार्यक्रम केला होता. त्याचं शीर्षक गीत संगीतकार अजय अतुल यांनी केलं होत. मी मराठी चॅनेलसाठी त्यांनी तयार केलेलं गाणं खूप गाजलं.
२००८ साली त्यांचे दोन चित्रपट आले. एका वर्षात दोन चित्रपट आणणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. पहिला चित्रपट होता ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा,’ दुसरा चित्रपट होता ‘बाप रे बाप, डोक्याला ताप’ हे दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले. त्यानंतर त्यांचे तुक्या तुकविला-नाग्या नाचविला, दोन घडीचा डाव, हुतूतू, मोकळा श्वास, किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी, जन्म ऋण अशा चित्रपटांची त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन देखील केले. आतापर्यंत त्यांनी मालिकेचे जवळपास पाच ते सहा हजार एपिसोड दिग्दर्शित केले आहेत. ‘‘मुश्किल नहीं हैं कूछ भी अगर ठान लिजिये’’ हे ब्रीदवाक्य त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान ठरले आहे. आपल्या जीवनात जे काही करायचे आहे ते ठरविल्यानंतर तुमचे प्रयत्न कमी पडता कामा नये. त्याबद्दलची तुमची इच्छा कमी होता कामा नये… त्याच्या जोरावर तुम्ही पुढे आयुष्याचे उद्दिष्ट गाठू शकता. लॉकडाऊननंतर त्यांनी ‘जन्म ऋण’ हा चित्रपट लिहिला, त्याची पटकथा लिहिली. त्याचे दिग्दर्शन व निर्मिती केली. त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, हल्ली प्रेक्षक मोबाइलवर जास्त लक्ष केंद्रित करू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी युट्यूबवरील मुलाखतीचा ‘बातों बातों में’ हा पॉडकास्ट कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात त्यांनी केवळ प्रसिद्ध व्यक्तींचीच मुलाखत न घेता कर्तृत्वान प्रसिद्ध नसलेल्या व्यक्तींची मुलाखात देखील घेतलेली आहे. सध्या हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आयुष्यभर कलेची घट्ट वीण बांधून ठेवणाऱ्या कांचन अधिकारी यांना ‘बातों बातों में’ या कार्यक्रमासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!