Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Tadoba Chandrapur : ताडोबातील 'त्या' गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Tadoba Chandrapur : ताडोबातील 'त्या' गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी ताडोबा येथून ५ राज्ये पालथी घालत थेट तामिळनाडूपर्यंतचा सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या ‘एन-११’ या गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या गिधाडाचा मृतदेह पुडुकोट्टई विभागातील अरिमलम थंजूर गावातील तिरुमायम वनपरिक्षेत्रामधील वीज वाहक तारांच्या खाली आढळला.


ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात २१ जानेवारी २०२४ ला जटायू संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. हरियाणा राज्यातल्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त व नष्ट प्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेले दहा पांढऱ्या पाठीचे गिधाड पक्षी या केंद्रात आणण्यात आले होते. या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्राच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून त्यांना येथे उभारलेल्या 'प्री-रिलीज एवेयरी ' मध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. ४ जुलै २०२४ ला 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'च्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या सर्व दहावी गिधाडांना 'जीएसएम ट्रान्समिशन ट्रेकिंग डिव्हाइस' देखील लावले होते. त्यामुळे येथून सुटल्यानंतर, त्यांच्या हालचाली आणि वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी ‘टॅगिंग’ करण्यात आले.



'जटायू संवर्धन योजने'अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या दहा गिधाडांपैकी तीन गिधाडांचा मृत्यू २७ नोव्हेंबर २०२४ ला झाल्याची माहिती समोर आली होती. ‘एन-११’ या गिधाडाने महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजराथ कर्नाटक, आंध प्रदेश या राज्यातून चार हजार किलोमीटरचा प्रवास करुन तामिळनाडू गाठले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून हे गिधाड कलसपाक्कम तालुक्यात वास्तव्यास होते.


गेले काही दिवस या गिधाडाचे एकाच जागेवरील लोकेशन मिळत असल्याने बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली गेली आणि त्यातच या गिधाडाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याचे ‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. उंच टाॅवरच्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हा मृत्यू झाला असण्याची पुष्टी त्यांनी जोडली.

Comments
Add Comment